सुझुकी कंपनीने आपली नवी बाइक सादर केली आहे. ‘इंडोनेशिया इंटरनॅशनल ऑटो शो’मध्ये कंपनीने Suzuki GSX150 Bandit ही गाडी सादर केली. सामान्य 150 सीसी बाइकप्रमाणेच या बाइकचं डिझाइन असलं तरी या बाइकला स्पोर्टी लूक देण्यात आल्याने वेगळेपण दिसून येत आहे.

स्टायलिश टँक, एलईडी हेडलॅम्प यांसारख्या फिचर्समुळे या बाइकला स्पोर्टी लूक मिळाला आहे. Suzuki Bandit 150 मध्ये 147.3 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 19 बीएचपी पावर आणि 14 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. भारतातील इतर 150 सीसी बाइकच्या तुलनेत या बाइकच्या इंजिनचं आउटपूट तगडं आहे. Suzuki Gixxer ची तुलना केली तर Gixxer 14.8 बीएचपी पावर आणि 14 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. नव्या Bandit मध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स आहे तर Gixxer मध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स आहे. बाइकच्या पुढे टेलिस्कोपिक सस्पेंशन तर मागच्या बाजूस मोनोशॉक आहे. दोन्ही टायरला डिस्क ब्रेकही देण्यात आला आहे.

दक्षिण-पूर्व आशियाच्या बाजाराचा विचार करुन या बाइकची निर्मीती करण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं. भारतात ही बाइक केव्हा लॉन्च होणार याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नसली तरी भारतात ही बाइक लॉन्च होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे. कारण भारतात आधीपासूनच सुझुकीच्या Gixxer आणि Gixxer SF या बाइक्स आहेत.