अलीकडच्या काळात ऑनलाईन शॉपिंगची पद्धत ग्राहकांच्या चांगलीच अंगवळणी पडली आहे. कालपरवापर्यंत घरातील फर्निचर, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटस , दैनंदिन वापरातील विशिष्ट वस्तूंपर्यंत मर्यादित असलेल्या ऑनलाईन माध्यमांचा वापर आता खवय्येगिरीसाठी सर्रास होऊ लागला आहे. मात्र, या ऑनलाईन माध्यमांचा वापर शक्यतो पिझ्झा- बर्गर किंवा तत्सम चटपटीत खाण्याच्या पदार्थांची ऑर्डर देण्यासाठी जास्त प्रमाणात होताना दिसतो. मिठाईसारख्या चोखंदळ पदार्थाची खरेदी ऑनलाईन करण्याची संकल्पना आपल्याकडे अजून तितकीशी रूजलेली नाही. मिठाई खरेदीचा विषय आला की विशिष्ट दुकानं ही ग्राहकासांठी दैवतासमान असतात, असे म्हटले तरी हरकत नाही. त्यामुळे ग्राहक याबातीत सहसा ऑनलाईन पर्यायाकडे फिरकत नाही. मात्र, नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या ‘माय मिठाईवाला’ (www.mymithaiwala.com) या संकेतस्थळामुळे ग्राहकांच्या या अडचणी दूर होऊन त्यांना आपल्या आवडत्या दुकानातील मिठाई आता घरबसल्या मिळणार आहे. या संकेतस्थळामार्फत ग्राहकांना ‘आस्वाद उपाहार व मिठाईगृह’, ‘चांदेरकर स्वीट्स’, ‘डी. दामोदर मिठाईवाला’, ‘पणशीकर स्वीट्स’, ‘चितळे बंधू मिठाईवाले’ आणि ‘सामंत बंधू’ अशा प्रसिद्ध मिठाईगृहांतून त्यांच्या आवडतीचे मिठाई व फरसाण पदार्थ ऑनलाईन मागवता येतील. नामवंत दुकानांमुळे ग्राहकांना मिठाईची चव आणि दर्जाबाबत काळजी करण्याचे कारण उरणार नाही. याशिवाय, प्रत्येकवेळी दुकानापर्यंत जाण्याची ग्राहकांची मेहनतही वाचणार आहे. विशेष म्हणजे या गोष्टी घरपोच करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. सध्या ‘माय मिठाईवाला’चे कार्यक्षेत्र ठाणे, अंधेरी आणि दक्षिण मुंबई या भागांपुरतेच मर्यादित आहे. मात्र, भविष्यात अधिकाअधिक दुकाने आणि कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचा ‘माय मिठाईवाला’चा मानस आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2016 रोजी प्रकाशित
आता मिठाईदेखील मिळणार ऑनलाईन!
मिठाई खरेदीचा विषय आला की विशिष्ट दुकानं ही ग्राहकासांठी दैवतासमान असतात.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 05-05-2016 at 19:21 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mithaiwala online marketplace for sweets