सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-गुरूचा नवपंचम योग हा ज्ञानवर्धक योग आहे. शिक्षण वा कामकाजाच्या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या गोष्टी शिकायला मिळतील. सातत्य सोडू नका. शब्द जपून वापरा. वरिष्ठांना मान द्याल. सहकारी वर्गाला अपेक्षित यश मिळण्यास विलंब लागेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. त्याच्या बुद्धिमत्तेचा आणि कलात्मकतेचा गौरव होईल. मुलांची कामे मार्गी लागतील. रसवाहिन्या आणि विकरनिर्मितीमध्ये बिघाड होईल.

वृषभ रवी-चंद्राचा लाभयोग हा उत्कर्षकारक योग आहे. रवीचे अधिकार आणि चंद्राची लोकप्रियता यांचा मेळ साधाल. नोकरी-व्यवसायात काही योजनांची अंमलबजावणी कराल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. सहकारी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या ओळखीचा उपयोग होईल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी. मुलांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. खांदे आणि मानेचे दुखणे अंगावर काढू नका. व्यायाम, विश्रांती आणि पथ्य या त्रिसूत्रीचा अवलंब करा.

मिथुन चंद्र-नेपच्यूनचा समसप्तम योग हा स्फूर्तिदायक योग आहे. निडरपणे मांडलेल्या मतांमुळे इतरांवर प्रभाव पडेल. निर्णय घेताना घाईगडबड नको. सहकारी वर्गासह शब्द जपून वापरा. जोडीदाराचे कामकाज रखडेल. त्याच्या अपेक्षांना मेहनतीची जोड मिळायला हवी. कौटुंबिक वातावरण संतप्त झाल्यास आपण मध्यस्थी कराल. मुलांच्या भविष्याची योग्य तरतूद करणे शक्य होईल. पोट बिघडेल. उत्सर्जन संस्थेवर भार येईल. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.

कर्क चंद्र-बुधाचा लाभ योग हा मानसिक समाधान देणारा योग आहे. चंद्राच्या भावनिकतेला बुधाच्या गुणग्राहकतेची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात कामानिमित्त प्रवास योग संभवतो. कामकाजाच्या स्वरूपात काही बदल होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांसह वाद टाळावेत. सहकारी वर्गाच्या समयसूचकतेची वाखाणणी कराल. जोडीदाराच्या मेहनतीचे फळ त्याला उशिरा मिळेल. त्याच्या अस्थिरतेला आळा घाला. मुलांना शिस्त लावाल. रक्तातील घटक कमीअधिक होतील.

सिंह चंद्र-शुक्राचा लाभ योग कलात्मकतेला पुष्टी देणारा योग आहे. नित्याच्या गोष्टींमध्ये नवे चैतन्य निर्माण कराल. नोकरी-व्यवसायात अधिकार गाजवाल. वरिष्ठांचे पाठबळ मिळाल्याने कामकाजाला गती येईल. सहकारी वर्गाची साथ मिळेल. त्यांच्या साहाय्याने रखडलेल्या कामकाजाची गोळाबेरीज मांडाल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात अधिक तन्मयतेने काम करेल. मुलांना सामाजिक कार्याची ओढ वाटेल. पाठ, कंबर आणि मणका पुन्हा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतील.

कन्या चंद्र-गुरूचा समसप्तम योग ज्ञानवर्धक योग आहे. ज्येष्ठ व्यक्तींकडून मार्गदर्शन व सल्ला मिळेल. नोकरी-व्यवसायात स्वत:च्या हिमतीवर निर्णय घ्याल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्गाला मोलाची मदत कराल. पूर्वी केलेले कष्ट फळास येतील. जोडीदाराचे सातत्य टिकवून ठेवण्यात आपला मोठा वाटा असेल. मुलांना संस्कारांची महती पटेल. भावंडांच्या संबंधीचे निर्णय विचारपूर्वक घ्याल. ओटीपोटाचे आजार बळावतील. आहारातील योग्य बदल हितावह ठरतील.

