Banana Vs Apple Weight Loss : फळे म्हणजे आरोग्याचा एक खजिनाच आहेत. फळे खाल्ल्याने शरीराला विविध पोषक तत्वे मिळतात. शिवाय, फळे केवळ आरोग्यच नाही तर सौंदर्य देखील राखण्यास मदत करू शकतात. वजन वाढणे, कमी करणे या दोन्हीसाठी फळे फायदेशीर मानली जातात. यापैकी केळी आणि सफरचंद दोन्ही फळे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. केळी ऊर्जा वाढवतात तर सफरचंदांमध्ये भरपूर फायबर असतात. पण तुम्हाला माहिती आहे का वजन कमी करण्यासाठी यापैकी कोणते फळ चांगले आहे. तर चला त्याचबद्दल या बातमीतून जाणून घेऊयात…

दोन्ही फळांमध्ये किती कॅलरीज असतात?

केळी आणि सफरचंदांमध्ये वेगवेगळ्या कॅलरीज आणि पोषक घटक असतात. म्हणून, त्यांना खाण्याचे फायदे देखील वेगळे आहेत. मध्यम आकाराचे केळी खाल्ल्याने अंदाजे १०५ ते १०५ कॅलरीज मिळतात तर २५ ते २८ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि सुमारे ३ ग्रॅम फायबर मिळते. तर सफरचंद खाल्ल्याने अंदाजे ९५ कॅलरीज, २५ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि ४ ग्रॅम फायबर मिळते. केळीमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी६ देखील असते.

वजन कमी करण्यासाठी कोणते फळ खाल्ले पाहिजे?

केळीमध्ये सफरचंदांपेक्षा जास्त साखर असते. म्हणून, जर तुम्हाला व्यायामासाठी त्वरित उर्जेची आवश्यकता असेल तर तुम्ही केळी खावीत. दुसरीकडे, सफरचंदांमध्ये कमी कॅलरीज असतात; त्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार तुम्ही दोन्ही फळे वेगवेगळ्या वेळी खाऊ शकता. वजन कमी करायचे असल्यास शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहून संतुलित आहार घ्या आणि त्याबरोबर दोन्ही फळे खा.