मुंबई आणि पुणेकरासांठी तळेगाव हाकेच्या अंतरावर आहे. तळेगावातही लोणावळ्यासारखाच पाऊस पडतो, तसंच धुक असतं. त्यामुळे लोणावळ्यातली गर्दी, कोलाहल टाळून आपण तळेगाव परिसरात एक दिवसाची पावसाळी भटकंती कुटुंबीयांसह करू शकतो. देहू परिसरात तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले भंडारा व भामचंद्र डोंगर आहेत. तुकाराम महाराज चिंतनासाठी भंडारा डोंगरावर येत असत, भामचंद्र डोंगरावर ध्यानाला बसत. तळेगावच्या जवळ असलेली ही दोन्ही ठिकाणं व इंदुरीचा किल्ला मुंबई – पुण्यापासून एका दिवसात पाहता येतात.
तळेगावपासून भंडारा डोंगर सहा किमीवर आहे. त्याच्या अलीकडे पुणे – नगर रस्त्यावर तळेगावपासून तीन किमी अंतरावर मराठय़ांचे सेनापती दाभाडय़ांचं इंदुरी गाव आहे. ११ जानेवारी १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्ती करण्यात आली. सेनापती खंडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. १७२० -२१ मध्ये खंडेराव दाभाडे यांनी इंदुरीची गढी बांधली, त्याला ‘इंदुरीचा किल्ला’ किंवा ‘सरसेनापतींची गढी’ या नावानेही ओळखले जाते.
तळेगावहून चाकणला जाताना डाव्या बाजूला इंद्रायणी नदीकाठी किल्ल्याची भक्कम तटबंदी व बुरुज आजही पाहायला मिळतात. या तटबंदीच्या कडेकडेने इंदुरी गावात प्रवेश केल्यावर किल्ल्याचे पूर्वाभिमुख भव्य प्रवेशद्वार दिसते. त्याच्या दोन्ही बाजूंस भव्य बुरूज आहेत. किल्ल्याच्या दगडी बांधणीच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर दोन्ही बाजूंस शरभ कोरलेले असून मधोमध गणपती कोरलेला आहे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस छोटा महाल बांधलेला आहे. किल्ल्यात कडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वाहणारे इंद्रायणीचे पात्र व दूरवरचा प्रदेश दिसतो.
इंदुरीपासून २ किमीवर भंडारा डोंगर आहे. भंडारा डोंगरावर गाडीने थेट जाता येते. डोंगरमाथ्यावर विठ्ठल-रखुमाई आणि तुकाराम महाराजांचे मंदिर आहे. तुकोबाराया भंडारा डोंगरावर येत आणि येथील निसर्गरम्य शांत वातावरणात ईश्वरभक्तीत रंगून जात. मंदिराच्या विरुद्ध बाजूस एक पायवाट खाली उतरत जाते. या पायवाटेने १५ मिनिटे उतरल्यावर दगडात कोरलेली बौद्धकालीन लेणी पाहायला मिळतात.
भंडारा डोंगर पाहून पुन्हा पुणे – नगर रस्त्यावर येऊन चाकणच्या दिशेने तीन किमीवर गेल्यावर खालुंब्रे गाव आहे. या गावातून रस्ता चाकण एमआयडीसी फेज दोनला जातो. या रस्त्याने सावरदरी गाव – वसुली नाक्यावर पोहोचतो (वसुली हे गावाचे नाव आहे.) – भांबुर्ले मार्गे पाच किमीवरील भामचंद्र माध्यमिक विद्यालयापर्यंत जाता येते. येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने डोंगराच्या पायथ्यापर्यंत जावे. पायथ्यापासून मळलेली वाट भामगिरीवर गेलेली आहे. या वाटेने दाट झाडीतून अध्र्या तासात आपण सपाटीवर येतो. येथे एक काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे. येथून दहा मिनिटांत आपण कातळ कडय़ापाशी पोहोचतो. येथे थोडय़ाशा उंचीवर कातळात खोदलेलं टाक आहे. टाक्याच्या पुढे गुहा मंदिर आहे. कातळात कोरून काढलेल्या या मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग आहेत. सभामंडप चार दगडी खांबांवर तोललेला आहे. सभामंडपात नंदीची मूर्ती आहे. सभामंडपाला लागूनच पाण्याचे टाक खोदलेले आहे. गाभाऱ्याच्या द्वारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. गाभाऱ्यात शिवलिंग व पार्वतीची मूर्ती आहे. छतावर नक्षीकाम केलेलं आहे. मंदिर पाहून पुढे गेल्यावर कातळात कोरलेलं अजून एक टाक पाहायला मिळतं, टाक्याच्या वरच्या बाजूला गुहा आहे. या गुहेत
वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारी काही मुले राहतात. गुहेच्या पुढे एका झाडाखाली काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. झाडाजवळ कातळभिंतीत कोरलेल्या पायऱ्यांनी तुकाराम महाराजांच्या ध्यानगुंफेकडे जाता येते. या गुहेत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीवर तुकाराम महाराजांची मूर्ती कोरलेली आहे. त्यांच्या हातावर विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत.मुंबई-पुण्याहून खाजगी वाहनाने ही तिन्ही ठिकाणं एका दिवसात आरामात पाहता येतात. तळेगाव परिसरात शाकाहारी-मांसाहरी हॉटेल्स असल्याने खाण्या पिण्याचीही आबाळ होत नाही.
अमित सामंत – amitssam9@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 3rd Aug 2016 रोजी प्रकाशित
लोक पर्यटन : तळेगाव परिसरातली पावसाळी भ्रमंती
तुकाराम महाराज चिंतनासाठी भंडारा डोंगरावर येत असत, भामचंद्र डोंगरावर ध्यानाला बसत.
Written by अमित सामंत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-08-2016 at 01:26 IST
मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talegaon area for monsoon treks