आजकाल मधुमेह किंवा शुगर ही वाईट दिनचर्या आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे एक सामान्य समस्या बनली आहे. मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत ही समस्या दिसून येत आहे. देशातील मोठी लोकसंख्या या आजाराच्या विळख्यात आहे. शुगर लेव्हल कमी करण्यासाठी किंवा टिकवून ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात आणि महागडी औषधे देखील घेतात पण तरीही विशेष फरक दिसत नाही. मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या दिनचर्येत काही बदल करून योगाचा अवलंब केल्यास त्यावर नियंत्रण ठेवता येईल. आज आम्ही अशाच काही योगासनांविषयी सांगत आहोत जे मधुमेहींसाठी वरदान मानले जातात.

मांडूकासन

हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम गुडघे वाकवून वज्रासनाच्या मुद्रेत बसावे आणि हाताचा अंगठा तळहातावर आतील बाजूस वाकवून मुठ घट्ट बंद करावी. आता दोन्ही हातांच्या बंद मुठी नाभीच्या वर ठेवा. आता श्वास घ्या आणि श्वास सोडत असताना तुमचे शरीर पुढे टेकवा, काही वेळ या स्थितीत राहिल्यानंतर, श्वास घेताना वज्रासन स्थितीत परत या. ही प्रक्रिया ३ ते ४ वेळा पुन्हा करा. हे आसन केल्याने पोटाच्या आतल्या अवयवांना मसाज होतो आणि पचनसंस्थाही चांगली राहते. मंडुकासन स्वादुपिंडाला उत्तेजित करते आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

कपालभाती प्राणायाम

सर्वप्रथम ध्यानाच्या मुद्रेत बसून डोळे बंद करून ताण सोडवा आणि शरीर मोकळे करा. आता तुमच्या दोन्ही नाकपुड्यांमधून श्वास घ्या जेणेकरुन पोट फुगेल आणि पोटाचे स्नायू ताकदीने आकुंचन पावत असताना श्वास सोडा. श्वास घेताना कोणत्याही प्रकारची शक्ती वापरणार नाही याची काळजी घ्या. कपालभाती प्राणायाम करणे मधुमेहींसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह सुधारतो.

(हे ही वाचा: International Yoga Day 2022: वजन कमी करायचं आहे? ‘ही’ ५ योगासनं करतील मदत)

पश्चिमोत्तनासन

सर्व प्रथम, एका सपाट जागेवर बसा आणि आपले पाय समोर पसरवा. आता श्वास घेताना तुमचे शरीर पुढे हलवा आणि हाताने पायाचे बोट धरण्याचा प्रयत्न करा. आता आपले डोके गुडघ्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि काही वेळ या स्थितीत रहा.

हलासन

हलासनासाठी सर्वप्रथम, जमिनीवर पाठीवर झोपा आणि तुमचे दोन्ही पाय ९० अंशाच्या कोनात सरळ वर घ्या. यानंतर, आपल्या हातांनी कंबर आणि नितंबांना आधार द्या. आता तुमचे पाय डोक्याच्या वरच्या बाजूपासून मागच्या बाजूला हलवण्याचा प्रयत्न करा. आपल्या पायाने जमिनीला स्पर्श करा आणि आपले पाय सरळ ठेवा. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप चांगले आहे, परंतु ज्या गर्भवती आहेत किंवा ज्यांना उच्च रक्तदाब किंवा पाठदुखीचा त्रास आहे, त्यांनी हे आसन अजिबात करू नये.

धनुरासन

धनुरासन करण्यासाठी, प्रथम पोटावर झोपा आणि श्वास घेताना गुडघे वाकवा. दोन्ही हातांनी घोटे पकडण्याचा प्रयत्न करा. आता डोकं, छाती, मांड्या वर उचला आणि शरीराचा सर्व भार पोटाच्या खालच्या भागावर आणा, हे आसन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.