Yoga for good sleep: आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव आणि चिंता सगळ्यांनाच सतावते. त्यामुळे निद्रानाश, अस्वस्थता, एकाग्रता आणि विश्रांतीचा अभाव यासारख्या समस्या उद्भवतात. यापासून आराम मिळवण्यासाठी बरेच लोक महागडे उपचार आणि औषधे घेतात. मात्र, तरीही त्यांचा कोणताही परिणाम होत नाही. आयुष मंत्रालयाच्या मते, योग ही एक नैसर्गिक पद्धत आहे जी या समस्या कमी करण्यास मदत करू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही सोपी योगासने तुम्हाला केवळ गाढ झोपच देणार नाहीत, तर दिवसभरातील ताणदेखील कमी करतील.

वज्रासन

जेवणानंतरही वज्रासन करता येते. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. परिणामी पचनस्थेला मदत होते. पचन चांगले झाल्यावर पित्त आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी होतात. या समस्या झोपेत अडथळा ठरतात. जेवणानंतर पाच ते दहा मिनिटे वज्रासनात बसल्याने पोट शांत होते आणि तुम्हाला लवकर झोप येते. वज्रासनाचा सराव सोपा आहे. पाय फोल्ड करून गुडघ्यांवर बसा, तुमचे शरीर सरळ आणि ताठ ठेवा. डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. हे आसन दीर्घकाळ बसल्यामुळे होणारी कंबरदुखीदेखील कमी करते. झोपेची गुणवत्ता सुधारते आणि मन शांत करते.

यष्टी आसन

हे एक योगासन आहे जे शरीर आणि मन दोघांनाही आराम देते. ते पाठीचा कणा ताणते आणि पाठदुखी कमी करते. ताण आणि स्नायूंचा कडकपणा दूर करून हे आसन अस्वस्थता दूर करते. त्यामुळे झोपेच्या वेळी मन शांत राहते. ते करण्यासाठी आधी तुम्ही पाठीवर झोपा, तुमचे पाय ताणा आणि तुमचे हात तुमच्या डोक्याच्या वर ताठ करा. हा स्ट्रेच सहा सेकंद होल्ड करा आणि नंतर आराम करा. चार ते पाच वेळा अशाप्रकारे हे आसन कराहा ताण स्नायूंना आराम देतो आणि मनाला शांत झोपेसाठी तयार करतो.

भद्रासन (बटरफ्लाय पोज)

हे योगासन मन शांत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या आसनात दोन्ही पाय गुडघ्यांपर्यंत दोन्ही बाजूला झुकवा, तळवे एकत्र एकमेकांना जोडून घ्या आणि गुडघे हळूहळू जमिनीकडे दाबा. तुमचे हात पोटावर ठेवा आणि हळूहळू श्वास घ्या. हे आसन केवळ कमरेखालील भागात रक्तप्रवाह वाढवत नाही, तर मांडीच्या स्नायूंना देखील स्ट्रेच करते. हे स्ट्रेच अस्वस्थता दूर करते आणि मन शांत करते, जे झोपेसाठी अत्यंत आवश्यक आहे.