Kitchen habits to boost immunity: स्वयंपाक ही आवड आणि कला या दोन्हीची सांगड आहे. मात्र, जिथे तुम्ही स्वयंपाक बनवता ते स्वयंपाकघरही तितकंच महत्त्वाचं असतं. त्याची स्वच्छता ही ही प्राथमिकता असली पाहिजे. स्वच्छ स्वयंपाक घर, ताज्या भाज्या, वापरले जाणारे पदार्थ, भांडी ठेवण्याची पद्धत अशा एक ना अनेक गोष्टी आहेत, ज्या तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य ठरवतात. तेव्हा स्वयंपाकघरातील काही नियम तुम्ही पाळलेत तर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास त्या नक्कीच फायदेशीर ठरतील. ते काय आहेत हे जाणून घेऊ…
स्वयंपाकघरात आलेले पदार्थ म्हणजेच भाज्या, फळे, मसाले किंवा मांसाहार हे आपण कसे धुतो, स्वयंपाक करण्याच्या कोणत्या पद्धती निवडतो, अन्न साठवण्याची पद्धत कोणती वापरतो याबाबत घेतलेले प्रत्येक निर्णय तुमच्या आरोग्यावर परिणाम करत असतात.
स्वयंपाकासाठी योग्य तेल निवडा
आपण वापरत असलेल्या पदार्थांचे पौष्टिक मूल्य हे स्वयंपाकाच्या तेलाच्या प्रकारावरही अवलंबून असते. म्हणजेच ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असलेले एवोकाडो आणि ऑलिव्ह ऑइल रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगले काम करते. तसंच जळजळ कमी करण्यासही मदत करते. असं असताना ही तेलं गरम झाल्यानंतर ज्या तापमानाला धूर सोडू लागतात, त्याच क्षणी त्यांचे पोषक घटक नष्ट होते. तसंच धोकादायक रॅडिकल्स तयार होतात. म्हणूनच कमी उष्णतेवर स्वयंपाक करण्यासाठी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरा, तर उच्च तापमानावर स्वयंपाक करण्यासाठी तूप किंवा नारळ तेल याचा वापर करावा.
योग्य तापमानावर शिजवा
मध्यम तापमानात अन्न शिजवल्याने उष्णतेला संवेदनशील जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स टिकून राहतात. ते पेशींच्या संरक्षणाला चालना देतात. वाफवणे, तळणे यासारख्या सौम्य स्वयंपाक पद्धतींमध्ये जास्त उष्णतेची आवश्यकता असलेल्या पद्धतींपेक्षा जास्त पोषक तत्वे टिकून राहतात. म्हणूनच अन्न कमी तापमानावर शिजवण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्यातील पोषक तत्वे टिकून राहतील.
ताज्या, हंगामी फळे आणि भाज्या
कोल्ड स्टोरेजमधून काढलेल्या कच्च्या अन्नापेक्षा ताजी फळे आणि भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे आणि फायटोन्यूट्रिएंट्सचे प्रमाण जास्त असते. ते पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतात आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्याला चालना देतात. स्थानिक, ताजी उत्पादनं साठवलेल्या उत्पादनांच्या तुलनेत अधिक पौष्टिक मूल्य टिकवून ठेवतात. त्यामुळे शक्य तितके ताजे, स्थानिक उत्पादने खाण्यावर भर द्यावा.
साठवणुकीची योग्य पद्धत
अन्न साठवणुकीच्या योग्य पद्धती अन्नाचे पौष्टिक मूल्य राखतात आणि हानीकारक सूक्ष्मजंतूंची वाढ रोखतात. तसंच योग्य साठवणुकीमुळे प्रकाश, हवा आणि आर्द्रतेमुळे होणाऱ्या पोषक घटकांचा ऱ्हासही रोखला जाऊ शकतो. पालेभाज्या आणि औषधी वनस्पती फ्रीजमध्ये साठवणे हा एक चांला मार्ग आहे. काही फळे आणि भाज्या खोलीच्या तापमानावर ठेवल्याने त्याचील अँटीऑक्सिडंट्सची पातळी टिकून राहते.
योग्य भांड्यांचा वापर
स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांमुळे अनेकदा आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात. म्हणजेच बहुतेक घरांमध्ये नॉनस्टीक भांडी वापरली जातात. मात्र, त्याचं कोटिंग खराब झालं किंवा निघालं तर ते अन्नात घातक पदार्थ सोडू शकतात. हे घातक पदार्थ आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात. तसंच स्टेनलेस स्टील , कास्ट आयर्न किंवा सिरॅमिक मटेरियलपासून बनवलेल्या भांड्यांमध्ये असे कोणतेही रसायन सोडले जात नाही, तसंच या भांड्यांमध्ये अन्न समान शिजते.
मीठ, साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हसचे मर्यादित सेवन
जास्त मीठ, साखरेचा वापर आणि प्रिझर्व्हेटिव्हसमुळे शरीरातील पेशींवर हानीकारक परिणाम होऊ शकतात. जास्त सोडियमचे सेवन रोगप्रतिकारक पेशींच्या कार्यावर परिणाम करते, तर जास्त साखर रोगप्रतिकारक शक्ती दाबू शकते. याव्यतिरिक्त प्रिझर्व्हेटिव्हस रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असलेल्या बॅक्टेरियावर परिणाम करू शकतात.
हे काही नियम तुम्ही स्वयंपाक करताना पाळलेत तर आवश्यक जीवनसत्वे जपली जातील आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. योग्य तेल, योग्य भांडी, अन्न शिजवण्याची योग्य पद्धत तसंच तापमान या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. शिवाय स्वयंपाकघराची स्वच्छता हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे.