Madhuri Dixit Husband Health Advice: सकाळ म्हणजे दिवसाची सुरुवात… आणि म्हणतात ना, “सकाळ चांगली गेली तर पूर्ण दिवस सुंदर जातो,” पण जर सकाळच चुकली तर संपूर्ण शरीराचं संतुलन बिघडू शकतं. अगदी हाच इशारा दिला आहे बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांचे पती, हृदयविकारतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांनी. त्यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओत सांगितलं की, आपण दररोज करत असलेली एक साधी चूक “अलार्मचा स्नूझ” आपल्या आरोग्याची मोठी शत्रू ठरते आहे.
डॉ. नेने म्हणतात, “अलार्म वाजल्यावर तो बंद करून परत झोपण्याचा मोह अनेकांना होतो; पण ही सवय म्हणजे शरीरासाठी सायलेंट किलरच आहे.” कारण स्नूझ दाबल्याने तुमची गाढ झोप अचानक खंडित होते, मग पुन्हा थोड्याच वेळासाठी झोप लागते, जी शरीराला ना पूर्ण विश्रांती देते ना ऊर्जा; परिणामी तुम्ही दिवसभर सुस्त, थकलेले आणि चिडचिडे वाटता.
ते पुढे सांगतात, “स्नूझ अलार्ममुळे ‘स्लीप इनर्शिया’ नावाची अवस्था निर्माण होते, ज्यात मेंदू झोप आणि जागेपणाच्या मधोमध अडकतो, त्यामुळे लक्ष केंद्रित होत नाही, निर्णय क्षमता कमी होते आणि शरीरात हार्मोन्सचे असंतुलन सुरू होते.” म्हणूनच ते सुचवतात, “दररोज एकच अलार्म लावा, पण तो वाजल्यावर उठायलाच हवं.”
पण एवढंच नाही, सकाळी उठताक्षणी फोन हातात घेणं ही आणखी एक मोठी चूक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “फोन स्क्रोल करताच डोपामिन अचानक वाढतं, म्हणजेच कृत्रिम आनंदाचा डोस. पण त्यामुळे मेंदूला गोंधळ, ताण आणि अस्वस्थता निर्माण होते,” असं ते म्हणतात. दिवसाची सुरुवातच तणाव, बातम्या आणि नोटिफिकेशन्सने झाल्यामुळे आपली ‘मेंदूची बॅटरी’ दिवसाच्या सुरुवातीलाच संपते.
डॉ. नेने सांगतात, “पहिले दोन तास फोनपासून दूर राहा. स्वतःला वेळ द्या, मन शांत ठेवा आणि शेवटचा धक्का कॉफी!”
खूप लोक सकाळी रिकाम्या पोटी कॉफी घेतात. पण डॉ. नेने म्हणतात, “कॉफी प्यायल्याने पोटात ॲसिडचं प्रमाण वाढतं, पचनसंस्था असंतुलित होते आणि दिवसाची सुरुवात थकव्याने होते.” त्याऐवजी ते सुचवतात, “सकाळी पाणी प्या, हलकं स्ट्रेचिंग करा आणि मगच कॉफी घ्या.”
डॉ. नेने यांचा निष्कर्ष अत्यंत स्पष्ट, “स्नूझ, फोन आणि रिकाम्या पोटी कॉफी हे तिन्ही तुमच्या सकाळीच्या आरोग्याचे ‘गुप्त शत्रू’ आहेत. आता प्रश्न एकच, तुमची सकाळ शरीराला जागवत आहे का… की आजारांना आमंत्रण देत आहे?