नवी दिल्ली : आपल्या शरीरासाठी मीठ व साखर महत्त्वाचे घटक आहेत. मीठ हे क्षार आहे. शरीरातील द्रव व आम्लांचे संतुलन मिठामुळे होते. मज्जातंतूंच्या आवेगांचे संतुलन, स्नायूंचे आखडणे मिठामुळे नियंत्रित होते. साखर हे कबरेदक आहे. आपल्या दैनंदिन हालचालींसाठी ऊर्जा पुरवण्याचे काम साखर करत असते. मात्र, मीठ-साखरेचे सेवन प्रमाणाबाहेर केल्यास त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतोच. त्यामुळेच त्यांचे योग्य प्रमाणात सेवन गरजेचे आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रक्रियायुक्त अन्न आणि अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठीच्या संरक्षक घटकांद्वारे (प्रिझर्वेटिव्ह) आपण किती प्रमाणात मीठ-साखर सेवन करतो आहोत, याचा अंदाजच अनेकांना येत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने प्रौढांसाठी एक चहाचा चमच्याएवढेच (पाच ग्रॅमपेक्षा कमी) मीठ सेवनाची शिफारस केली आहे. दोन ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी त्यांच्या ऊर्जेच्या गरजेएवढे, तर प्रौढांपेक्षाही कमी मीठ सेवन करण्यास सांगितले आहे. शरीराला गरजेच्या असलेल्या उष्मांकाच्या ५ ते १० टक्के उष्मांक पुरवण्याइतपत साखर खावी. झटपट तयार होणारे अन्न, नूडल, चीज, वेफर्स, प्रक्रियायुक्त मांस, लोणची, जाम, जेली, सॉसमधून मीठ आहारात येतच असते. तसेच सोडा, ग्रेव्ही, शेक, फळांचा संहते रस, कँडी, काही स्नॅक यातून साखर शरीरात जातच असते.  मीठ व साखर शरीरात जास्त प्रमाणात जाऊ नयेत म्हणून आहारतज्ज्ञ काही उपाय सुचवतात. ते असे : उपाहारगृहांत टेबलावरील मीठ अन्नपदार्थावर वाढून घेऊ नये. अन्नपदार्थ विकत घेताना त्यावरील माहिती नीट वाचून विचारपूर्वक घ्या. मिठाचे प्रमाण जास्त असलेली ‘स्नॅक’ खाण्यावर मर्यादा आणा. घरी तयार केलेले अन्न खाण्यावरच मुख्यत्वे भर द्या. झटपट तयार होणारे किंवा तयार अन्न खाण्यावर लक्षणीय मर्यादा आणा. प्रक्रियायुक्त व ‘प्रिझर्वेटिव्ह’युक्त अन्न शक्यतो टाळा. अन्नांत किंवा पेयांत वरून साखर घालणे टाळा. साखरेची गरज भागवण्यासाठी फलाहार करा. प्रक्रिया केलेली पांढरी साखर शक्यतो टाळून काजू, मनुका, अंजीर, सेंद्रिय गूळ, मध आदींचा वापर करा. साखरेचा मोह टाळण्यासाठी दिवसांतून ठरावीक अंतराने अल्प भोजन घ्या. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्याने आहारातील हे बदल करण्याआधी आहारतज्ज्ञांचाही एकदा सल्ला घ्यावा, तज्ज्ञ सुचवतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Quantity of salt and sugar in the diet should be appropriate zws
First published on: 23-05-2022 at 02:40 IST