तिचं जग
स्त्रियांना हमखास ऐकायला मिळणारी दोन वाक्यं- ‘तब्येत सुधारली तुझी’ आणि ‘बारीक झालीस गं तू.’ पण ती उच्चारताना त्या स्त्रीच्या जाड आणि बारीक होण्यामागची कारणं मात्र विचारली जात नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडचं एक निरीक्षण आहे. कोणत्याही कौटुंबिक समारंभ- सोहळ्यात काही वाक्यं हमखास ऐकायला मिळतात. अशा समारंभांमध्ये बऱ्याच दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी भेटणारे नातेवाईक- आप्तेष्ट आवर्जून एकमेकांची चौकशी करतात. कसे आहात, तब्येत काय म्हणतेय, आता सध्या काय सुरू आहे, वगरे वगरे गप्पाटप्पावजा चौकशीचा कार्यक्रम होतो. खऱ्या अर्थाने तिथं जो कौटुंबिक सोहळा सुरू असतो त्यात हा चौकशीचा छोटा कार्यक्रम स्वतंत्रपणे सुरू असतो. याचा अनुभव अनेकांना नक्कीच येत असणार. खरा मुद्दा पुढेच आहे. या गप्पांच्या मैफीलीची सुरुवात पुष्कळदा ठरावीक वाक्याने होते; ती म्हणजे ‘अगं, किती बारीक झालीस तू’, ‘तब्येत सुधारली तुझी’, ‘अरे वा.. आता थोडी तरी भरल्यासारखी वाटत्येस’. आता या वाक्यांमध्ये असलेला अर्थ खरं तर वेगळा असतो. ‘अगं, किती बारीक झालीस तू’ या वाक्यात ‘किती जाडी होतीस आणि आता बारीक झालीएस’ हा अर्थ दडलाय. ‘तब्येत सुधारली तुझी’मध्ये ‘जाडी झालीएस’; तर ‘अरे वा.. आता थोडी तरी भरल्यासारखी वाटत्येस’मध्ये ‘किती किडकिडीत होतीस, आता जरा बरी दिसत्येस’ असे अर्थ लपले आहेत. थोडक्यात काय, मुलीच्या जाड आणि बारीकपणाबद्दल लोकांनाच जास्त काळजी असते हे बहुतांश समारंभांत ऐकायला मिळणाऱ्या अशा संवादांतून अधोरेखित होतं.

मुलीचं जाड आणि बारीक असणं यावर अनेक कॉमेंट्स केल्या जातात. पुष्कळदा या कॉमेंट्स करणाऱ्या स्त्रियाच असतात. पूर्वी जाड असलेली एखादी मुलगी बारीक झाली की ती पूर्वी किती जाड होती याची जाणीव करून दिली जाते. तिला नको असेल तरी त्याविषयी बोललं जातं. त्यानंतर कशी बारीक झाली वगरेचं चौकशी सत्र सुरू होतं. मग आता ‘बारीकच राहा’ असा सल्लाही दिला जातो आणि ते ती कसं टिकवून ठेवू शकते याबद्दल सूचनाही केल्या जातात, तिला नको असताना! असंच बारीक असणाऱ्या मुलींचंही होतं. तिलाही तब्येत सुधारण्याबाबत सल्ले दिले जातात. तिला ठरवू द्या ना तिला कसं राहायचं आहे ते. तिच्यात शारीरिक बदल झाला आहे हे तिलाही माहिती आहेच ना. म्हणजे ती त्याची काळजी नक्कीच घेणार. मग उगाच कशाला तिच्या जाड आणि बारीकपणाबद्दल चर्चा?

लग्नासाठी स्थळ बघताना सगळ्यात आधी मुलीचा आणि मुलाचा फोटो बघितला जातो. मुला-मुलीचे फोटो बघून थोडंफार तिच्या आणि त्याच्या दिसण्यावर बोललंही जातं. प्रथमदर्शनी तो फोटो पसंत पडला तर तिथूनच गाडी पुढे सरकते, पण मुलीचा फोटो बघितला की, ‘ही नको. किती जाडी आहे’ किंवा ‘खूपच बारीक आहे. त्याला सूट होणार नाही’ असे शेरे दिले जातात. अर्थात ही शेरेबाजी मुलाचा फोटो बघूनही होत असते, पण मुलींच्या बाबतीत होत असलेलं प्रमाण थोडं जास्त आहे, असं आपण नक्की म्हणू शकतो. ३० हजार पगार असलेली मुलगी लग्नासाठी जेव्हा ६० हजार पगार असलेल्या मुलाची अपेक्षा करते तेव्हा तिच्या या अपेक्षेला नावं ठेवली जातात. आधी स्वत:कडे बघावं, नंतर अशा अपेक्षा कराव्यात, असा टोमणाही मारला जातो. पण असंच मुलींच्या जाड-बारीकपणाबद्दलही होतं. मुलगा मुलीचा फोटो बघून ‘ही खूपच जाडी आहे’ किंवा ‘बारीक आहे’ असं म्हणतो तेव्हा तो स्वत:ला आरशात बघायला विसरतो का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

‘किती जाडी झालीस तू’ किंवा ‘किती बारीक झालीस तू’ हे उद्गार बहुतांश वेळा कौटुंबिक समारंभात ऐकायला मिळतात. पण ‘का जाडी झालीस तू किंवा इतकी बारीक कशी झालीस; काही प्रॉब्लेम आहे का’ असं फारच क्वचित विचारलं जातं. पण एखाद्या मुलीच्या जाडेपणा किंवा बारीकपणाला कोणतं कारण आहे, हे कोणालाच जाणून घ्यावंसं वाटत नाही. ती आधीपेक्षा कशी वेगळी दिसायला लागली आहे याकडे बोट दाखवलं जातं आणि त्यावर चर्चा होत असते. मग ती कशामुळे जाड किंवा बारीक झाली आहे याबद्दलची त्यांची काल्पनिक कारणमीमांसा तेच ठरवतात. पण त्यापकी कोणालाही त्याची शहानिशा करावीशी वाटत नाही.

