अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वैज्ञानिकांनी उष्मांक मोजण्याचे नवे अ‍ॅप तयार केले आहे. लठ्ठ लोकांना उष्मांक जाळण्याची गरज असते त्यामुळे वजन कमी होते. उष्मांक मोजण्याचे हे अ‍ॅप आवाजाने नियंत्रित केले जाते. प्रत्येक जेवणानंतर हे अ‍ॅप उष्मांक व इतर पोषक घटक किती मिळाले हे सांगते.
ती माहिती तुम्हाला पडद्यावर दिसते. संबंधित अन्नाची व मेनूची छायाचित्रेही त्यावर येतात, त्यामुळे अन्नाची अचूक निवड करणेही शक्य होते. न्याहारीसाठी मी एक वाटी ओटमिल, केळी व संत्र्याचा रस घेतलात असे तुम्ही सांगितलेत व नंतर अर्धेच केळे खाल्ले असे सांगितले तरी त्यात सुधारणा केली जाते. एमआयटीने केलेल्या या अ‍ॅपमध्ये अर्थातच विशिष्ट केवळ शब्दच गृहीत धरले जात नाहीत.
इतर अ‍ॅपमध्ये एक वाटी ओटमिल हे शब्द त्याला कळतात, पण ओटमिल कुकी सांगितले तर ते त्याचे आकलन करू शकत नाही. अमेरिकी अन्न व औषध संस्थेच्या डेटाबेसमध्ये ओटमिल असा शब्दप्रयोगच नाही त्याऐवजी ओटस असा शब्द वापरलेला आहे. त्यावर उपाय म्हणून अ‍ॅमेझॉन मेकॅनिकल टर्क क्राउड सोर्सिग प्लॅटफॉर्म या संस्थेच्या मदतीने आहारातील पदार्थ त्यांच्याशी संबंधित शब्द, उत्पादनाचे नाव अशा एकूण १०,००० आहार पदार्थाची यादी अ‍ॅपला देण्यात आली. त्यामुळे वापरकर्त्यांने अन्नपदार्थ सांगितला, की त्याचे वर्गीकरण करता येऊ लागले व एकूण ८००० पदार्थ व त्यांचे समानार्थी शब्द माहिती असल्याने पुनरावृत्ती टाळता येऊ लागली.
तुम्ही जिथे बसलेले असाल व जेवत असाल, तिथे तुम्ही या अ‍ॅपला आहारातील पदार्थ सांगितले तर तुम्ही किती उष्मांक घेतले हे कळणार आहे. बोलीभाषेवर असलेले हे अ‍ॅप आहे, असे टफ्टस विद्यापीठाच्या सुसान रॉबर्ट्स यांनी स्पष्ट केले.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)