टेक कंपनी माइक्रोसॉफ्ट आपल्या ‘सरफेस रेंज’ प्रोडक्ट्सची जोरदार मार्केटिंग करत असते. डिझाइनपासून किंमतीपर्यंतचा विचार केल्यास ‘सरफेस प्रोडक्ट्स’ बेस्ट असल्याचा दावा कंपनी नेहमी करते. यावेळी ‘सरफेस प्रो 7’ सर्वोत्तम आहे हे सांगण्यासाठी माइक्रोसॉफ्टने याची तुलना अ‍ॅपलच्या मॅकबूक प्रोसोबत केली आहे. नवीन सरफेस प्रो 7 च्या जाहिरातीत माइक्रोसॉफ्टने अ‍ॅपल मॅकबूक प्रोच्या डिझाइनमधील उणीवा सांगून खिल्ली उडवलीये. यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारची मार्केटिंग बघायला मिळाली आहे.

फुल टचस्क्रीन नसल्याचा टोमणा :-
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये माइक्रोसॉफ्टने आपल्या सरफेस प्रो 7 ची अ‍ॅपल मॅकबूक प्रोसोबत थेट तुलना केली असून सरफेस प्रोमध्ये फुल टचस्क्रीन दिल्याचं म्हणत मॅकबूक प्रोची खिल्ली उडवली आहे. अ‍ॅपल मॅकबूक प्रोमध्ये टचस्क्रीनऐवजी की-बोर्डच्या वरती टच बार दिला आहे. सरफेस प्रोप्रमाणे अ‍ॅपल टचस्क्रीन का देऊ शकत नाही, असा सवालही माइक्रोसॉफ्टने व्हिडिओमधून विचारलाय.

डिटॅचेबल की-बोर्डवरुन खिल्ली :-
व्हिडिओमध्ये डिटॅचेबल की-बोर्डही दाखवण्यात आला आहे. सरफेस प्रो 7 चा की-बोर्ड गरज नसताना वेगळा काढता येतो, तर मॅकबूक युजर्सना हा पर्याय मिळत नाही. आवश्यकतेनुसार सरफेस प्रो 7 ला युजर्स टॅबलेटप्रमाणेही वापरु शकतात.  तर, अ‍ॅपल आपल्या आयपॅड प्रोसोबत डिटॅचेबल की-बोर्ड सिस्टिम देत आहे, तर मॅकबुक प्रो स्टँडर्ड लॅपटॉप डिझाइनसह बाजारात उपलब्ध आहेत.

गेमिंग डिव्हाइस नसल्यावरुन निशाणा :-
केवळ 30 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये माइक्रोसॉफ्टने गेमिंग डिव्हाइस नसल्याबद्दलही मॅकबूकची खिल्ली उडवली आहे. आपल्या प्रोडक्ट्सच्या मार्केटिंगसाठी माइक्रोसॉफ्टकून यापूर्वीही अनेकदा अ‍ॅपलला ट्रोल केलं आहे. व्हिडिओमध्ये अ‍ॅपल मॅकबूक प्रो आणि सरफेस प्रो 7 दोन्ही प्रोडक्ट्सच्या किंमतीचीही तुलना करण्यात आली आहे. अ‍ॅपल मॅकबुक प्रोची बेसिक किंमत 1,299 डॉलर ( जवळपास 94,826 रुपये) आहे, तर सरफेस प्रो 7 ची बेसिक किंमत 890 डॉलर ( जवळपास 64,969 रुपये) आहे. महागड्या प्रोडक्ट्सवरुन जवळपास सर्वच कंपन्या अ‍ॅपलवर निशाणा साधत असतात.

दरम्यान, मॅकबूक प्रो आणि सरफेस प्रो 7 दोघांच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत फरक असला तरी टॉप व्हेरिअंटच्या किंमतीत मात्र जास्त फरक नाहीये.