प्रवाह
‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला?’ हा वाद गेली काही दशकं निरंतर चालूच आहे. त्याच धर्तीवर चर्चेत राहील असं दिणारा आणखी एक मुद्दा मुळातून विचार करण्याजोगा आहे. तो म्हणजे आपल्यासाठी फोटो की फोटोसाठी आपण? फोटो म्हणजे नेमकं काय असतं? तर ढोबळ मानानं म्हणायचं तर केवळ आठवणींत तो तो क्षण साठवून ठेवणं शक्य नसल्यानं त्या क्षणाला फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमात (सध्या डिजिटल) क्लिक करणं किंवा शूट करणं. मग हे फोटो-व्हिडीओ लगेचच किंवा फुरसतीत समाजमाध्यमांवर शेअर करणं.
समाजमाध्यमांवर आपण सतत काही ना काही पोस्टत असतो. त्यात बहुताशी वेळा छायाचित्र अर्थात फोटो आणि व्हिडीओजची हजेरी सर्वाधिक असते. सेल्फीचं प्रमाण तर लक्षणीय असतं. त्यात सोलो सेल्फी किंवा सेलिब्रेटींसोबतची सेल्फी असेल तर मग विचारायलाच नको. या पोस्टना खरं तर लहान-मोठं असं वयाचं बंधनही नसतं. वयावरून आठवलं की, अगदी अलीकडंच अभिनेता सुव्रत जोशीने फेसबुकवर पोस्ट करत आवाहन केलं आहे की, ‘‘तत्त्व म्हणून मी आजपासून १५ वर्षांखालील मुलांना ‘सेल्फी’ देणं बंद करत आहे. कुठलीही भेट किंवा प्रसंग अनुभवण्याची, मग तो स्मृतीत साठवण्याची आणि त्याविषयी व्यक्त होण्याची सर्वात घातक पद्धत म्हणजे सेल्फी काढणं. मुलांना तसं करायला लावून आपण त्यांची अनुभवशक्ती, स्मरणशक्ती आणि सृजन मारून टाकतो. कोणी लहान मुलगा मला भेटत असेल तर त्याने भेटावं, मी त्याच्याशी बोलीन.. घरी जाऊन त्याने कागद-पेन घेऊन त्याला हव्या त्या भाषेत त्याविषयी व्यक्त व्हावं किंवा याचं चित्र काढावं. एका पांढऱ्या कागदावर एक लाल फुली मारली किंवा ‘याला भेटून बोअर झालो’ असं लिहिलं तरी चालेल. पण ऐंद्रिय अनुभव घेणं आणि मग सर्जनात्मक पद्धतीने व्यक्त होणं कळीचं आहे. आई-वडिलांनी हे लक्षात घ्यावं. माझ्या ज्या ‘सेलिब्रेटी’ मित्रांना हे पटत असेल त्यांनीही आजपासून हे करायला सुरुवात करावी.’’ यावर बऱ्याच जणांनी हे पटतंय, आवडलंय असं लिहिलंच, शिवाय असाच बोध मोठय़ांनाही घ्यायला हवा, अशा कमेंट केल्या होत्या.
