बर्फात हुंदडायला, खेळायला, फिरायला सर्वानाच आवडते. पण थेट बर्फाच्या हॉटेलातच राहायचं आणि बर्फाच्या चर्चमध्ये लग्न करायचं हे पचनी पडायला जरा कठीण आहे. पण, नॉर्दर्न लाइट पाहायला जाताना हा अनोखा बर्फानुभव एकदा तरी घ्यायला हरकत नाही.
गेल्या काही वर्षांत नॉर्दर्न लाइट पाहायला जाणं हे आपल्या परदेशातील पर्यटनाच्या अजेंडय़ावर असलं तरी नॉर्दर्न लाइटच्या जोडीनेच ह्य़ा बर्फाच्छादीत हॉटेल्स जगावेगळा अनुभव आणि थेट सांताच्या गावाला भेट देणं ह्य़ा दोन अनोख्या गोष्टींकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही. बर्फाच्या हॉटेलची मूळ संकल्पना जर्मनांची. फिनलॅण्ड, जपान, कॅनडा, नॉर्वे, स्वीडन या देशांत अशी काही हॉटेल्स आहेत. पण नॉर्दर्न लाइट पाहायला जाताना किरुना येथे आइस हॉटेल पाहायचं आणि रोवानियामीला सांताचं गाव पाहण्याचा आनंद सहज घेता येऊ शकतो. त्यासाठी फार वाट वाकडी करायची गरज नाही.
नॉर्दर्न परिसरात स्वीडनमध्ये किरुनापासून २० किलोमीटरवर हे बर्फाचं हॉटेल आहे. केवळ हॉटेलच नाही तर बर्फाचंच चर्चदेखील आहे. अर्थातच या काही चिरस्थायी वास्तू नाहीत. केवळ हिवाळ्यातच या वास्तूंची उभारणी केली जाते आणि हिवाळ्याच्या अखेरीस त्या वितळूनदेखील जातात. खरं तर या प्रदेशात असणाऱ्या उणे पाच ते पंचवीस अंश तापमानात सगळीकडे केवळ बर्फाचंच साम्राज्य असताना पुन्हा बर्फाच्या हॉटेलमध्ये राहायचं म्हणजे जरा अतीच वाटू शकेल. पण हा अनुभवच वेगळा आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीस येथे बर्फातून वेगवेगळ्या कलाकृती कोरणारे कलाकार आमंत्रित केले जातात. प्रत्येक खोलीसाठी, विभागासाठी वेगळी संकल्पना असते. त्यानुसार काम सुरू होते. राहण्यासाठी पस्तीस खोल्या बांधल्या जातात. पलंग, टेबल, भिंती सारं काही बर्फाचं असतं. पांघरण्यासाठी रेनडिअरची जाड कातडी दिली जातात. डिसेंबर ते जानेवारीदरम्यान हे हॉटेल व चर्च खुले होते.
या हॉटेलांत राहण्याचा एका दिवसाचा खर्च तब्बल २० हजार आहे. केवळ हॉटेल फिरायचे, पाहायचे असेल तर त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाते. अर्थात हॉटेलमधील मर्यादित भागच दाखवला जातो. पर्यटकांच्या राहण्याच्या ज्या खोल्या आहेत तो भाग पाहण्यासाठी खुला नसतो. कारण या हॉटेलच्या खोल्यांना दरवाजे नाहीत. हॉटेलच्या बाहेरील आणि आतल्या तापमानात १५ डिग्रीचा फरक असतो. येथे जाऊन आलो हे सांगण्यासाठी का होईना हे अनुभवायलाच हवं.
हॉटेलला लागूनच बर्फाचे चर्चदेखील आहे. येथे लग्न करण्यासाठी तर तब्बल तीन-चार र्वष आधीपासून बुकिंग केलं जातं. तेथील धर्मगुरू विनोदानं सांगतात की, या काळात अनेक वेळा मुलगा किंवा मुलगी बदललेली असते किंवा लग्नच रद्द झालेलं असतं. काहीजणांना तर आधी नेहमीप्रमाणे शहरात लग्न करून पुन्हा एकदा या बर्फाच्या चर्चमध्ये लग्न करायचं असतं. पण ही सारी धम्माल असते. अर्थात समारंभासाठी अगदी मोजक्याच लोकांना येथे सामावून घेतलं जातं.
