Night Sweats Cancer Symptoms: आरोग्यदायी जीवनशैली असूनही जर तुम्हाला दररोज रात्री झोपेतून उठेपर्यंत तुमचे कपडे, तसेच बेडशीट घामानं ओली होते का? तर ती केवळ हवामान किंवा थकव्याची प्रतिक्रिया नसून, तो एका गंभीर आजाराचा इशारा असू शकतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सतत आणि अनाकलनीय कारणाने रात्री येणारा घाम (Night Sweats) हे कधी कधी कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्याचे संकेत असतात.

कर्करोग आणि ‘नाईट स्वेट्स’चा संबंध काय?

कर्करोग हा २०० पेक्षा अधिक प्रकार असलेला गुंतागुंतीचा आजार आहे. प्रत्येक प्रकारात वेगवेगळी लक्षणे आणि वेगवेगळे धोके असतात. वेळेत निदान झाले, तर उपचार यशस्वी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. परंतु समस्या अशी की, कर्करोगाची काही सुरुवातीची चिन्हे खूप सूक्ष्म असतात आणि ती सहज दुर्लक्षित होतात. त्यापैकी एक म्हणजे रात्रीचा घाम.

सामान्यतः आपण घाम येण्याचं कारण उष्णता, ताणतणाव किंवा किरकोळ आजारात शोधतो; पण वैद्यकीय संशोधनानुसार, जर रात्री घाम येण्याची वारंवारता वाढली आणि त्यासोबत वजन घटणे, थकवा, ताप, भूक कमी होणे अशी इतर लक्षणे दिसू लागली, तर त्वरित त्याबाबत तपासणी होणे आवश्यक आहे.

कोणत्या प्रकारच्या कर्करोगामध्ये दिसतात ही लक्षणे?

तज्ज्ञ सांगतात की, शरीरात संसर्ग किंवा रोग वाढल्यास ताप कमी करण्यासाठी शरीर घामाद्वारे तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. कर्करोगाचे काही प्रकार थेट शरीराच्या तापमान नियमनावर परिणाम करतात, त्यामुळे रात्रभर घाम येऊ शकतो.

‘The Journal of the American Board of Family Medicine’मध्ये प्रकाशित संशोधनानुसार, खालील कर्करोगांमध्ये हे लक्षण दिसण्याची शक्यता अधिक असते

  • नॉन-हॉजकिन लिम्फोमा (Non-Hodgkin Lymphoma)
  • हॉजकिन लिम्फोमा (Hodgkin Lymphoma)
  • ल्यूकेमिया (Leukemia)
  • हाडांचा कॅन्सर (Bone Cancer)
  • किडनी कॅन्सर (Kidney Cancer)
  • प्रोस्टेट कॅन्सर (Prostate Cancer)
  • मेसोथेलिओमा (Mesothelioma)
  • कार्सिनॉइड ट्यूमर आणि थायरॉइड कॅन्सरचे काही प्रकार

या संशोधनात नमूद करण्यात आले आहे की, रात्री घाम येणे नेहमीच कर्करोगाचे लक्षण नसले तरी ते शरीरातील गंभीर बदलांचा इशारा असू शकतो.

लक्षात ठेवण्यासारखी इतर सावधगिरीची लक्षणे:

रात्री घाम येण्याबरोबरच खालील संकेतांकडेही दुर्लक्ष करू नका :

  • अनपेक्षित वजन घटणे
  • सतत थकवा किंवा अशक्तपणा
  • शरीरावर गाठ किंवा सूज येणे
  • रक्तस्राव किंवा कारण नसताना जखम होणे
  • त्वचेचा रंग, मोल्स किंवा डागांमध्ये बदल
  • सतत फुगलेपणा किंवा भूक न लागणे

डॉक्टरांचं मार्गदर्शन काय?

तज्ज्ञांच्या मते, “रात्री घाम येणं नेहमीच धोकादायक नसतं; पण जर ते वारंवार होत असेल आणि इतर लक्षणांसह दिसत असेल, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. वेळेत निदान झालं, तर उपचारांतील यशाचं प्रमाण वाढतं.”

जर तुम्हाला दररोज रात्री घाम येऊन झोपमोड होत असेल किंवा त्यासोबत ताप, खोकला, वजन घटणे किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला तातडीने घ्या.

आरोग्य जपण्यासाठी काही टिप्स :

  • शरीरातील बदलांची नोंद ठेवा.
  • ताण कमी करा आणि पुरेशी झोप घ्या.
  • पाणी आणि द्रव पदार्थ पुरेशा प्रमाणात घ्या.
  • नियमित आरोग्य तपासणी करा.
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

रात्री घाम येणं हे फक्त उष्णतेचं नाही, तर कधी कधी शरीरातील धोकादायक बदलांचा प्रारंभिक संकेत असू शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता जागरूक राहा. कारण- वेळेत ओळखलेले संकेतच आयुष्य वाचवू शकतात.