इशान्येकडील सिक्कीम हे अनमोल रत्न अजून पर्यटनासाठी फार प्रचलित नाही. भूतान, नेपाळ, तिबेटने तीन बाजू व्यापलेल्या आहेत. गंगटोक ही राजधानी असून तिस्ता नदीचे विशाल पात्र अनेक जलाशय व धबधबे निर्माण करते. नथुला पासहून भारताची सरहद्द संपून चीनची सुरू होते. येथील तारेच्या कुंपणापलीकडे चीनचे लष्कर गस्त घालत असते. नथुला पासला भेट देण्याआधी रीतसर परवानगी घेणे जरुरी असते. रोज केवळ ठरावीक संख्येनेच लोक जाऊ शकतात. सोमवार, मंगळवार नथुला पास बंद असतो. अतिदुर्गम भागात आपली फौज इतक्या थंड हवामानात सतत भारताचे सीमेवर रक्षण करत असते. सतराव्या शतकातील बुद्धाचे पेम्यागयत्स्ये स्तूप आणि सभोवतालची वनश्री सगळेच मनमोहक आहे. लाचेन गावी मुक्काम करून पहाटे जगातील सर्वात उंचावरील गुरुडोंग्मार लेक बघण्यासाठी जावे. चढ कठीण असून शारीरिक तंदुरुस्ती असल्यास जरूर जावे. तलावाचे निळेशार पाणी, त्यात बाजूच्या हिमाच्छादित पर्वतशिखरांचे पाण्यात पडलेले प्रतििबब, सगळेच अवर्णणीय आहे. युमेसाम्डोंग ( झीरो पॉइंट ) हे युमथांग खोऱ्याचे शेवटचे टोक. पुढे रस्तेच संपतात, म्हणून याला झिरो पॉइंट म्हणतात. लाचुंग मोनास्ट्री त्याच गावात आहे. त्सोम्गो आणि चांगु लेक गंगटोकमध्ये बघता येतात. रावनगळातील बुद्धा पार्कमध्ये दहा फूट उंच बुद्धाची शांत व प्रसन्न मूर्ती आहे. हनुमान टोक प्रेक्षणीय. इथला एम. जी. रोड खरेदीसाठी चांगला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या छोटय़ा झुलूक गावातून तिबेट आणि भारतातून चीनमाग्रे जाणारा प्राचीन सिल्क रूट दिसतो. झुलूकमध्ये लष्कराचा बेस कॅम्प आहे. १२५०० फूट उंचावरील थांबी व्यू पॉइंटहून कांचनजंगाचे टोक बघता येते. दार्जीिलग ते गंगटोक मार्गावर एका बाजूस तिस्ता नदी तर दुसरीकडे हिमालय आणि अगणित रंगीत फुलांची सोबत असते.

सोनाली चितळे sonalischitale@gmail.com 

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sikkim trip