Styling your hairs daily can be dangerous: एखादा कार्यक्रम, सण किंवा खास प्रसंगावेळी महिला छान तयार होतात. अशावेळी कपडे, मेकअप आणि हेअर स्टायलिंग या महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून केल्या जातात. यावेळी तुम्ही घरीच किंवा पार्लरमध्ये एखादी हेअरस्टाईल करता. तसंच काही जणींना रोजच ब्लोड्राय किंवा कर्ल मशीन्स वारंवार वापरण्याची सवय असते. मात्र, तुमच्या या सवयी तुम्हाला भविष्यात महागात पडू शकतात बरं. स्ट्रेटनिंग, ब्लोड्राय, हेअर सिरम, क्रीम याचा अतिरेक तुमच्या केसांचं नुकसान करू शकते. एखाद्या अति प्रदूषणाच्या ठिकाणी जेवढे नुकसान तुमच्या केसांचे होऊ शकते, तेवढेच नुकसान या उपकरणांचा आणि केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केल्यानेही होऊ शकते.

अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील प्राध्यापकांनी याबाबतचा अभ्यास केला आहे. यावेळी केसांच्या स्टायलिंगसाठी वापरली जाणारी उपकरणे आणि त्याचा केसांवर होणारा परिणाम याचा अभ्यास केला गेला. केस सरळ करणारी उपकरणे, कलर्स आणि वेव्हर्स या उत्पादनांचा केसांवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला.

या अभ्यासात नेमके काय आढळले?

संशोधकांना असे आढळले की, १० ते २० मिनिटे केसांचे स्टायलिंग करण्यासाठी उष्णतेवर आधारित उपकरणांचा वापर केल्यास एक हजार कोटींपेक्षा जास्त नॅनोपार्टिकल्स हवेत सोडले जाऊ शकतात. ते श्वासामार्फत फुप्फुसांमध्ये जाऊ शकतात. याची तुलना संशोधकांनी एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी होत असलेल्या प्रदूषणाशी केली आहे.

उष्णतेवर आधारित केसांचे स्टायलिंग म्हणजेच स्ट्रेटनिंग, कर्लिंग किंवा ब्लो ड्रायिंग हे हेअर क्रीम, लोशन आणि सिरमसोबत वापरल्यास त्यातून रसायने बाहेर पडतात. या नॅनोपार्टिकल्समुळे श्वास घेण्यास त्रास होणे, फुप्फुसांमध्ये जळजळ अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. हे एक हजार कोटी नॅनोपार्टिकल्स रस्त्यावरील प्रदूषणाइतकेच हानिकारक आहे.

२०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, उष्णतेमुळे केसांच्या उत्पादनांमधून बाहेर पडणाऱ्या हानिकारक रसायनांचे प्रमाण वाढते. असेच एक रसायन म्हणजे डेकामेथिलसायक्लोपेंटासिलोक्सेन. हे रसायन हेअर स्प्रे, क्रीम आणि सिरममध्ये वापरले जाते. युरोपमध्ये काही सौंदर्यप्रसाधनांमध्ये या रसायनाचा वापर मर्यादित केला आहे, त्यामुळे केसांची स्टायलिंग करताना शक्यतो कमी उष्णता निर्माण करणाऱ्या उत्पादनांचा वापर करा. तसंच केमिकलयुक्त उत्पादने टाळण्याचा प्रयत्न करा. शिवाय केसांचे स्टायलिंग केल्यावर जरी ते सुंदर दिसत असतील तरीही या उपकरणांच्या आणि उत्पादनांच्या अतिवापरामुळे भविष्यात तुम्हाला केसांच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.