Foods Not To Cook In Pressure Cooker : स्वयंपाकघरात प्रत्येक भांडी त्या-त्या पदार्थांसाठी नेमून ठेवलेली असतात. त्यात डाळीसाठी टोप, पोळी भाजण्यासाठी तवा, भात शिजवण्यासाठी कुकर, पुरी तळण्यासाठी कढई आदींचा समावेश असतो. पण, सगळ्यात जास्त आपण प्रेशर कुकरचा वापर करतो, कारण कुकरमुळे वेळ वाचतो आणि झटपट जेवण करण्यातसुद्धा मदत होते. पण, वेळ वाचवण्यासाठी तुम्ही सगळेच पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवत असाल तर थांबा. यामुळे अन्नाचे पौष्टिक मूल्य नष्ट होते. काही पदार्थांमध्ये तर आरोग्यदायी नसलेली संयुगे तयार होऊ शकतात, म्हणून आपण कोणते पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

प्रेशर कुकरमध्ये कोणते पदार्थ शिजवू नये?

१. पालक किंवा कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणाऱ्या झुकिनी किंवा ब्रोकोली यांसारख्या मऊ भाज्या गॅसवर काही मिनिटांतच शिजतात. पण, प्रेशर कुकरमध्ये या भाज्या शिजवल्यामुळे जास्त उष्णता, वाफेमुळे त्यांचा रंग, पोत आणि पोषक तत्वे कमी होऊ शकतात.

२. पास्ता, नूडल्स किंवा मॅकरोनीसारखे पदार्थ खूप लवकर पाणी शोषून घेतात. प्रेशर कुकरमध्ये पाण्याचे आणि पास्ताचे अचूक प्रमाण निश्चित करणे कठीण जाते, ज्यामुळे मुलांचे हे आवडते पदार्थ बनवताना त्यामध्ये गुठळ्या, चिकटणे किंवा मऊपणा येऊ शकतो.

३. पोम्फ्रेट, सॅल्मन किंवा कोळंबीसारखे नाजूक मासे फक्त काही मिनिटे सौम्य शिजवावे लागतात. तुम्ही मासे कुकरमध्ये शिजवल्यास उच्च दाबामुळे जास्त शिजून मांस रबरी किंवा कोरडे होते. पण, मासे वाफवणे, ग्रिलिंग किंवा पॅन-सीअरिंग, सीअरिंग यावर नियंत्रित आचेवर शिजवल्यास त्याची चव आणि पोषण मूल्ये टिकून राहतात.

४. दूध, क्रीम किंवा चीजवर आधारित एखादी रेसिपी जसे की खीर, कस्टर्ड किंवा पनीर कुकरमध्ये अजिबात बनवू नका. जास्त तापमान, प्रेशरमुळे दुधाचे पदार्थ पटकन फाटतात आणि गुठळ्या होतात. पण, हेच जर तुम्ही कमी आचेवर शिजवलं तर मऊ आणि गुळगुळीत राहून पदार्थ खराब होण्याचाही धोका कमी असतो.

५. प्रेशर कुकरमध्ये ओव्हनसारखे वातावरण तयार होत नाही. कुकरमध्ये जास्त वाफ असल्यामुळे केक फुलण्याऐवजी जाडसर व दाट होतो. त्याचप्रमाणे ब्रेड किंवा कुकीजला कुरकुरीत थरसुद्धा मिळत नाही. काही लोक कुकरमध्ये केक करून पाहतात, पण त्याचा पोत कधीच ओव्हनमध्ये केलेल्या केकसारखा हलका व मऊसर लागत नाही.