गोल्ड विशेष
कुठल्याही स्त्रीला सोन्याचे दागिने हवे असतात, तेव्हा त्या यादीत मंगळसूत्र, मोहनमाळ, ठुशी बिलवर-पाटल्या, हेच दागिने असतात. पण एकीकडे हे दागिने बनवणारे पारंपरिक कारागीर कमी होऊ लागले आहेत तर दुसरीकडे सोन्याचे दागिने मोठय़ा प्रमाणात मशीनवर तयार व्हायला लागले आहेत. ते बनवणाऱ्या ‘सोन्याच्या कारखान्याला’ भेट देऊन लिहिलेला स्पेशल रिपोर्ट-
एकेकाळी केवळ स्वत:च्याच लाकडी बठय़ा टेबलवर प्रकाश देणारा टेबल लॅम्प, सोने उडू नये, सोिल्ड्रगची ज्वाला बंद होऊ नये म्हणून पंखेदेखील बंद, सुरक्षेच्या आणि गुप्ततेच्या कारणास्तव अतिशय बंदिस्त जागेत बसलेले कारागीर, असे चित्र पालटून आज या उद्योगाला नवे चकाचक स्वरूप प्राप्त झालेले आहे. थोडक्यात सांगायचे तर गावचा सोनार ते कॉर्पोरेट सोनार असा हा बदल झाला आहे. आपला व्यवसाय नेमका कसा चालतोय हे कोणालाही कळू न देणारा हा वर्ग आज स्वत:च्या वेबसाइट बनवून त्यावर हजारोंनी डिझाइनची छायाचित्रे प्रदíशत करू लागला आहे. राष्ट्रीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात भाग घेऊन आपले अस्तित्व दाखवून देऊ लागला. केवळ एखाद्या कुटुंबाचा असणारा हा व्यवसाय, आजदेखील कुटुंबापुरता मर्यादित असला तरी आपली जुनी पद्धती सोडून तंत्रज्ञानाची कास धरून वेगळ्या वाटेवर आगेकूच करताना दिसत आहे.
खरे तर अनादी काळापासून आपल्या देशातील दागिन्यांचा सारा भर हा कलाकुसरीवर अवलंबून असल्यामुळे कुशल कारागिरांच्या पिढय़ा न् पिढय़ा याच उद्योगात काम करत होत्या. कारागिरीचे हस्तांतरण हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडेच होत होते, म्हणूनच हा कुटुंबांचा उद्योग म्हणून ओळखला जात असे. बारा बलुतेदारांत सोनाराचे स्थान होते. मनुष्यबळ मुबलक होते, त्यामुळे वाढत्या मागणीला पुरून उरण्याची क्षमता यामध्ये होती. तरीदेखील सोन्याचा दागिना घडवायचा म्हणजे एकेकाळी दिव्यच होते. गावचा सोनार त्याच्या मर्यादित कल्पकतेत जी काही डिझाइन्स दाखविणार त्यातूनच निवड ठरायची. एकदा ऑर्डर दिल्यावर तो दागिना देईल तोपर्यंत केवळ वाट पाहणेच नशिबी असायचे. हा काळ एक दिवसापासून ते आठ-दहा दिवसांपर्यंतचा असायचा. अर्थात दागिनेदेखील ठरलेलेच नेहमीचेच. पाटल्या, बिलवर, अंगठी, चेन, मंगळसूत्र वगरे. दागिने खरेदी करण्याचे प्रसंगदेखील ठरावीकच. घराणे अगदीच तालेवार असेल तर मात्र मग जवळच्या शहरात जाऊन एखादा नामवंत सराफ शोधला जायचा. त्याच्याकडे चार नमुने जास्त पाहायला मिळत किंवा मग वेगळ्या नमुन्याचे दागिने करून देण्याची त्याची तयारी असे. एरवी सोने खरेदी होत असे ती मुख्यत: चोख सोनं घेण्याची, तीदेखील सणासुदीला गुंतवणूक म्हणून.
