Old grain benefits: आजकाल लोक बाजारातून पॅकिंग केलेले तांदूळ आणतात किंवा किराणाच्या दुकानातून विकत आणतात. तांदूळ खरेदी केला तरी तो नवीन आहे की जुना याचा मात्र कोणी फार विचार करताना दिसत नाही. असं असताना आयुर्वेदात नेहमीच जुना तांदूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. हे फक्त आयुर्वेदच नाही, तर कधीतरी तुमच्या आजी-आजोबांच्या तोंडूनही तुम्ही ऐकलं असेल. कित्येक घरांमध्ये तांदूळ साठवून ठेवले जातात. तर फक्त जुने तांदूळ रोजच्या जेवणात वापरले जातात.
खरं तर जुना तांदूळ केवळ चव आणि पोत यातच उत्तम नसतो, तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात. म्हणूनच कायम जुने धान्य खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही कधी असं पाहिलं आहे का की फुललेल्या तांदळाची किंमत नेहमीच जास्त असते. खरं तर हा जुना साठवणुकीतला तांदूळ असतो. त्याची किंमत त्याच्या चांगल्या प्रकारामुळे आणि साठवणुकीवर होणाऱ्या खर्चामुळे जास्त असते. वजन कमी करण्यापासून ते मधुमेहापर्यंत सर्व गोष्टींसाठी जुना तांदूळ खाणे केव्हाही चांगले. तेव्हा एक ते दोन किंवा तीन वर्षांपूर्वीचे तांदूळ खाणे का फायदेशीर आहे हे जाणून घेऊ…
पचनासाठी चांगले
एक ते दोन वर्षे जुना तांदूळ पचायला हलका असतो असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. नवीन तांदूळ तेलकट आणि पचनास तेवढा हलका नसतो.
जुना तांदूळ शिजवताना फुलतो
जुना तांदूळ शिजायला सोपा आणि मऊ असतो. त्यामुळे तो व्यवस्थित फुलतो आणि पचनास सोपा होतो. त्यामुळे लोकांना जुना बासमती तांदूळ खाण्यासही आवडते.
कमी स्टार्च
नवीन तांदळाच्या तुलनेत जुन्या तांदळात कमी स्टार्च असते. त्यामुळे तांदूळ एकत्र चिकटतो आणि त्याचा पोत खराब होतो.
ग्लायसेमिक इंडेक्स कमी
मधुमेहींना नवीन तांदळापेक्षा जुना तांदूळ खाणे सोपे असते कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स नवीन तांदळापेक्षा कमी असतो. तो स्टार्चमुळे कमी चिकट असतो. म्हणूनच जे कमी प्रमाणात तांदूळ खातात त्यांनी जुना तांदूळ खाणे अधिक योग्य ठरते.