तूळ चंद्र-शुक्राचा केंद्र योग हा कार्य कौशल्यवर्धक योग आहे. कामाची आखणी, मांडणी आकर्षक पद्धतीने कराल. नोकरी-व्यवसायात अडीअडचणी पार करून पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होईल. वैचारिक गुंता सुटेल. वरिष्ठांच्या शब्दाचा मान राखाल. सहकारी वर्गासाठी वेळेचे वेगळे गणित मांडाल. आर्थिक नुकसान होऊ देऊ नका. जोडीदाराचा स्वाभिमान दुखावला जाईल. मुलांच्या बाबतीत हळवे होऊ नका. त्याच्या भल्यासाठीच योजना आखाल. पायाच्या शिरा दुखावतील.

वृश्चिक चंद्र-मंगळाचा लाभ योग हा उत्साहवर्धक योग आहे. चंद्राची आसक्ती आणि मंगळाची उत्सुकता एकमेकांना पूरक ठरेल. राहून गेलेल्या संकल्पना अमलात आणाल. मित्रमंडळांच्या भेटीगाठी होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे साहाय्य मिळाल्याने उमेद वाढेल. जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडाल. अनुभवी सहकारी वर्गाचा सल्ला उपयुक्त ठरेल. मुले आपली दिशा निश्चित करतील. आहारात बदल करणे आवश्यक ठरेल. अन्यथा पित्ताचा जोर बळावेल.

धनू चंद्र-शनीचा नवपंचम योग हा कष्टाचे चीज करणारा योग आहे. धरसोडपणाला आळा बसेल. सातत्य कामी येईल. नोकरी-व्यवसायात आपले म्हणणे मुद्देसूद आणि ठामपणे मांडाल. गैरसमज टाळावेत. सहकारी वर्गाचे साहाय्य चांगले मिळेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात अधिकाराचे पद भूषवेल. कौटुंबिक खर्चाचा अंदाज चुकेल. अचानक मोठे खर्च पुढे येतील. मुलांना त्यांच्या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. मणका, पाठ आणि पोट यांचे दुखणे वाढल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मकर गुरू-बुधाचा नवपंचम योग हा उत्कर्षकारक योग आहे. गुरूच्या ज्ञानाला बुधाच्या बुद्धीची जोड मिळाल्याने व्यावहारिकदृष्टय़ा चांगली प्रगती होईल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पनांचे स्वागत केले जाईल. आपल्या विचारांना पुष्टी मिळेल. वरिष्ठांबरोबर चर्चा होतील. कामातील अडचणी दूर होण्यास विलंब लागेल. सहकारी वर्गाला तांत्रिक प्रश्न भेडसावतील. मुलांच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. वातविकार त्रासदायक ठरतील. आहारात योग्य तो बदल करणे आवश्यक!

कुंभ चंद्र-बुधाचा युती योग हा बुद्धिमत्तेला आव्हान देणारा योग आहे. नव्या अनुभवांची शिदोरी गाठीशी बांधाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. सहकारी वर्गाच्या मदतीस धावून जाल. व्यावहारिक प्रगतीसह आध्यात्मिक अभ्यासातही रस घ्याल. प्रवास योग संभवतो. जोडीदारासह मोकळेपणाने बोलणे गरजेचे ठरेल. त्याला गृहीत धरू नका. कुटुंब सदस्यांना मोठय़ा निर्णयात सहभागी करून घ्याल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. सर्दी, खोकला व डोकेदुखीची शक्यता!

मीन चंद्र-मंगळाचा युती योग हा आनंददायी योग आहे. नव्या जोमाने कार्याला प्रारंभ कराल. थांबलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल. वरिष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. सहकारी वर्गाची मेहनत कामी येईल. दिनक्रमात बदल करावे लागतील. जोडीदार यशाची शिखरे सर करेल. मुलांना नवी उमेद द्याल. नातेवाईकांना आपल्या ओळखीतून लाभ होईल. पोटात आग आग होईल. डोळ्यांची जळजळ झाल्यास वेळीस उपाय योजावेत.