कालौघात ही परिस्थिती बदलत गेली. आज बाजारात इतके तऱ्हतऱ्हेचे पर्याय उपलब्ध झाले आहेत की, ढीगभर नमुन्यातून नेमके कोणते डिझाइन निवडावे, असाच प्रश्न पडतो. रिटेल बाजारातील हा बदल घडू शकला त्यामागे केवळ रिटेलर्सचे भांडवल आणि मोठमोठय़ा शोरूम इतकेच घटक कारणीभूत नाहीत. दागिने घडविण्याच्या उद्योगातील बदलती मानसिकता आणि तंत्रज्ञानाच्या आधारे त्यात झालेले बदल, ज्यायोगे मोठय़ा प्रमाणात आणि कमी वेळात दर्जेदार दागिने मिळण्याची तयार झालेली व्यवस्था हेच यामागील खरे कारण म्हणावे लागेल. त्यामुळेच पारंपरिक पद्धतीने एक मंगळसूत्र बनवायला जेथे तीन- चार दिवस लागायचे, तेथेच आज एका छोटय़ा युनिटमध्ये एका दिवसात ५०-१०० मंगळसूत्रं बनू लागली. एका दिवसात निरनिराळ्या डिझाइनच्या तब्बल २००० बांगडय़ा घडविणेदेखील सहज शक्य झाले आहे.
तंत्रज्ञानाची जोड
भारतीय बाजारपेठेत या बदलाची सुरुवात झाली ती कािस्टग तंत्रज्ञानाच्या प्रवेशाने. साधारण ३० वर्षांपूर्वी. कािस्टगचे तंत्र हे भारतीय सोने उद्योगात परिवर्तनाचा घटक ठरले. १९८० च्या दशकात हे तंत्र भारतात आले असले तरी त्या काळी असणाऱ्या सोने नियंत्रण कायद्यामुळे दागिने बनविण्याच्या उद्योगातच फारसा उत्साह नव्हता. त्यामुळे सुरुवातीस या तंत्राला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याच दरम्यान तार आणि पत्रा बनविण्याच्या मशीनमुळे आणखीन एका तंत्राची भर पडली. दागिने बनविण्याच्या प्रक्रियेला या दोन तंत्रांमुळे खरा वेग प्राप्त झाला. सोन्याच्या जवळपास सर्वच दागिन्यांत महत्त्वाचा घटक असतो तो तार आणि पत्रा. १९८० च्या दशकापर्यंत हे सारे काम हातानेच केले जात असे. त्यामुळेच एकतर ते वेळखाऊ होते आणि दुसरे म्हणजे त्यासाठी कुशल कारागिरांची गरज होती, पण मशीनमुळे ट्रेिनग देऊन केवळ एकच माणसाकडून किलोभर सोन्यापासून थोडक्या वेळात हे काम करणे सहज शक्य होऊ लागले.
पण दागिन्याच्या गरजेनुसार छोटे-छोटे पार्ट घडविण्यासाठी कुशल कारागीर हवेच असत. तयार झालेल्या तारेपासून, पत्र्यापासून ठरावीक साच्याच्या आधारे असे पार्ट बनविले जाऊ लागले. त्यासाठीदेखील मशीनचा आधार घेतला जात असे, पण तो नंतरच्या काळात. तर कािस्टग तंत्र एकदा रुळल्यावर अनेक कलाकुसरीचे दागिनेदेखील मोठय़ा प्रमाणात बनविणे शक्य होऊ लागले. (कािस्टगची सविस्तर चौकट पाहणे.) पुढे टप्प्याटप्याने अनेक फिनििशगची कामे करणारी यंत्रे उपलब्ध होऊ लागली. पॉलिश करणे, दागिना तयार झाल्यावर त्याला कोल्ड, हार्ड ट्रीटमेंट देणे, डायमंड कटिंगच्या साहाय्याने फिनििशग करणे, अशी कामे करणारी मशीन्स आली आणि पारंपरिक कामाचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले.
