भक्ती रसाळ – response.lokprabha@expressindia.com
अकल्पित तशीच अपरिमित आपत्ती.. जी केवळ मानवी जीवन उद्ध्वस्त करत नाही तर हळूहळू अर्थव्यवस्थाही खिळखिळी करून टाकते. परंतु आल्या प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जाणे आणि उपलब्ध मार्गानी आपली जबाबदारी पार पाडणे हे आजही आपल्या हातात आहे. फोनमध्ये अव्याहत येणारा माहितीचा पूर, २४ तास कानांवर पडणाऱ्या बातम्या आणि परिचित, अपरिचित कोविड रुग्णांच्या व्यथा यात माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी कशी घ्यावी, असा प्रश्न आज अनेकांपुढे आहे. म्हणूनच आरोग्य विम्याविषयीच्या काही प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळणे आज जास्त उपयुक्त ठरू शकेल, यात दुमत नाही.
करोना काळात आरोग्यविमा घेणे शक्य आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हो, आपण या काळातही आरोग्यविमा घेऊ शकता. पुढचा प्रश्न असतो, की करोनाशी निगडित आरोग्य विमा घेणे योग्य आहे का? या प्रश्नाचेही उत्तर होकारार्थीच आहे. सध्या केवळ करोनाशी संबंधित आरोग्यविमा घेणे योग्य आहे. कोविडचा संसर्ग झालेली व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यास उपचारांचा खर्च दीड ते साडेतीन लाख रुपयांच्या घरात जातो. रुग्णाला रुग्णालयात दाखल होताना खर्चाची किंवा तिथे किती काळ राहावे लागेल, याची कल्पना नसते. रुग्णालयात दीर्घ काळ राहावे लागल्यास खर्च पाच लाख किंवा त्यापुढेही जातो.
करोनासाठी कोणत्या प्रकारच्या आरोग्यविमा योजना उपलब्ध आहेत?
इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेन्ट अथॉरिटीच्या (इर्डा) आदेशांनुसार ‘कोविडरक्षक’, ‘करोना कवच’ अशा दोन प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत.
रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग अशा आजारांनी ग्रस्त गुंतवणूकदार कोविड आरोग्यविमा घेऊ शकतात का?
होय. आधीच अस्तित्वात असलेल्या आजारांची माहिती विमा कंपनीला कळवल्यानंतरही ग्राहकांना करोना आरोग्यविमा योजना उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी विमा कंपनी ‘वाढीव प्रीमिअम’ आकारू शकते.
करोना कवच आणि करोना रक्षक योजनांची मुदत किती आहे?
आरोग्यविमा योजनांचा कालावधी किमान एक वर्ष इतका असतो. परंतु करोनाकाळाचा अंदाज घेता येत नसल्याने या योजना साडेतीन महिने, साडेसहा महिने, साडेनऊ महिन्यांच्या अल्पावधीसाठी उपलब्ध आहे.
करोना काळात तिसरी लाट आली तरी या योजना उपलब्ध होतील का? मुदतवाढ मिळेल का?
होय, विमा कंपन्या आपल्या करोनाविषयक योजनांना मुदतवाढ देत आहेत. योजनेच्या नूतनीकरणाचे हप्ते भरून मुदतवाढ मिळवता येईल.
करोना आरोग्यविमा कोणत्या कंपन्यांकडे मिळेल?
सरकारी जनरल इन्शुरन्स कंपन्या तसेच सर्व आरोग्य विमा कंपन्यांकडे कोविड आरोग्य विमा योजना उपलब्ध आहेत. इर्डाने आरोग्यविमाविषयक अटी आणि शर्तीची नियमावली तयार केली आहे. त्यानुसार विमाकंपन्यांना आरोग्यविमा योजनांची आखणी करणे बंधनकारक आहे.
करोना आरोग्यविमा संपूर्ण कुटुंबास सुरक्षाकवच देतो का?
होय. या योजना व्यक्तिगत तसेच फॅमिली फ्लोटर स्वरूपात संपूर्ण कुटुंबासाठी उपलब्ध आहेत.
आरोग्यविमा योजनेसाठी वयोमर्यादा?
होय. वय वर्षे १८ ते वय वर्षे ६५ पर्यंत प्रौढ वर्ग या योजनेत सहभागी होऊ शकतो. कुटुंबातील लहान मुलेही अंतर्भूत करता येतात.
आरोग्यविमा योजनेत कोणते कोविड उपचार समाविष्ट आहेत?
सरकारी यंत्रणेनुसार नोंदणीकृत निदान केंद्रे आणि रुग्णालयांत झालेल्या चाचणीनुसार कोविड पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यानंतर घरात उपचार घेतल्यास कमाल १४ दिवसांच्या मुदतीत झालेल्या कोविड उपचार खर्चाचा समावेश या योजनांत होतो. डॉक्टरांनी सबळ कारणांमुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना लेखी स्वरूपात दिल्या असतील, तर रुग्णालय दाखल असल्याचा कालावधी, दाखल होण्याआधीचे १५ ते ३० दिवस आणि रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतरचे कमाल ६० दिवस या कालावधीतील खर्चाचा परतावा मिळू शकतो.
