नवजात उंदरांना त्यांच्या मातेकडून थोडा वेळ कठोर वागणूक मिळाल्यास, या उंदरांच्या मेंदूची कितपत हानी होते, याचा शोध संशोधकांनी घेतला आहे. या संशोधनामुळे पालकांकडून होणाऱ्या छळाचा मुलांच्या मानसिक घडणीवर कसा दुष्परिणाम होतो, हे समजून घेणे शक्य होणार आहे.

याविषयीचा अभ्यास ‘पीएनएएस’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार, पालक हे छळवणूक करणारे असल्यास त्यांच्यामुळे मुले तणावग्रस्त होण्याबरोबरच त्यांच्या वर्तणुकीतही कशा समस्या निर्माण होतात, यावर प्रकाश पडतो.
याआधी उंदरांवर झालेल्या संशोधनातून, पालकांच्या कठोरपणामुळे मेंदूतील भीतीविषयक (अमिगदाला)आणि स्मृतीविषयक (हिपोकॅम्पस) भागाचा कसा संकोच घडून येतो, हे स्पष्ट करण्यात आले होते. आता झालेल्या या संशोधनातून, पालकांच्या गैरवर्तनातून पिल्लांच्या वर्तणुकीवर कसा परिणाम होतो, हे दिसून आले आहे.

अमेरिकेतील ‘न्यू यॉर्क विद्यापीठ-लॅन्गवन हेल्थ’च्या शास्त्रज्ञांनी अन्य शास्त्रज्ञांच्या सहकार्याने हे संशोधन केले आहे. उंदरांच्या बाबतीत मातेने छळ केल्यास त्यातून पिल्लांना येणारा ताण हा त्यांच्या मेंदूतील हिपोकॅम्पसची हानी करण्यास पुरेसा असतो. त्याचबरोबर अशा तणावग्रस्त पिल्लांसोबत त्यांची आई राहिल्यास मेंदूतील अमिगदाला या भागाच्या वाढीत अडथळा निर्माण होतो. अशी पिल्ले आईपासून दूर राहतात, तिच्यासोबत कमीत कमी वेळ राहू पाहतात, असे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा- डायबिटीज असणाऱ्यांनी ‘ही’ फळे टाळा!

प्रयोगासाठी घेतलेल्या उंदरांच्या या पिल्लांना आठवडाभर त्यांच्या आईकडून रोज काही वेळ कठोर वागणूक मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर या पिल्लांच्या सामुदायिक वर्तनाचे आणि मेंदूचे विश्लेषण करण्यात आले. ही पिल्ले काही काळ आईसोबतच नव्हे, तर त्यांचा सांभाळ करणाऱ्या इतर उंदरांसोबत राहण्यासही राजी नव्हती. छळ न झालेल्या पिल्लांना कॉर्टिकोस्टेरॉन हे तणावाचे संप्रेरक टोचल्यावरही हीच लक्षणे दिसून आली. ‘‘अर्थात अगदी काही वेळाच मुलांना दटावल्यास पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही. मेंदूच्या चांगल्या वाढीसाठी काही प्रमाणात तणावाचे संप्रेरक असण्याचीही गरज असते,’’ असे या अभ्यासाच्या सहलेखिका रेजिना एम. सुलिव्हन यांनी स्पष्ट केले.