What happens if you use an expired condom: पुरुष आणि महिलांनी कंडोमचा वापर करणे हा गर्भधारणा टाळण्यासाठी एक सामान्य मार्ग आहे. लैंगिक आजारांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठीही कंडोमचा वापर करणे गरजेचे आहे. फॅमिली प्लॅनिंसाठी कंडोमचा वापर केला जातो. गर्भधारणा टाळण्यासाठीदेखील कंडोमचा वापर केला जातो. तज्ज्ञ सांगतात की, असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांना आळा घालण्यात कंडोमने मोठी भूमिका बजावली आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की कंडोमचीदेखील एक्स्पायरी डेट असते आणि कंडोमदेखील कालबाह्य होतो. कालबाह्य झालेल्या कंडोमचा उपयोग केला, तर कित्येक गंभीर समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, एक्स्पायर झालेला कंडोम वापरला, तर कोणते गंभीर नुकसान होऊ शकते?
लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध कंडोमच्या एक्स्पायरी डेट्स ही मार्केटिंग गिमिक नाहीये. इतर कोणत्याही वैद्यकीय उत्पादनाप्रमाणे, त्यांचेही शेल्फ लाइफ मर्यादित असते. “कालांतराने लेटेक्स किंवा पॉलीयुरेथेन मटेरियल कमकुवत होते आणि त्याची लवचिकता गमावते, ज्यामुळे ते तुटण्याची शक्यता जास्त असते,” असे पीएसआरआय हॉस्पिटलमधील युरोलॉजीचे असोसिएट डायरेक्टर डॉ. प्रशांत जैन स्पष्ट करतात. कालबाह्य झालेलं किंवा जुन्या कंडोमचा प्रभाव अतिशय कमी असतो. कारण- एक्स्पायर झालेला कंडोम कोरडा आणि कमकुवत होत जातो. परिणामी शारीरिक संबंधादरम्यान कंडोम फाटण्याची शक्यता अधिक असते. कालबाह्य कंडोमचा वापर केल्यास तुम्हाला आणि तुमच्या साथीदाराला लैंगिक आजारांचा संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे आरोग्याशी खेळणं योग्य नाही,” असे ते पुढे इशारा देतात.
जर तुम्ही एक्स्पायर झालेला कंडोम वापरला, तर काय होईल?
”एक्स्पायर झालेले कंडोम डोळ्यांना न दिसणाऱ्या लहान भेगा निर्माण करू शकतात. जरी ते चांगले दिसत असले तरी ते सुरक्षित नसू शकतात. या लहान भेगा वीर्य किंवा संसर्गजन्य घटकांना आत जाऊ देऊ शकतात,” असे डॉ. जैन स्पष्ट करतात. “त्यामुळे गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित संसर्ग (STI) दोन्हींचा धोका थेट वाढतो.” म्हणून एकदा कंडोमची मुदत संपली की, तो वापरता येणार नाही.
साधारणतः कंडोमची एक्स्पायरी डेट तीन ते पाच वर्ष एवढी असते. कंडोम वापरण्याची मुदत त्यांच्या ब्रँड कंपनीनुसार वेगवेगळी असते. महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही कंडोम कशा पद्धतीनं सांभाळून ठेवत आहात, यावरही स्वच्छता तसेच सुरक्षिततेसंदर्भातील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात
कंडोम ठेवण्याचा योग्य मार्ग कोणता आहे
डॉ. जैन सल्ला देतात, “ते सूर्यप्रकाश आणि तीक्ष्ण वस्तूंपासून दूर थंड, कोरड्या जागी ठेवा. ड्रॉवरमध्येही ठेवू शकता; फक्त पाकीट किंवा खिशामध्ये जास्त काळ ठेवणे टाळा. बऱ्याचदा कंडोम कालबाह्य होण्यापूर्वीही खराब होऊ शकतात. स्वच्छ आणि योग्य ठिकाणी कंडोम न ठेवल्यास ते अतिशय कोरडे किंवा अतिशय चिकट होतात. अशा कंडोमचा वापर करणं टाळा. कंडोम कोरड्या आणि स्वच्छ ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. पँटचा खिसा किंवा पर्समध्ये कंडोम ठेवणं टाळा.
कंडोम एक्स्पायर झालाय हे कसं ओळखावं?
बहुतांश कंडोमच्या पाकिटावर एक्स्पायरी डेट नमूद केलेली असते. कंडोम कालबाह्य होण्याची तारीख माहीत असतानाही त्याचा वापर केला, तर मग हे लक्षात घ्या की, त्यामुळे कदाचित अनावश्यक गर्भधारणेची समस्या निर्माण होऊ शकते. तसंच कित्येक लैंगिक आजारांची लागण होण्याचीही शक्यता असते.