White or Brown Eggs Which Is Better: अंड्यातील प्रथिने, जीवनसत्व शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अंड्यांमध्ये चांगले फॅट्स आणि अंटीऑक्सिडंट्स घटक असतात जे मेंदू आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. यापूर्वी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना मुंबई येथील भाटिया हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. सम्राट शाह यांनी सांगितले की, आठवड्यातून सात अंडी खाणे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित ठरू शकते. पण अंड्याचा शरीरावर कसा प्रभाव होतो हे व्यक्तिपरत्वे बदलू शकते. अंड्याच्या सेवनाच्या जशा अनेक पद्धती आहेत तसे सेवनाशी जोडलेले अनेक समज- गैरसमज सुद्धा आहेत. यातील एक नेहमीच चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे अंड्याच्या कवचाचा रंग पांढरा असणे उत्तम आहे की तपकिरी? मुळात हा रंगाचा फरक कशामुळे होतो व त्याचा पोषणाशी काय संबंध आहे हे आपण जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंड्याच्या टरफलाचा रंग वेगवेगळा का असतो?

तपकिरी आणि पांढर्‍या अंड्यांमधला रंगाचा फरक पूर्णपणे वरवरचा असतो आणि तो कोंबडीच्या प्रजातीनुसार ठरवला जातो. तपकिरी अंडी सामान्यत: ऱ्होड आयलँड रेड्स किंवा प्लायमाउथ रॉक्स सारख्या प्रजातींच्या कोंबड्यांची असतात तर पांढरी अंडी सामान्यतः लेघॉर्नसारख्या प्रजातींच्या कोंबड्यांची असतात. अंड्याच्या टरफलाचा रंग पौष्टिक गुणवत्तेशी संबंधित नाही.

पौष्टिक मूल्ये

पौष्टिकदृष्ट्या, तपकिरी आणि पांढऱ्या दोन्ही अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे तुलनेने समसमान असतात. दोन्ही प्रकारची अंडी व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, रिबोफ्लेविन, सेलेनियम आणि कोलीन सारखे आवश्यक पोषक प्रदान करतात, हे चांगले आरोग्य राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. दोन प्रकारच्या अंड्यांमधील चव किंवा पौष्टिक मूल्यांमधील फरक कमी आहे आणि रंगाचा एकूण फायद्यांवर लक्षणीय परिणाम होत नाही.

जितका जास्त खर्च, तितकं जास्त पोषण?

एक सामान्य गैरसमज असा आहे की तपकिरी अंडी आरोग्यदायी असतात कारण त्यांची किंमत जास्त असते. हा गैरसमज आहे. तपकिरी अंडी देणार्‍या प्रजाती च्या कोंबड्या आकाराने मोठ्या असतात आणि त्यांच्यासाठी जास्त खाद्य आवश्यक असते, ज्यामुळे उत्पादन खर्च वाढतो यामुळे या अंड्यांची किंमत जास्त असते. किमतीतील फरक हा पोषणाशी संबंधित नाही.

हे ही वाचा<< परिणीती चोप्राचं तासाला १००० कॅलरीज बर्न करणारं ‘कलरीपयट्टू’ रुटीन तुम्हीही करू शकता, डॉक्टरांनी सांगितलं कशी होते मदत?

कोंबड्यांच्या आहाराचे आणि राहणीमानाचे महत्त्व

अंड्याच्या पौष्टिक गुणवत्तेवर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे कोंबड्यांचा आहार आणि राहणीमान. मोकळ्या वातावरणात वाढवलेल्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड जास्त प्रमाणात असू शकते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, ज्या कोंबड्या सूर्यप्रकाशात वावरू शकतात त्यांच्या अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण तिप्पट ते चौपट जास्त असते. हा मुद्दा तपकिरी आणि पांढर्‍या दोन्ही अंड्यांना लागू होतो आणि हे कवचाच्या रंगापेक्षा कोंबडीच्या जीवनशैली आणि आहारावर आधारित आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: White or brown eggs which is better in nutrition why egg shells has different colour what does it mean which eggs are perfect svs