How To Maintain Tulsi Plant During Summer : तुळशीला हिंदू संस्कृतीत धार्मिक, आध्यामिक, वैज्ञानिक आणि आयुर्वेदिकदृष्ट्या फार महत्त्व आहे, त्यामुळे प्रत्येक दारात किंवा खिडकीत कोणतेही रोप नसले तरी अनेक जण आवर्जून तुळशीचे रोप लावतात. नवीन आणल्यानंतर ते रोप छान वाढू लागते. मात्र, काही दिवसांनी ते कोरडे पडते, वाढ खुंटते, त्यावर कीड लागते. विशेषत: उन्हाळ्यात तुळशीच्या रोपाची अधिक काळजी घ्यावी लागते, कारण या दिवसांत कडक उन्हामुळे रोप कोमेजते, पानं सुकून गळू लागतात. अशा परिस्थितीत तुळशीची रोपं हिरवीगार, टवटवीत ठेवण्यासाठी आणि त्याची योग्य काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकता.
उन्हाळ्यात तुळशीच्या रोपाची काळजी कशी घ्यायची? (Tulsi Plant Care Tips)
मातीत खतासह मिसळा ‘ही’ गोष्ट
उन्हाळ्यात तुळशीच्या रोपाची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी लोक तुळशीच्या रोपाला दररोज पाणी आणि खत घालतात, जेणेकरून ते हिरवेगार राहील. पण, यानंतरही रोपं हिरवीगार राहात नसतील तर तुम्ही मातीत खतासह राख मिसळू शकता. तुळशीच्या रोपाला राख घातल्याने त्याचे बरेच फायदे होतात.
कारण राखेमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियमसारखे घटक मुबलक प्रमाणात असतात, जे रोपाची मुळं मजबूत करण्यास तसेच जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. खतामध्ये राख मिसळल्याने रोप हिरवे राहते आणि रोपावर लवकर नवीन पालवी फुटते. तुम्ही आठवड्यातून एकदा हे केलेच पाहिजे. तुम्ही ही राख तयार करण्यासाठी लाकूड किंवा शेणाचा वापर करू शकता.
रोप सकाळी आणि संध्याकाळी सूर्यप्रकाशात ठेवा.
तुळशीचे रोप सकाळी आणि संध्याकाळी सौम्य सूर्यप्रकाशात ठेवा. दुपारच्या कडक सूर्यप्रकाशापासून त्याचे रक्षण करा. गरजेपेक्षा जास्त पाणी देणं टाळा. जास्त पाणी दिल्याने रोपाचे नुकसान होऊ शकते. सकाळी कोवळ्या उन्हात ठेवल्यानंतर दुपारी ते सावलीच्या ठिकाणी ठेवा. कारण जास्त उन्हामुळे रोप करपल्यासारखे होते. अशा परिस्थितीत कितीही पाणी दिल्यानंतर ते जास्त काळ जगू शकत नाही.