Vitamin D Kidney Damage: आजच्या आरोग्यजाणिवा असलेल्या जगात बहुतेक लोक “सूर्याचे व्हिटॅमिन” म्हणजेच Vitamin D ची पूर्तता करण्यासाठी सप्लिमेंट्स घेतात. हाडं मजबूत ठेवण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किंवा थकवा दूर करण्यासाठी अनेकांनी दररोजच्या आयुष्यात हे व्हिटॅमिन समाविष्ट केलं आहे. पण, चेन्नईतील नामांकित नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. नवीनाथ एम. (Asian Institute of Nephrology and Urology, Nungambakkam) यांनी दिलेला इशारा ऐकून तुम्हीही चकित व्हाल, कारण जास्त प्रमाणात घेतलेलं हेच व्हिटॅमिन तुमच्या किडनीला कायमचं नुकसान पोहोचवू शकतं.
‘सूर्याचं व्हिटॅमिन’ कसं ठरू शकतं धोकादायक?
डॉ. नवीनाथ यांच्या मते, Vitamin D शरीरासाठी नक्कीच आवश्यक आहे, पण त्याचं “अति सेवन” म्हणजे शरीरासाठी एक संथ विषासारखं ठरू शकतं. “आरोग्यासाठी चांगलं असलेलं हे व्हिटॅमिन जर प्रमाणाबाहेर घेतलं, तर ते हळूहळू किडनीला हानी पोहोचवतं आणि काही वेळा ती कायमची निकामीसुद्धा होऊ शकते,” असं ते सांगतात.
अनेक लोक सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे किंवा सोशल मीडियावरच्या आरोग्य सल्ल्यांवर विश्वास ठेवून सप्लिमेंट्स घेतात. पण, डॉक्टरी सल्ल्याशिवाय घेतलेली Vitamin D 60000 IU गोळी रोज घेणं ही सर्वसामान्य पण अत्यंत धोकादायक चूक आहे. ही गोळी आठवड्यातून एकदाच घ्यायची असते; रोज घेतल्यास रक्तातील कॅल्शियमचं प्रमाण धोकादायक पातळीवर वाढतं, ज्याला ‘हायपरकॅल्सिमिया’ म्हणतात.
अति Vitamin D किडनीला कसं नुकसान करतं?
डॉ. नवीनाथ सांगतात, “जेव्हा शरीरात खूप जास्त कॅल्शियम जमा होतं, तेव्हा किडनी त्याला फिल्टर करण्यासाठी जास्त काम करत राहते. हळूहळू कॅल्शियम किडनीच्या ऊतींमध्ये साठतं आणि ‘किडनी स्टोन’ तयार होतो. काही प्रकरणांमध्ये हे साठलेले कॅल्शियम ‘नेफ्रोकॅल्सिनोसिस’मध्ये बदलतात, म्हणजे कायमचा कॅल्शियमचा थर जमा होऊन किडनीचे फिल्टरिंग सिस्टमच बिघडतं.”
यामुळे काही रुग्णांना अकस्मात किडनी इजा (Acute Kidney Injury) होऊ शकते, तर काहींच्या बाबतीत किडनी फेल्युअरपर्यंत स्थिती जाऊ शकते.
ओव्हरडोसमुळे दिसणारी ६ चेतावणी चिन्हं
डॉ. नवीनाथ यांच्या मते, Vitamin D चे जास्त प्रमाण शरीरात गेल्यावर काही काळ कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. पण एकदा त्रास सुरू झाला की शरीर काही स्पष्ट संकेत देतं
- सतत मळमळ, उलट्या होणं
- नेहमी तहान लागणं
- वारंवार लघवी होणं
- स्नायूंमध्ये अशक्तपणा
- गोंधळलेपणा किंवा थकवा
- कंबर किंवा बाजूला वेदना (किडनीच्या भागात)
अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे सूज, श्वास घ्यायला त्रास आणि अत्यंत थकवा हे किडनी निकामी होण्याची प्रारंभिक चिन्हं असू शकतात.
ओव्हरडोस टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला
डॉ. नवीनाथ म्हणतात, “जास्तीतजास्त लोकांमध्ये ओव्हरडोस हा चुकीच्या सल्ल्याने किंवा स्वतःच औषध घेण्याने होतो. एकाच वेळी अनेक Vitamin D उत्पादने घेणे, न तपासलेल्या इंजेक्शन्सचा वापर करणे, हे सर्व धोकादायक ठरू शकतं.”
सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी दिलेले उपाय:
- फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सप्लिमेंट घ्या
- ठरलेली डोस मर्यादा कधीही ओलांडू नका
- लांब काळासाठी सप्लिमेंट घेत असाल तर रक्तातील Vitamin D आणि Calcium ची तपासणी नियमित करा
लक्षात ठेवा : शरीरासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशसुद्धा मर्यादेतच चांगला. आरोग्य जपायचं असेल तर “जास्त” नव्हे, तर “योग्य प्रमाणात” घेणं हेच खरं आरोग्याचं रहस्य आहे.
