Vegetables Not to Eat Raw: भाज्या आपल्या आरोग्याचा कणा मानल्या जातात. त्या केवळ शरीर तंदुरुस्त ठेवत नाहीत, तर अनेक आजारांपासून संरक्षणही करतात. त्यात असलेले जीवनसत्त्वे, खनिजद्रव्ये आणि तंतुमय घटक शरीराला बल देतात. पण, प्रत्येक भाजी आरोग्यासाठी सुरक्षित असतेच असं नाही. काही भाज्या कच्च्या खाल्ल्यास त्या शरीरासाठी विषासारख्या ठरू शकतात. विशेषत: मूत्रपिंड (किडनी), लिव्हर (यकृत) आणि पचनसंस्था यांच्यावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो.
प्रमाणित आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा सांगतात, “काही भाज्या जशाच्या तशा खाल्ल्याने त्यातील टॉक्सिन्स आणि बॅक्टेरिया शरीरात वाढतात, ज्यामुळे दीर्घकाळ गंभीर परिणाम दिसू शकतात.” विशेषतः बाजारात मिळणाऱ्या तीन भाज्यांविषयी तज्ज्ञांनी स्पष्ट इशारा दिला आहे. चला जाणून घेऊया, कच्च्या अवस्थेत या भाज्या नेमकं कोणतं नुकसान करू शकतात आणि योग्य पद्धत कोणती आहे.
‘या’ ३ भाज्या किडनी आणि लिव्हर दोन्हीचं नुकसान करतात
१. पालक
पालक दिसायला हिरवागार आणि आरोग्यदायी वाटतो, पण त्यात ऑक्सालिक आम्ल (Oxalate) मोठ्या प्रमाणात असतं. हे घटक शरीरातील कॅल्शियमचे शोषण थांबवतात, ज्यामुळे मूत्रपिंडात खडे (किडनी स्टोन) तयार होण्याची शक्यता वाढते. कच्चा पालक खाल्ल्यास त्यातील लोहाचं शोषणही कमी होतं, त्यामुळे शरीराला हवे ते पोषण मिळत नाही. त्याशिवाय, कीटकनाशकांचे अंश आणि बॅक्टेरिया पचनसंस्थेत प्रवेश करून गॅस, आम्लपित्त आणि संक्रमण निर्माण करू शकतात. तज्ज्ञांचा सल्ला स्पष्ट आहे, पालक नेहमी थोडा उकळून किंवा हलका शिजवूनच खावा. उकळल्यावर ऑक्सालेट्स कमी होतात आणि पोषकद्रव्ये शरीरात नीट शोषली जातात.
२. पत्ता कोबी
कोबी ही अनेकांच्या सलाडमध्ये आवडती भाजी असते, पण कच्ची कोबी खाणं धोकादायक ठरू शकतं. कच्च्या कोबीमध्ये हेलिकोबॅक्टर पायलोरी आणि इतर हानिकारक जीवाणू असू शकतात, जे अन्नविषबाधा आणि पोटदुखीचे कारण ठरतात. त्यात गॅस निर्माण करणारे घटकही असतात, जे अपचन, फुगलेपणा आणि पोटदुखी निर्माण करतात. विशेष म्हणजे, थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी कच्ची कोबी अजिबात खाऊ नये, कारण ती थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर परिणाम करू शकते, त्यामुळे कोबी नेहमी स्वच्छ धुवून, हलक्या वाफेत शिजवून किंवा परतून खावी. ती सलाडमध्ये वापरायची असल्यास थोडीशी उकळून किंवा भाजूनच खाणं अधिक योग्य.
३. ढोबळी मिरची
ढोबळी मिरची (कॅप्सिकम) दिसायला आकर्षक असली तरी कच्च्या स्वरूपात ती आरोग्यासाठी अपायकारक असू शकते. तिच्यात लेक्टिन आणि अल्कलॉईडसारखे घटक असतात, जे पचनक्रियेला बाधा आणतात; त्यामुळे पोटात जळजळ, सूज आणि अपचन होऊ शकतं. काही लोकांना कच्ची ढोबळी मिरची खाल्ल्याने त्वचेवर लालसरपणा, एलर्जी किंवा पोटदुखीही जाणवते. शिवाय यातील काही घटक यकृतातील एन्झाइम्सवर परिणाम करून त्यावर अनावश्यक ताण आणतात. म्हणूनच तज्ज्ञ सांगतात, ढोबळी मिरची नेहमी थोडी भाजून, शिजवून किंवा सूप व भाज्यांमध्ये मिसळून खावी.
तज्ज्ञांचा सल्ला
कच्च्या भाज्यांमधील नैसर्गिक पोषण जपण्यासाठी त्यांना योग्य प्रमाणात उकळणे किंवा शिजवणे अत्यावश्यक आहे. अशाने त्यांच्या आत असलेले हानिकारक घटक निष्क्रिय होतात आणि शरीराला शुद्ध पोषण मिळतं.
थोडक्यात:
“सर्व काही नैसर्गिक आहे, म्हणजे ते नेहमीच निरुपद्रवी असेलच असं नाही!” कच्च्या भाज्यांच्या मोहात आरोग्याशी खेळू नका, थोडंसं शिजवून खाल्ल्यास त्याच भाज्या आरोग्याचा ‘सुपरफूड’ ठरतात.