केवळ सेलिब्रेटींसोबतची सेल्फी शेअर करणं आणि त्या निमित्तानं मिरवणं ही गोष्टही एक वेळ समजू शकतो. पण आपण करत असलेल्या असंख्य गोष्टी मग त्या कोणत्याही क्षेत्रातल्या असोत किंवा काहीही असोत, अनेकदा सर्रास पणं शेअर केल्या जातात. त्यात अनेकदा ती गोष्ट आपण केली असा मिरवण्याचा सूर अधिक असतो. अगदी साधंच उदाहरण घ्या चित्रपटांचं. समाजमाध्यमांचा बोलबाला होण्याआधीही चित्रपट पाहिले जात होतेच की. पण आता मी अमक्या ठिकाणी तमका चित्रपट पाहायला या या लोकांसोबत गेले आहे, ही गोष्ट त्या थिएटरचं लोकेशन देऊन, त्या लोकांना टॅग करून नि काही वेळा फोटोंसह मिरवली जाते. शिवाय ‘पिकू’, ‘सैराट’, ‘फास्टर फेणे’, ‘व्हेंटिलेटर’, ‘ती सध्या काय करते?’, ‘पद्मावत’ आदी चित्रपटांवर समाजमाध्यमांवर चिक्कार चर्चा तर घडलीच, पण ज्यांनी हे चित्रपट पाहिले नव्हते, त्यांना ते पाहायला लागावेत इतकं त्यावर लिहिलं-बोललं गेलं किंवा ते मग नाही पाहिलेत म्हणजे काय?, अशा अर्थाचा सवाल विचारून त्यांना हैराण केलं गेलं.
काही वेळा एखादा इव्हेंट हाही मिरवण्यापुरता अटेंड केला जातो की काय इतपत शंका यावी, इतक्या पोस्ट केल्या जातात. किंवा त्या इव्हेंटला आम्ही गेलो होतो हे सांगितलं जातं. याआधीही आपण मैफिलांना, नाटक-एकांकिका महोत्सवांना, कलाप्रदर्शनांना जात होतोच. पण आता बऱ्याच जणांना ते समाजमाध्यमांवर जाहीर करावंसं वाटतं. मिरवावंसं वाटतं. आम्ही सवाई महोत्सवाला गेलो, आम्ही काळाघोडा महोत्सव बघितला किंवा सवाई एकांकिका रात्रभर जागून पाहिल्या वगैरे स्टेटस् अपडेट होतात. आम्ही जे.जे.मधलं कलाप्रदर्शन पाहिलं, महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला जाऊन आलो, फुलांचं प्रदर्शन बघितलं वगैरे वगैरे स्टेट्ससह फोटोही शेअर केले जातातच. इतकंच कशाला साधं कुठल्या हॉटेल, रेस्तराँमध्ये गेलं किंवा काही खाशा ठिकाणी खाल्लं-प्यायलं तरीही ते फोटो अपलोड होतात, त्या ठिकाणांसह.
आता मुद्दा असा की, अशा सगळ्या ठिकाणी जाऊच नये का? तर तसं बिलकूल नाही. जरूर जावं की. एखादी सेल्फीही काळ-वेळेचं भान ठेवून नक्कीच काढावी. फोटोही काढावेत. पण ते सगळेच शेअर करावेत, असा नियम कुणीही केलेला नाही. आपण ज्या कलेचा आस्वाद घ्यायला गेलो आहोत, (असं गृहीत धरून!!) तिचा तन्मयतेनं आणि रसिकतेनं आस्वाद घ्यावा, पण होतंय काय की, बहुतांशी वेळा आपण हे करतच नाही.. त्यामुळं सगळ्यांची ही मिरवण्याची हौस कुठल्या टोकापर्यंत पोहोचणार आहे, ते सांगता येणं कठीण.. मग काही वेळा जिवलगांच्या मृतदेहासोबत सेल्फी पोस्ट करणं किंवा आई गेल्यावर लगेचच तसा स्टेटस् अपडेट करणं असली असंवेदनशील आणि सुदैवानं अद्याप मोजकी असणारी काही उदाहरणंही समाजमाध्यमांद्वारेच आपल्यापर्यंत पोहोचतात. तेव्हा आपण तेवढय़ापुरते हळहळतो, चिंता व्यक्त करतो आणि विचारबिचार को मारो गोली, असं जणू मनात घोकून पुन्हा आपल्याला पोस्टायचं ते पोस्टत राहतो, अपडेटत राहतो.. हे व्यक्त होणं कुठवर, किती नि कसं असावं, त्यात केवळ मिरवणं असावं की त्या त्या कलेचा आस्वाद घ्यावा हा शेवटी ज्याचा, त्याचा प्रश्न…
राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा
