Stomach Cancer Prevent: पोटाचा कॅन्सर आज जगभरात एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने त्रस्त होतात. आनुवांशिक कारणे आणि आजूबाजूचे वातावरण याचा काही अंशी परिणाम होत असला, तरी डॉक्टरांच्या मते आपला आहार आणि जीवनशैली पोटाच्या आरोग्यावर आणि कॅन्सरच्या धोक्यावर सर्वाधिक प्रभाव टाकतात. आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये थोडेसे बदल केले, तर पचनशक्ती वाढवता येते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येते आणि दीर्घकाळात कॅन्सरचा धोका कमी करता येतो.

AIIMS, हार्वर्ड आणि स्टॅनफर्ड येथे प्रशिक्षण घेतलेल्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी करण्यासाठी ४ सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. त्यांच्या सल्ल्यात योग्य आहार घेणे, पचनासाठी उपयुक्त सवयी ठेवणे, प्रोसेस्ड मांसापासून दूर राहणे आणि हेलिकोबॅक्टर पायलोरी सारख्या बॅक्टेरियाच्या संसर्गाची तपासणी करणे हे समाविष्ट आहे. हे उपाय केवळ पोटाचे आरोग्य सुधारत नाहीत, तर शरीराला आतून मजबूत करून कॅन्सरशी लढण्यास सक्षम बनवतात.

आहारात क्रुसीफेरस (पालेभाज्या) समाविष्ट करा

ब्रोकली, कोबी, फ्लॉवर, ब्रसेल्स स्प्राउट्स आणि केल सारख्या क्रुसीफेरस भाज्या कॅन्सपासून बचाव करण्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. या भाज्यांमध्ये असलेला सल्फोराफेन नावाचा नैसर्गिक घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो, यकृताची कार्यक्षमता वाढवतो आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतो, जो कॅन्सरते एक कारण ठरू शकतो.

डॉ. सेठी यांच्या मते, जर तुम्ही या भाज्या आपल्या आहारात नियमितपणे घेतल्या – मग त्या उकडलेल्या असोत, भाजलेल्या असोत किंवा थोड्या परतलेल्या – तरी त्या पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि पोटाचे आरोग्य तिन्ही सुधारतात. या भाज्यांमध्ये असलेले व्हिटामिन C, व्हिटामिन K आणि फोलेट शरीराला संसर्ग आणि आजारांशी लढायला मदत करतात.

खाण्यात लसणाचा समावेश नक्की करा

लसूण नेहमीच एक सुपरफूड मानले गेले आहे. त्यामध्ये असलेला अ‍ॅलिसिन हे घटक अँटी-कॅन्सर आणि अँटी-बॅक्टेरियल गुणांनी भरलेली असते. डॉ. सेठी यांच्या मते, लसूण पोटाच्या आतील आवरणाचे संरक्षण करते, हानिकारक जंतूंना नष्ट करते आणि हेलिकोबॅक्टर पायलोरी (H. pylori) सारख्या संसर्गांपासून बचाव करते. लसूण सहजपणे रोजच्या आहारात वापरता येते – जसे सूप, भाजी, स्टर-फ्राय किंवा सॅलडमध्ये. कच्च्या लसणात अ‍ॅलिसिनचे प्रमाण सर्वाधिक असते, पण थोडे शिजवून खाल्ल्यासही त्याचे फायदे टिकून राहतात. नियमित सेवनाने केवळ अन्नाची चव वाढत नाही, तर पोटाला नैसर्गिक संरक्षणही मिळते.

प्रोसेस्ड मांसापासून दूर रहा

बेकन, सॉसेज, हॉट डॉग आणि डेली मीट सारख्या प्रोसेस्ड मांसामध्ये नायट्रेट्स आणि नायट्राइट्स नावाचे रासायनिक घटक असतात, जे पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढवतात. अशा मांसाचे जास्त सेवन केल्याने पचनतंत्रात सूज येते आणि पेशींना नुकसान होऊ शकते. डॉ. सेठी यांच्या मते, याऐवजी चिकन, मासे, डाळी किंवा वनस्पती-आधारित प्रोटीन आहारात घ्यावेत. ताजे मांस घरच्या घरी शिजवा आणि अतिशय शिजवलेले किंवा जळलेले मांस खाणे टाळा, कारण त्यातून कॅन्सर निर्माण करणारे घटक तयार होतात.

हेलिकोबॅक्टर पायलोरीची तपासणी करून घ्या

हेलिकोबॅक्टर पायलोरी (H. pylori) हा असा जंतू आहे जो पोटाच्या आतील आवरणात संसर्ग करतो आणि त्यामुळे गॅस्ट्रायटिस, अल्सर आणि पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. जर तुम्हाला वारंवार पोटदुखी, गॅस, अपचन, मळमळ किंवा जळजळ जाणवत असेल, तर हा H. pylori संसर्गाचा संकेत असू शकतो. डॉ. सेठी यांच्या मते, वेळेवर तपासणी करून घ्यावी आणि गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. या संसर्गाचा उपचार अँटिबायोटिक्स आणि आम्ल कमी करणाऱ्या औषधांनी करता येतो.तसेच स्वच्छता ठेवणे, दूषित पाणी न पिणे आणि बाहेरचे अर्धवट शिजलेले अन्न न खाणे हेही महत्त्वाचे आहे.