या योजना केवळ मान्यताप्राप्त रुग्णालयांतील खर्चाची भरपाई देत आहेत की, सध्या आपत्कालीन व्यवस्था म्हणून उघडण्यात आलेली तात्पुरती रुग्णालयेसुद्धा यात समाविष्ट आहेत?
सरकारी नियमांनुसार उभारण्यात आलेली मान्यताप्राप्त तात्पुरत्या स्वरूपातील कोविड रुग्णालये देखील या योजनांत समाविष्ट आहेत.
कोविड आरोग्यविमा योजनांचा प्रतीक्षाकाळ किती आहे?
आरोग्यविमा ग्राह्य़ झाल्यावर केवळ १५ दिवसांत ग्राहक सुरक्षा कवचाचा लाभ घेऊ शकतो.
विमा घेताना कोविड चाचणीचा अहवाल जोडावा लागतो का?
नाही. केवळ लक्षणांशी निगडित प्रश्नावलीची उत्तरे आणि कोविड रुग्णाशी संपर्क आला की नाही या विषयीचा तपशील विचारला जातो. कोविड चाचणीची गरज नाही.
आरोग्यविमा दावे नोंदवताना सत्यप्रत किंवा रुग्णाचे सर्व आरोग्यविषयक चाचणी अहवाल द्यावे लागतात का?
होय, इतर कागदपत्रे उदाहरणार्थ, टेलिमेडिसिन सल्ले, अॅम्बुलन्स भाडे, संपूर्ण कोविड उपचारांची मालिका लिहिलेले केसपेपर तसेच प्रत्येक बिल आणि सोबत डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन जोडणे आवश्यक आहे.
रोखरहित (कॅशलेस) आणि भरपाई असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत का?
दोन्ही मार्गानी आरोग्यविमा मिळवता येतो.
सध्या रुग्णालये कॅशलेस दावे अमान्य करत आहेत का?
रुग्णालये अभूतपूर्व आणीबाणीचा सामना करत आहेत. शिवाय कोविड वगळता अन्य रुग्ण दाखल होण्याचे प्रमाणही मर्यादित आहे. त्यामुळे रुग्णालये रोखरहित पर्यायाऐवजी ताबडतोब बिले वसूल करण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहेत. परंतु ‘जनरल इन्शुरन्स कौन्सिल’ आणि इर्डा यांच्या संयुक्त नियमांनुसार रुग्णालयांतील रुग्णशय्यांसाठी दरपत्रक प्रसिद्ध केले गेले आहे. त्यानुसार रुग्णालयांना विमा दावे मंजूर करणे बंधनकारक आहे. केवळ आरोग्यविषयक खर्च नव्हे तर मृतदेहांच्या शीतपेटय़ांच्या वहनाच्या सेवेचा खर्चही रुग्णालयांना ठरावीक मर्यादांनुसारच आकारणे बंधनकारक आहे.
कोविड आरोग्यविमा योजना आयुर्वेदिक उपचारांचा खर्च देतात का?
होय, आयुष खर्च अंतर्भूत आहे.
कोविड उपचारांदरम्यान कोणते खर्च अंतर्भूत आहेत?
पीपीई, ग्लोव्ह्ज, मास्क आणि तत्सम सुरक्षा उपकरणे याविषयींचा वाढीव खर्च अंतर्भूत करण्यात आला आहे.
चालू आरोग्यविम्याच्या योजना कोविड उपचारांचा खर्च देत आहेत का?
होय, कोविड कवच आणि रक्षक योजनांशिवाय बाजारातील अन्य आरोग्यविमा योजनाही कोरोनाविषयक दावे मंजूर करत आहेत. परंतु प्रत्येक विमा पॉलिसीधारकाने स्वत: विमा कंपनीशी संपर्क साधून कोणते खर्च ग्रा आहेत याची आगाऊ माहिती काढणे गरजेचे आहे, तसेच विमा कंपनीद्वारे ही माहिती लेखी स्वरूपात मिळवणेसुद्धा गरजेचे आहे. कोविड रुग्णालयांच्या नेटवर्क हॉस्पिटलची यादीदेखील ग्राहकांनी स्वत: पुढाकार घेऊन विमा कंपन्यांकडून मागवणे अत्यावश्यक आहे.
आर्थिक नियोजन करताना नेहमीच ग्राहकांचा आर्थिक पाया ‘आरोग्यविमा’ आणि ‘आर्युविमा’ या ‘अत्यावश्यक गुंतवणुकींद्वारे’ खंबीर केला जातो. त्यानंतर भविष्यकालीन स्वप्नांसाठी गुंतवणुकीचे अंदाजपत्रक तयार केले जाते. आज करोनाच्या संकटाने आपल्याला पुन्हा एकदा विमा हप्ता ‘व्यय’ नसून ‘गुंतवणूक’ आहे हे सिद्ध करून दाखवले आहे.