किरुना आणि इतर ठिकाणी असणाऱ्या हॉटेलमध्ये फरक इतकाच की येथे जोडीला सांताचं गाव आणि नंतर नॉर्दर्न लाइट पाहण्याचा आनंद घेता येतो. रोवानीमी ह्य़ा सांताच्या गावी आर्टीक लाइन दाखवणारी एक ब्ल्यू लाइन आहे. ती ओलांडली की आपण आर्टीक प्रदेशात प्रवेश करतो. सांताच्या गावाची कथादेखील रंजक आहे. सांताचं कार्यालयदेखील येथेच आहे. सांता या प्रदेशातून येतो अशी त्यामागची भावना आहे.
हे सारं अनुभवायचं तर मुख्यत: नाताळच्या सुट्टीत जाणं गरजेचं आहे. तेव्हा इथला माहोल काही औरच असतो. सारं गाव सजलेलं असतं. रस्ते पर्यटकांनी ओसंडत तर असतातच. पण स्थानिकांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. एअरपोर्टवर उतरल्यापासूनच ‘वेलकम टू ऑफिशिअल व्हिलेज ऑफ सांता’चे भले मोठे फलक आपलं स्वागत करतात. हॉटेलातील वेटर, दुकानातील कर्मचारी सारेच सांताच्या वेशात असतात. सगळीकडे सांता न् सांताच भरून राहिलेला असतो.
लहान असो की थोर प्रत्येकालाच सांताचं एक सुप्त आकर्षण असतं. सांताबरोबर बोलायचं, त्याच्याबरोबर फोटो काढायचे, व्हिडीओ घ्यायचे हे सारं येथे करता येतं. पण त्यासाठी वेगळं शुल्क आकारलं जातं. अर्थातच ते धर्मादाय कामांसाठी वापरलं जातं. येथील पोस्ट ऑफिसमधून तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला पत्र, सुभेच्छा कार्ड पाठवू शकता. त्यावर अर्थातच सांताची सही असते. या सर्वासाठी सात-आठ हजार खर्च करावे लागतात.
लहान-थोर सर्वाच्याच मनाचा एक कोपरा सांताने व्यापलेला असतो. त्या सांताला प्रत्यक्ष पाहण्याची मजा काही औरच म्हणावी लागेल. रोवानियाममध्ये आर्टीकम नावाचे संग्रहालयदेखील आहे. आर्टीक सर्कलमध्ये आढळणाऱ्या भूवैज्ञानिक आश्चर्याचे हे संग्रहालय आवर्जून पाहण्यासारखे आहे.
दोन-अडीच दिवसांची भटकंती करून मग ट्रॉमसोमध्ये नॉर्दर्न लाइट पाहायला जाता येतं. हा सारा भूभाग ६५ ते ७१ अक्षांमध्ये येत असल्यामुळे येथे सूर्यप्रकाश कमीच असतो. तर टॉमसोमध्ये ह्य़ा दिवसात केवळ संधिप्रकाशच असतो.
ही सारी धम्माल अनुभवायची असेल तर १५ डिसेंबर ते १५ जानेवारी हा काळ उत्तम आहे. जोडीला स्नो मोबिल म्हणजेच स्नो स्कूटर, डॉग स्लेडिंग, रेनडिअर स्लेडिंग ह्य़ा खास बर्फावर होणाऱ्या साहसी क्रीडेचा आनंददेखील लुटता येतो. मुंबई – हेलसिंकी – रोवानीमी – किरुना – ट्रॉमसो – ओस्लो – मुंबई असा प्रवास सोयीस्कर आहे. हेलसिंकी केवळ विमानतळ म्हणून उतरण्यासाठी, तर रोवानियामीपासून टूरची सुरुवात करता येते.
आत्माराम परब – atmparab2004@yahoo.com
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2016 रोजी प्रकाशित
अनोखा बर्फानुभव!
पांघरण्यासाठी रेनडिअरची जाड कातडी दिली जातात. डिसेंबर ते जानेवारीदरम्यान हे हॉटेल व चर्च खुले होते.
Written by आत्माराम परब

First published on: 27-07-2016 at 01:34 IST
मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Northern lights at the icehotel in swedish