श्वासाचा आवाज हा १० डेसिबल तर पानांच्या सळसळण्याचा आवाज २० डेसिबलपर्यंत जातो. सामान्य आवाजातील संभाषण हे ६० डेसिबल असते. ध्वनिप्रदूषण नियमन कायद्यानुसार निवासी क्षेत्रातील आवाजाची मर्यादा ५५ डेसिबल आहे. त्यानुसार सामान्य आवाजातील सततचे संभाषणही ध्वनिप्रदूषणात मोडते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंगाट होतो आहे, हे समजण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानातील कोणत्याही किचकट संकल्पना समजण्याची गरज नाही. कानाला आणि पर्यायाने मेंदूला-शरीराला त्रास देणारा मोठा आवाज म्हणजे गोंगाट. पण केवळ गोंगाट म्हणजेच ध्वनिप्रदूषण असे मात्र नाही. बुचकळ्यात पडलात का? मोठा आवाज नसतानाही ध्वनिप्रदूषण कसे होत असेल, ही शंका साहजिक आहे. मात्र ध्वनिप्रदूषणाबाबत जागतिक आणि भारतातील निकष पाहिले की ध्वनिप्रदूषणाबाबत किती साकल्याने विचार केला आहे ते लक्षात येते.
नेहमीप्रमाणेच भारतात ध्वनिप्रदूषणाबाबत जागृती उशिरानेच सुरू झाली. हवा, पाणी प्रदूषणाच्या तुलनेत तर कितीतरी उशिरा. या दोन्ही प्रदूषणाप्रमाणेच आवाजाचे प्रदूषण हीदेखील शहरांचीच देणगी आहे. भारतात ध्वनिप्रदूषणाबाबत नियम तयार झाले ते २००० मध्ये. यानुसार एखाद्या क्षेत्रात नेमका किती आवाज असावा किंवा आवाजावर किती मर्यादा असावी याचे निकष ठरवण्यात आले. त्यानुसार शांतता क्षेत्र (ज्यात रुग्णालये, शाळा, धार्मिक स्थळ, न्यायालये आदी ठिकाणे येतात), निवासी क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र आणि औद्य्ोगिक क्षेत्र असे चार विभाग करण्यात आले. या प्रत्येक ठिकाणी दिवसा व रात्रीच्या वेळी आवाजाची मर्यादा ठरवली गेली. शांतता क्षेत्राच्या १०० मीटरच्या परिसरात सकाळी सहा ते रात्री १० या वेळेत ५० डेसिबल (ए) तर रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत ४० डेसिबलपलीकडे आवाज पोहोचल्यास ते प्रदूषण म्हणून गणले जाते. निवासी क्षेत्रास सकाळी ५५ डेसिबल तर रात्री ४५ डेसिबलची मर्यादा आहे. व्यावसायिक क्षेत्रात अनुक्रमे ६५ व ५५ डेसिबल तर औद्य्ोगिक क्षेत्रात ही मर्यादा ७५ व ७० डेसिबलपर्यंत ठेवण्यात आली आहे. यातील ए म्हणजे मानवी कानांनुसार केलेली आवाजाची वर्गवारी.
गणेशोत्सव, दिवाळीदरम्यान अनुक्रमे मिरवणुका व फटाक्यांचे होणारे आवाज व त्याविषयीच्या बातम्यांमधून डेसिबल ही संकल्पना सतत डोकावत राहते. मात्र डेसिबल म्हणजे नेमके किती याबाबत मात्र अनेकांच्या मनात शंका असते. आता डेसिबल म्हणजे नेमके काय ते लक्षात घेऊ या. भूकंप जसा रिश्टर स्केलवर मोजला जातो तसा आवाज डेसिबल पातळीत मोजला जातो. महत्त्वाचे म्हणजे लांबी मोजल्याप्रमाणे किंवा तापमापकातील अंशांप्रमाणे हे एकक नसतात. हे लॉगरेथमिक एकक आहेत. म्हणजे आवाज आणि मानवी ग्रहणक्षमता यातील गुणोत्तर. २० सेंटिमीटर हे ४० सेंटिमीटरच्या अर्धे असतात. २५ आणि ३० अंश से किंवा ३० ते ३५ अंश से. मध्ये पाच अंश से.चाच फरक असतो. डेसिबल किंवा रिश्टर स्केल मात्र तसे नसतात. प्रत्येक दहा डेसिबलच्या फरकाने आवाजाची तीव्रता दसपटीने वाढलेली असते. २० डेसिबलपेक्षा ३० डेसिबल हा आवाज दहापट अधिक असतो. ४० डेसिबलपेक्षा ५० डेसिबल हा आवाज दहापट असल्याचा निदर्शक असतो. आता डेसिबल आणि प्रत्यक्ष आवाज याची तुलना करू या. आपण श्वास घेतो किंवा टाचणी पडते तेव्हा येणारा आवाज हा साधारणत: १० डेसिबल असतो. त्यापेक्षा दुप्पट आवाज असतो तो पानांच्या सळसळण्याचा. या आवाजाची पातळी २० डेसिबलपर्यंत जाते. या कानाचा आवाज दुसऱ्या कानापर्यंत पोहोचणार नाही अशा बेताने कुजबुजले की तो आवाज पोहोचतो ३० डेसिबलपर्यंत. शांत असलेल्या वाचनालयात पायरव, पुस्तक ठेवणे, खुर्ची बेताने सरकवणे यांचा आवाज जातो. ४० डेसिबलच्या घरात तर पावसाच्या हलक्या सरीचा आवाज असतो सुमारे ५० डेसिबलचा. आपण सामान्य आवाजात बोलतो तेव्हा त्या संवादाची धार ६० डेसिबलपर्यंत पोहोचते. या आवाजापेक्षा दहापट आवाज होतो तो वाहतुकीचा म्हणजेच ७० डेसिबलचा. घडय़ाळाचा कर्णकर्कश अलार्म वाजतो ८० डेसिबलपर्यंत. कारचे हॉर्न, लाउडस्पीकर्सचे आवाज तब्बल ११० डेसिबलपर्यंत तर फटाक्यांचे आवाज अगदी १४० डेसिबलपर्यंतही पोहोचतात.
ध्वनिप्रदूषणाची पातळी लक्षात घेतली तर सामान्य आवाजातील संवादही ध्वनिप्रदूषण ठरते. याचाच अर्थ सातत्याने सामान्य आवाजातील संभाषणही सुरू असले तरी ते आपल्या मेंदूसाठी चांगले नाही. महत्त्वाचे म्हणजे वाहतुकीचा आवाज हा केवळ १० डेसिबलने जास्त असला तरी प्रत्यक्षात सामान्य आवाजातील संभाषणापेक्षा त्याची तीव्रता मात्र दसपटीने वाढलेली असते. या तुलनेत लाउडस्पीकर्स आणि फटाक्यांचे आवाज हे नेहमीच्या आवाजाच्या अनेकपट जास्त असतात. त्यामुळे प्रत्यक्ष मर्यादेच्या तुलनेत फटाक्यांचे, मिरवणुकांचे आवाज केवळ दुप्पट वाटत असले तरी त्यामुळे कानांची व पर्यायाने मेंदूची होणारी हानी ही कितीतरी अधिक असते. ध्वनिप्रदूषणाचा विचार करताना हे लक्षात घ्यायलाच हवे.

प्राजक्ता कासले – Prajakta.kasale@expressindia.com

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is noise pollution