चार्ली चॅप्लिनने ‘मॉडर्न टाइम्स’ या चित्रपटात यांत्रिकीकरणाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम दाखवला होता. त्यानंतर यांत्रिकीकरण खूपच झाले. आता प्रत्येकाच्या हातात मोबाइल नावाचे यंत्र आले. आता आपण नात्यांकडेही वस्तूंसारखे पाहायला लागलो आहोत. ११वीतील एक मुलगी म्हणाली की, माझे आईबाबा म्हणजे माझ्यासाठी एटीएम मशीन आहेत. हवे तेव्हा, हवे तेवढे पसे पुरवणारे यंत्र.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यांत्रिक प्रश्न- यांत्रिक उत्तरे
माणसाला विचार, भावना, मते, आवडीनिवडी व कल्पना असतात. मानवी नात्यामध्ये यांची देवाणघेवाण होत असते. जेव्हा मानवी नात्यामध्ये फक्त व्यावहारिक गोष्टी व वस्तूंची देवाणघेवाण होते, तेव्हा ते नाते
यांत्रिक बनायला लागते. पहिली ते चौथीपर्यंत बहुतेक पालक मुलांचा अभ्यास घेतात. त्या निमित्ताने संवाद होतो. मूल पाचवीत आल्यावर अभ्यास वाढला म्हणून क्लासला घातले जाते. आता आईवडील व्यग्र आणि मूलही त्याच्या अभ्यासात व्यग्र. अनेकदा दोघांची वेळ
जुळत नाही. मग समोरासमोर आल्यावर पालक विचारतात ‘‘शाळेतून कधी आलास? डबा खाल्लास? गृहपाठ दिलाय? गृहपाठ केलास? क्लासला गेला होतास? उद्या कोणता क्लास आहे? काही आणायला सांगितले आहे का? प्रोजेक्ट दिलाय?’’ वगरे यावर मुले उत्तर देतात ‘‘२ वाजता, हो, हो, नाही, जातोय, गणित, नाही, देणार आहेत.’’ अक्षरश: एका किंवा दोन शब्दात उत्तरे असतात. अशा निव्वळ व्यवहारी प्रश्नांना अशी यांत्रिक उत्तरेच मिळणार.

पालक- मुलांमध्ये दरी
पाचवी ते सातवीदरम्यान पालक व मुलांमधील संवाद कमी व्हायला लागतो. तोकडा व्हायला लागतो. मुले आठवीत गेली आणि वयात यायला लागली की त्यांना बाहेरच्या जगाबद्दल जाणून घ्यायचे असते. मग पालकांना वाटते की आता या मुलांचे घराकडे लक्षच नसते. यांना आता मित्र-मत्रिणीच महत्त्वाच्या वाटायला लागतात. अचानक पालकांना या दरीची जाणीव होते. ही दरी बनायची सुरुवात तर आधीच झाली होती.

समस्या सोडवण्याची चुकीची पद्धत
एक सहावीतील मुलगी सतत आजारी असते. शाळा बुडते. मी तिला विचारले की, घरी असल्यावर तू काय करतेस? ती म्हणाली की पुस्तके वाचते, खेळते. मी विचारले की, टीव्ही पाहतेस? उत्तर-नाही. प्रश्न- का? उत्तर-केबल काढली आहे. प्रश्न- तू शाळेत जात नाही म्हणून? उत्तर- फक्त सुट्टीत केबल लावतो. प्रश्न- हे असे कधीपासून? उत्तर- तिसरीपासून. या मुलीचे आई-वडील दोघेही कामावर जातात. आई रोज जायच्या आधी आज काय अभ्यास करायचा ते लिहून देते. संध्याकाळी आल्यावर अभ्यास घेते. प्रश्न- तू गप्पा कोणाशी मारतेस? उत्तर- बाहुलीशी. आईची तक्रार की रात्री लवकर झोपत नाही. बाबांचा लॅपटॉप व मोबाईल घेऊन खेळत बसते. आई म्हणते तू माझे ऐकत नाहीस, अभ्यास करत नाहीस ना? माझ्याजवळ येऊ नकोस. मुलगी म्हणते, मग माझ्या बाहुलीला तरी जवळ घेते. प्रश्न- बाबा घरी आल्यावर काय करतात? उत्तर- ते अख्खा वेळ मोबाइलवर बोलत असतात.

पालकांनी काय करायला हवे?
पालकही मुलांना निव्वळ अभ्यास करणारे मशीन समजायला लागले आहेत. मुलांचा मूल म्हणून, माणूस म्हणून स्वीकार केला जात नाही. मग ही मुले स्वतला कॉम्प्युटर व मोबाइलच्या मायावी जगात रमवतात. आपले मुलासोबतचे नाते यांत्रिक बनायचे नसेल तर जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. आता मुलांना सुटय़ा लागल्या आहेत, तेव्हा सुरुवात करा. रोज किंवा एक वा दोन दिवसाआड मुलांशी किमान १५ मिनिटे गप्पा मारा. या गप्पा अभ्यास सोडून असायला हव्यात. या गप्पा असल्याने त्यात मुलांचे म्हणणे ऐकायचे असते. लगेच उपदेश करायला जाऊ नये. त्यातून लगेच मुलांचे दोष दाखवायला जाऊ नका. एकमेकांचे अनुभव ऐकून घ्या. शाळा सुरू झाल्यावरही हा उपक्रम चालू ठेवा.
मुलांच्या भावना, विचार, मते व कल्पना ऐकून घेणे म्हणजे त्यांच्या माणूस असण्याचा स्वीकार करणे. आपल्याही भावना, विचार, मते व कल्पना यांची आपण देवाण-घेवाण करतो, तेव्हा ते नाते मानवी बनते. गप्पा मारून पाहा व काय फरक पडला तो मला कळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why children not talking with you