योग्य आणि पुरेपुर आहार घेणे निरोगी राहण्यासाठी गरजेचे असते. त्यासाठी आपण कोणते अन्नपदार्थ खातो, ते कसे बनवले जातात, त्याचे योग्य प्रमाण किती असावे, एखाद्या आजारासाठी कोणते अन्नपदार्थ टाळावे अशा अनेक गोष्टींचा विचार जेवण बनवताना केला जातो. पण जेवण कशात बनवले जात आहे याचा विचार आपण करतो का? तज्ञांच्या मते कोणत्या भांड्यात जेवण बनवले जाते याचा देखील जेवणावर परिणाम होतो. त्यामुळे वेगवेगळ्या भांड्यात जेवण बनवल्याने तज्ञांच्या मते त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो जाणून घ्या.

जेवण बनवताना वापरल्या जाणाऱ्या भांड्यामधील केमिकल्स त्या जेवणात मिसळण्याची शक्यता असते, ज्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी जेवण बनवताना कोणत्या भांडयांचा वापर करावा आणि कोणत्या भांड्यांचा वापर करू नये याची माहिती असणे आवश्यक असते. आयुर्वेद एक्स्पर्ट डॉक्टर डिंपल जंगडा यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे

Cholesterol : काकडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते का? जाणून घ्या

स्टील
डॉ. डिंपल जंगडा यांच्या मते, स्टीलची भांडी सर्वत्र उपलब्ध असतात आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर देखील केला जातो. पण यामध्ये जेवण बनवण्यास जेवणातील फक्त ६० ते ७० टक्केच पोषक तत्त्व शिल्लक राहतात. तसेच क्रोमीअम किंवा निकेलने पॉलिश केलेली स्टीलची भांडी वापरणे टाळा, कारण त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

लोखंड
लोखंडाची भांडी खूप दिवसांपर्यंत चांगली राहतात. लोखंडाच्या भांड्याबाबत डॉ. डिंपल यांनी सांगितले की या भांड्यामध्ये जेवण बनवने आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण जेव्हा कच्च्या लोखंडापासून बनलेल्या भांड्यात जेवण बनवले जाते तेव्हा त्यात थोड्या प्रमाणात लोखंड विरघळते जे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.

पितळ
पितळेच्या भांडयांमध्ये जेवण बनवल्याने त्याची पौष्टिकता ९० टक्क्यांपर्यंत टिकून राहते. पण या भांड्याना स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतात. या भांडयांमध्ये सीट्रिक पदार्थ न बनवण्याचा सल्ला तज्ञ देतात.

ॲल्युमिनियम

ॲल्युमिनियम हे थायरोटॉक्सिक धातू मानले जाते. या भांडयांमध्ये जेवण बनवल्यास जेवणात हा धातू लगेच मिसळला जातो. ज्यामुळे लिवर डिसऑर्डर, बद्धकोष्ठता, तसेच मेंदूचे आजार होण्याचा धोका वाढू शकतो.

आणखी वाचा : मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात करावा ‘या’ गोष्टींचा समावेश; Blood Sugar नियंत्रणात ठेवण्यासाठी होईल मदत

मातीची भांडी
मातीच्या भांड्यात जेवण बनवताना ते हळूहळू गरम होते, त्यामुळे अन्नपदार्थांमधील पौष्टिकता टिकवून ठेवण्यास मदत होते. पण मातीच्या भांडयांना गरम व्हायला वेळ लागतो, ही समस्या जेवण बनवताना येऊ शकते.