How to Clean Aluminum Sliding Window Tracks: आजकाल प्रत्येक घरात स्लायडिंग खिडक्या दिसतात. त्यामुळे खिडकी उघडणं – बंद करणं सोपं आणि त्यानं घराला एकदम आधुनिकतेचं रूप आणि स्वच्छतेची झळाळी मिळाल्यासारखं वाटतं पण खरी अडचण कशाची होते माहितीये का? खिडकीच्या अ‍ॅल्युमिनियम ट्रॅकची! होय, हे ट्रॅक म्हणजे बारीक खाचा असतात आणि त्यात धूळ, केस, माती, कधी कधी तेलकट चिकट घाण साचत जाते. सुरुवातीला आपण त्याकडे दुर्लक्ष करतो; पण नंतर ट्रॅकमधील खाचांमध्ये साचलेली घाण काढण्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पुढे ही घाण खिडक्या मागे-पुढे करण्यात अडथळा ठरते. त्यामुळे खिडकी अडकते, आवाज करते आणि दिसायलाही सगळं कुरूप वाटतं. पण काळजी नको. कारण- आता तुमच्यासाठी घेऊन आलोय २ भन्नाट ट्रिक्स, ज्या वापरून तुम्ही हे ट्रॅक इतक्या झटपट स्वच्छ करू शकाल की, तुम्हाला स्वत:वरच विश्वास बसणार नाही.

घासणी अन् क्लिप जुगाड

घराघरात असणारी भांडी घासायची हिरवी घासणी घ्या. ती थोडीशी साबणाच्या पाण्यात भिजवा आणि दुमडून घ्या. दुमडलेल्या भागाच्या मधोमध कपड्यांची क्लिप अडकवा. आता बघा तयार झाली खास खिडक्यांचे ट्रॅक साफ करण्यासाठी विशेष घासणी. आता त्या घासणीची उघडी बाजू बरोबर त्या अरुंद खाचांमध्ये घालून घासायला सुरुवात करा. तुम्हाला काय जाणवेल माहितीये का? धूळ, माती, चिकट थर अक्षरशः पुसट होऊन निघून जातील. जिथे तुमचा हात पोचू शकत नाही तिथे ही घासणी पोहोचून तुम्हाला अवघड वाटणारं काम काही मिनिटांत करून दाखवेल.

येथे पाहा व्हिडीओ

स्पंज कटिंग मास्टर स्ट्रोक

दुसरी ट्रिक अजूनच मस्त! एक जाडसर स्पंज घ्या. तुमच्या खिडकीच्या ट्रॅकची रुंदी मोजा आणि त्याप्रमाणे स्पंजवर खुणा करा. आता जिथे खाचा आहेत, तिथे स्पंज थोडा कापून घ्या. म्हणजे स्पंज जणू त्या ट्रॅकच्या मापात बनवलेलं ब्रशचं टूल होईल. सुरुवातीला कोरड्या स्पंजने धूळ काढा. मग तोच स्पंज पाण्यात भिजवून पुन्हा स्वच्छ पुसून घ्या. ट्रॅकच्या आतल्या कोपऱ्यात जमा झालेली जुनी घाणही सहज बाहेर येईल.

येथे पाहा व्हिडीओ

एवढ्या सोप्या पद्धतीने काय फायदा?

खिडक्यांची उघडझाप करणं सुलभ होईल.
खिडक्या पुढे-मागे करताना अडकणे, खरखरण्याचा आवाज येण्याच्या त्रासांपासून सुटका होईल.
अ‍ॅल्युमिनियम ट्रॅकचे दीर्घकाळ नुकसान होणार नाही.
घर दिसेल स्वच्छ, टापटीप आणि शैलीदार

तर मग आता कोणाची वाट पाहताय? रविवारची स्वच्छता मोहिमेसाठी आवश्यक बाबींची यादी तयार करा आणि या दोन ट्रिक्स वापरून बघा… तुमच्या स्लायडिंग खिडक्या कशा हमखास स्वच्छ अन् लख्ख होतील आणि मग तुम्ही म्हणाल – “अरे वा! एवढं सोपं होतं, मग आधी का नाही केलं?”