Fruits to Reduce Bad Cholesterol: आपल्याला माहीत आहे का? शरीरातील ‘वाईट कोलेस्ट्रॉल’ म्हणजेच LDL (Low-Density Lipoprotein) हे एखाद्या सायलेंट किलरसारखं काम करतं. शरीरात त्याचं प्रमाण वाढलं तरी सुरुवातीला कुठलीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत; पण हेच वाढलेलं कोलेस्ट्रॉल हळूहळू हृदयासाठी घातक ठरतं. रक्तवाहिन्यांमध्ये हळूच थर जमतो, रक्तप्रवाह अडतो आणि शेवटी ब्लॉकेज, हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा धोका वाढतो.
डॉक्टर सांगतात, शरीरात दोन प्रकारचं कोलेस्ट्रॉल असतं. एक HDL (चांगलं कोलेस्ट्रॉल) आणि दुसरं LDL (वाईट कोलेस्ट्रॉल). जर LDL वाढलं आणि HDL कमी झालं, तर हृदयावर दडपण येतं. त्यामुळे वेळोवेळी कोलेस्ट्रॉल तपासणं आणि आहारात सुधारणा करणं अत्यावश्यक आहे. पण प्रश्न असा आहे की, औषधांशिवाय हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी कसं करायचं? आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. विनोद शर्मा यांच्या मते, “दररोज काही विशिष्ट फळांचं सेवन केल्यास LDL कमी होतं आणि रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात. ही फळं नैसर्गिकरीत्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बाहेर टाकतात.” चला तर पाहूया, हृदयाचे रक्षण करणारी कोणती आहेत ही ४ चमत्कारी फळं…
१. सिट्रस फळं
जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवायचं असेल, तर संत्री, लिंबू, मोसंबी व द्राक्षं आहारात समाविष्ट करा. ही फळं व्हिटॅमिन सी, फायबर व अँटिऑक्सिडंट्स यांनी समृद्ध असतात आणि ती शरीरातील विषारी द्रव्यं आणि धमन्यांतील अशुद्ध घटकांचा थर साफ करून रक्तप्रवाह सुरळीत ठेवतात.
२. अॅव्होकॅडो
अॅव्होकॅडोमध्ये असणारे मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून, चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतात. त्यात भरपूर फायबर आणि वनस्पतीजन्य अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रक्तवाहिन्यांमधील कचरा बाहेर टाकून हृदय निरोगी ठेवतात.
३. सफरचंद
सफरचंदात असलेलं पेक्टिन फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉलला बांधून ते बाहेर टाकतं. त्याशिवाय त्यातील पॉलीफेनॉल्स हे LDL ला ऑक्सिडेशनपासून वाचवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका घटतो. डॉ. शर्मा म्हणतात, “रोज एक सफरचंद खाणं म्हणजे कोलेस्ट्रॉलवर नैसर्गिक औषध घेणं.”
४. केळं
केळं थेट कोलेस्ट्रॉल कमी करीत नाही; पण त्यातील घुलनशील फायबर आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवतात. हे फायबर LDL चं शोषण थांबवून ते शरीरातून बाहेर टाकतात. परिणामी हृदयावरील ताण कमी होतो आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलित राहतं.
डॉ. विनोद शर्मा सांगतात, “आहारात या चार फळांचा नियमित समावेश केला, तर हृदयविकाराचा धोका निम्म्यानं घटू शकतो. संतुलित आहार आणि दररोज अर्धा तास चालणं – हीच खरी औषधं आहेत.”
निष्कर्ष :
औषधं घेण्यापूर्वी निसर्गाची मदत घ्या. ही ४ फळं फक्त पोट भरत नाहीत, तर रक्तवाहिन्यांमधील ‘गंज’ साफ करून, तुम्हाला नवं आयुष्य देतात.