एखादी मुलगी बारीक असेल किंवा मुळातच तब्येतीने व्यवस्थित असेल आणि लग्नानंतर जाड झाली असेल तर तिला हमखास एक वाक्य ऐकावं लागतं; ‘लग्न मानवलं तुला.’ मग ते तिच्या सासरचे असोत किंवा माहेरचे. दोन्हीकडचे नातेवाईक तिला हे ऐकवतात. ‘लग्न मानवलं तुला’ या वाक्यात दोन अर्थ आहेत. एक शारीरिक संबंधांशी जोडला आहे आणि दुसरा कौटुंबिक वातावरणाशी. शारीरिक संबंध म्हणजे त्या मुलीला संसारसुख उत्तम लाभलंय आणि कौटुंबिक वातावरण म्हणजे सासरकडची माणसं चांगली आहेत, तिथं तिच्या जेवणाखाणाची आबाळ होत नाही. तिथली मंडळी तिच्याशी व्यवस्थित वागतात. या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. पण हे कोणत्याही मुलीच्या बाबतीत होत असतं. मग असं चारचौघांत फक्त तिलाच पॉइंट आऊट करून तिला माहीत असलेलीच गोष्ट पुन्हा का सांगावी? खरं तर स्त्रीच्या शारीरिक प्रकृतीतले काही बदल अपेक्षित असतातच. म्हणजे ते प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत घडतातच. शारीरिक संबंधांनंतर स्त्रीमधल्या संप्रेरकांमध्ये (हार्मोन्स) होत असलेले बदल अगदी स्वाभाविक आहेत. असेच काही बदल तिच्या गरोदरपणात आणि नंतर बाळंतपणातही दिसतात. हे सगळं माहीत असूनही तिच्या शारीरिक बदलाकडे बोट दाखवलं जातं. कोणत्याही व्यक्तीच्या शारीरिक रचनेत ठरावीक काळानंतर बदल होतच असतात. हा विज्ञानाचा नियमच आहे. मग त्यात स्त्री ठरावीक वर्षांनंतर वेगळी दिसायला लागली, जाड किंवा बारीक झाली तर त्यात विशेष असं काहीच नाही.

बारीक असण्यावरही बरीच चर्चा केली जाते. एखादी मुलगी मुळातच बारीक असेल, तिच्या शरीराची  ठेवणच तशी असेल तर ती तरी काय करणार? अशा बारीक मुलीचं लग्न झाल्यानंतरही ती बारीकच राहिली तर त्यावरूनही तोंडसुख घेतलं जातं. ‘लग्नानंतरही तब्येत सुधारली नाही तुझी. सासरकडचे काही खायला वगरे देत नाहीत का’ असं विचारलं जातं. हे सगळं गमतीने असलं तरी त्या विचारण्यामागे बऱ्याचदा ‘सासरी सगळं बरंय ना’ हा छुपा खवचट प्रश्न असतो. त्या मुलीला सासरी व्यवस्थित खायला वगरे देत नाहीत, तिची काळजी घेत नाहीत म्हणून ती बारीकच आहे असा तर्क थोडय़ा वेळासाठी ग्राह्य़ धरला तरी एक प्रश्न उरतोच. त्या मुलीला खायला देत नाहीत म्हणून ती बारीक असेल तर मग तिच्या माहेरीसुद्धा तिची नीट काळजी घेतली गेली नसेल का? कारण ती तर जन्मापासूनच बारीक होती. तिची तशी ठेवणच होती. थोडक्यात, लग्नानंतरही ती मुलगी बारीकच राहिली तर सासरी काही तरी गडबड आहे हे समीकरण पूर्णत: चुकीचं आहे.

जाड किंवा बारीक असणं हे व्यक्तीच्या जनुकांवरून (जीन्स) ठरतं. त्या मुलीच्या पालकांच्या शारीरिक रचनेनुसार तिच्या शरीराची रचना ठरत असते. मुलगी पौगंडावस्थेत येताना तिच्या शरीररचनेत बदल होत असतात. मुलीची स्त्री होताना तिच्यात आपसूकच बदल होत असतात. तिच्या मासिक पाळीच्या वेळीही काही बदल होतात. जाड किंवा बारीक होण्यामागे मासिक पाळीतली अनियमिततासुद्धा प्रामुख्याने कारणीभूत असते. काहींना मानसिक ताणामुळे जडत्व येतं, तर काही त्याच कारणामुळे बारीकही होतात. बाळंतपणानंतरही काही स्त्रिया जाड होतात, तर काहींची बारीक असण्याचीच ठेवण असल्यामुळे त्या बाळंतपणानंतरही तशाच असतात. या सगळ्या कारणांव्यतिरिक्तही जाड-बारीक होण्याची इतरही अनेक कारणं असतात, पण या कारणांकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केलं जातं. तिच्या जाड आणि बारीकपणावरून तिला नेहमी हिणवलं जातं. या हिणवण्यापेक्षा तिला जर त्याच्या कारणांविषयी वेगळ्या भावनेने विचारलं तर तिलाही अवघडल्यासारखं होणार नाही.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com / @chaijoshi11
सौजन्य – लोकप्रभा

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You become fat lokprabha article