डॉ. अरुणा टिळक
‘पोट दुखेल तो ओवा मागेल’ यानुसार पोटदुखीवर प्राथमिक उपचार म्हणून ओवा खाऊन गरम पाणी प्यावे. पोटदुखी ही अनेक कारणांमुळे होत असते- आम्लपित्तामुळे, आवेमुळे, जंतांमुळे, अजीर्ण. यासाठी जेवणाचे महत्त्वाचे पथ्य म्हणजे आहाराचे प्रमाण कमी करावे. कोणत्या पदार्थानी पोट दुखते ते प्रथम शोधून काढावे. जेवणानंतर लगेच पोटात दुखत असेल तर हिंगाचा वापर जेवणात योग्य प्रमाणात करावा. हिंग गरम पाण्यात, ताकात घालून प्यावे. जेवणात तांदूळ भाजून भात करावा. मुगाची पातळ आमटी घ्यावी. त्याला लसणाची फोडणी घालावी. सुकी चपाती घ्यावी. तांदळाची उकड काढून भाकरी करावी म्हणजे पचण्यास हलकी होईल. गहू, हरभरा, वाटाणा, मटकी, चवळी, पोहे, कुरमुरे या सर्वानी पोटात गॅस होतात म्हणून हे पदार्थ वज्र्य करावे. लोणचे, बेकरीचे पदार्थ टाळावेत. रात्री उशिरा जेवू नये. जेवण सावकाश चावून खावे.
आम्लपित्त, अल्सरचा इतिहास असल्यास थोडे थोडे अन्न चार वेळा घ्यावे. अतिमसालेदार, तेलकट जेवण बंद करावे. दुधी भोपळय़ाचा प्रयोग विविध प्रकारे करावा. जसे की भाजी, दुधीची खीर, दुधी शिजवून कढी करावी. कच्चा कोबीचा रस अर्धा कप अधिक एक चमचा मध उपाशीपोटी पाच दिवस घ्यावा. काळा मनुका, द्राक्षे, वेलची केळी, मोसंबी, डाळिंब, अंजीर घ्यावे. तांदळाचे पातळ घावण, ओल्या नारळाच्या दुधाबरोबर घ्यावेत. उपाशी राहू नये.
अजीर्णामुळे पोटदुखी असल्यास दोन घास कमी खावेत. भूक असतानाच खावे. हिंग-सुंठ घालून ताक घ्यावे. गरम पाणी प्यावे. बेसनाऐवजी मूगडाळीचे पीठ वापरावे. फुलका घ्यावा. अति मांसाहार करू नये, तो रात्री खाऊ नये. शिळे खाऊ नये. आवेमुळे पोटात दुखत असल्यास बेलफळ, डाळिंब घ्यावे. मुगाची पातळ खिचडी घ्यावी. गहू पचत नसल्यास खाऊ नये, ज्वारीची भाकरी घ्यावी. ज्वारी १ किलो आणि १ चमचा मेथी दळून भाकरी घ्यावी. ताकाला तूप-जिऱ्याची फोडणी द्यावी. गाजराचा कीस वाफवून कोशिंबीर घ्यावी. पुदिना रस एक चमचा आणि एक चमचा मध घ्यावा. ओव्याची ताजी पाने चावून खावीत. जेवणानंतर बडीशेप खावी. भोजनोत्तर तीन-चार तासांनी दुखत असल्यास जिरेपूड, सैंधव चिमूटभर, लिंबू रस अर्धा चमचा जेवणानंतर घ्यावे. पोटाला तडस लागल्यास सोडा, लिंबूरस, मिरेपूड, जिरेपूड घालून घ्यावे.
arunatilak@gmail.Com