Diabetes Foot Care: काही महिन्यांपूर्वी ‘द लॅन्सेट डायबेटीज ॲण्ड एन्डोक्रीनॉलॉजी’ या जर्नलमध्ये मधुमेहाची देशातील सद्यःस्थिती दर्शवणारा एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येपैकी ११ टक्के लोकांना मधुमेह हा आजार जडलेला आहे. आणि येत्या काळात ही टक्केवारी आणखीन वाढणायची सुद्धा शक्यता आहे. डायबिटीज असणाऱ्या रुग्णांना खाण्यापिण्याची पथ्य पाळणे अत्यंत आवश्यक मानले जाते. यासह तुमच्या पाऊलांचे रक्षण करणे सुद्धा महत्त्वाचे असते. विशेषतः पावसाळ्यात सततच्या ओलाव्यामुळे पावलांना बॅक्टेरियल संसर्ग होण्याचा धोका असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डायबिटीज रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास पायांच्या नसा सुन्न होऊ शकतात, या स्थितीला डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणून ओळखले जाते. यामुळे पायातील रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो ज्यामुळे रक्त साकळले जाऊन पाय काळा- निळा होऊ शकतो. शिवाय लहानशी जखमही गंभीर होऊन गँगरीन सारखी स्थिती उद्भवण्याचा धोका असतो. अशावेळी पायाची नेमकी कशी काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा- तुमच्या वयानुसार किती व कोणता व्यायाम करायला हवा? कमी- जास्त नकोच, ‘हा’ सोपा फिटनेस फंडा वाचा

डायबिटीज रुग्णांनी अशी घ्या पायांची काळजी

  • पाय धुण्याला पर्यायच नाही, पण पाय ओले ठेवण्याची चूक चुकूनही करू नका.
  • शक्य झाल्यास पाय कोमट पाण्याने धुवा व कोरड्या कपड्याने नीट पुसा.
  • पायाला कोणत्याही प्रकारची जखम झाल्यास एंटीसेप्टिक क्रीमचा वापर करा, पण जखम वाढल्यास त्वरित्च डॉक्टरचा सल्ला घ्या.
  • पायाच्या बोटांमधील खाचा विशेषतः स्वच्छ करा कारण इथेच बॅक्टरीया वाढण्याची सर्वाधिक शक्यता असते.
  • पायाच्या बोटांमध्ये अँटी फंगल पावडर वापरायला विसरू नका.
  • विना चप्पल चालणे टाळा.
  • हवेशीर व मोकळ्या सँडल्स शूज वापरा, पायात मोजे घालणे टाळा अन्यथा मोजे ओले झाल्यास पावलांना त्रास होऊ शकतो.
  • बोटांची नखं वाढवू नका, यात जर घाण किंवा चिखल असेल तर इन्फेक्शनचा धोका बळावतो.
  • एकाच पोजिशनमध्ये खूप वेळ बसून राहू नका. पायाला सतत साधी हालचाल द्या जेणेकरून रक्त प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain increases in mumbai diabetes patients should take extreme care of feet bacteria infection cause gangrene how to clean legs svs