‘रबर ताणलं की तुटतंच’ हे धोरण बहुधा मालिकावाल्यांना ठाऊकच नाही. ‘जेवढं ताणलं जाईल तेवढं ताणायचं’ या धोरणावर मात्र त्यांनी पीएचडी केली आहे; पण त्याचा शेवट वाईटच होतो याचा मात्र त्यांना सोयीस्कररीत्या विसर पडतो. मालिकेचा जितका जीव तितकीच ती खेचावी हे मानणाऱ्यांमध्ये काही मोजकेच आहेत. त्यापैकी ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका आहे असं मानू या. कारणही तसंच आहे. ही मालिका बघून मधुमेह होईल की काय, अशी शंका येईल इतका गोडवा या मालिकेत असतो. या गुडीगुडी मालिकेला आता टाटा-बाय म्हणण्याची वेळ आली आहे. मेघनाने आदित्यला होकार द्यायला सहा-सात महिने लावले. कथेचा जीव खरं तर तिथेच संपला होता. ‘पर ये टीव्ही का मामला है, खत्म होगा नहीं, होने देगा नहीं’ असं म्हणत पुढे वर्षभर ही मालिका खेचली. याची एंट्री, त्याची एंट्री, चित्रापुराण, अर्चू पाय फ्रॅक्चर प्रकरण, पिकनिक अशा असंख्य गोष्टींचा उगाचच भरणा केला. सध्या सुरू असलेला ट्रॅक तर ‘मालिका बघू नका’ असं सुचवू पाहतोय. मेघनाचं कॉलेज, तिच्या प्रेमात पडलेला विद्यार्थी, कॉलेजचे सहकारी हे सगळं उगीचच दाखवण्याचा अट्टहास का आणि कशासाठी, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. अखेर आता थांबावं असं मालिकेला वाटू लागलं हे नसे थोडके. मालिका संपण्याच्या मार्गावर आहे, हे ऐकून चाहत्यांना दु:ख होईल; पण या रेशीमगाठीची जागा घेणार आहे एक नवी मालिका. नव्या मालिकेचं नाव आणि विषय अजून गुलदस्त्यातच आहे; पण कौटुंबिक प्रेमकथा असा विषय असल्याची चर्चा आहे. चिन्मय उदगीरकर आणि ऋतुजा बागवे ही जोडी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे. चिन्मयने याआधी ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती, तर ऋतुजा बागवे हिने ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत तुकारामांच्या पहिल्या बायकोची भूमिका केली होती. दोन्ही चेहरे तसे प्रेक्षकांच्या ओळखीचे आहेत. चिन्मय बऱ्याच महिन्यांच्या ब्रेकनंतर छोटय़ा पडद्याकडे पुन्हा वळला आहे. त्याचा फॅन क्लब मोठा आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही खुशखबर आहे यात शंका नाही. जुलै महिन्यात ही नवी मालिका सुरू होईल असं समजतं.
response.lokprabha@expressindia.com