येथे एक लक्षात घ्यावे लागेल की, देशातील सोन्याच्या दागिन्याचा एकंदरीत कल हा पारंपरिक स्वरूपातील दागिन्यांकडेच आहे. त्यामुळेच कलाकुसरीची कामे असणाऱ्या पारंपरिक दागिन्यांना आजही मोठय़ा प्रमाणात मागणी असते. तार पाटा मशीन, कािस्टग व इतर पूरक यंत्रे यांच्याद्वारे संपूर्ण पारंपरिक दागिना बनविणे शक्य होत नाही. यासंदर्भात मंगळसूत्राचे आघाडीचे व्यावसायिक चेतन थाडेश्वर सांगतात की, ‘‘संपूर्णपणे मंगळसूत्र काही मशीनद्वारा बनू शकत नाही. पण हे तंत्र पूरक म्हणून खूप मोठय़ा प्रमाणात उपयोगी पडते. सर्व पार्ट एकत्र करून त्याला अंतिम स्वरूप देणे अशा कामासाठी कुशल कारागीरच लागतो. या तंत्रामुळे महत्त्वाचा बदल झाला तो दागिन्याच्या विविध घटकामध्ये. मंगळसूत्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर, मणी, तार, वाटी, पेंडट असे घटक मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होऊ लागले. हाच प्रकार इतर दागिन्यांच्या बाबतदेखील लागू पडतो.’’ पण यंत्राच्या वापरामुळे
या सर्व सुटय़ा घटकांमधील एक सारखेपणा आणि कमी वेळेत मोठय़ा प्रमाणात उत्पादन या दोन गोष्टींमुळे दागिने बनविण्याच्या प्रक्रियेला वेग आला, खर्चाचे प्रमाण आणि मनुष्यबळदेखील कमी होत गेले.
भारतीय दागिन्यांपकी दोन दागिन्यांनी मात्र तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येते. ती म्हणजे सोनसाखळी (चेन) आणि बांगडय़ा (पाटल्या, बिलवर इ.). या दोन्ही दागिन्यांची सध्याची संपूर्ण प्रक्रिया ही मशीनने करणे शक्य झाले आहे. यासंदर्भात देशातील आघाडीचे बांगडी व्यावसायिक ओरो बँगल्सचे रविश पहुजा सांगतात, ‘‘माझे आजोबा टिकमदास यांनी १९६० सालीच मुंबईत बांगडी बनवायचे मशीन आणले होते. अर्थात तो एक प्रयोगच होता, पण त्यातूनच सुधारणा करत १९७० मध्ये पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या आधारे बांगडी बनविण्याचा कारखाना आम्ही सुरू केला. सध्या तर केवळ ५ टक्के हाताची कलाकारी आणि ९५ टक्के मशीनचे काम अशी विभागणी बांगडी उद्योगात आम्ही करू शकलो आहोत.’’ साधारण ९० च्या दशकात सोनसाखळी संपूर्णपणे मशीनद्वारे उत्पादन करण्याची यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध होऊ लागली. देशातील सोनसाखळीचे आघाडीचे व्यावसायिक ‘चेन न् चेनस’चे वसंतराज बिरावत सांगतात, ‘‘ही यंत्रसामग्री इटलीहून आयात करावी लागली. त्या वेळेस असा प्रयोग करणारे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच लोक होते. लोकांचा कलदेखील अशा प्रकारे मशीन मेड दागिन्यांकडे फारसा नव्हता. महत्त्वाचे म्हणजे ही सर्व मशिनरी परदेशात तयार होत असे. तेथील दागिने वापरण्याची आवड कल आणि आपल्याकडील आवड यात आजही बराच फरक आहे. त्यामुळे त्यांच्याकडील मशिनरीच्या साहाय्याने बनवलेले आपल्याकडील दागिने येथील ग्राहकाला रुचत नसत, म्हणून आम्ही भारतीय कल पाहून मशीनमध्ये अनेक प्रयोग केले. त्यामुळे यंत्राचा वापर करून भारतीय आवडीनुसार दागिने तयार होऊ लागले.’’ महत्त्वाचे म्हणजे त्यांचे हे सर्व प्रयोग यशस्वी झाले. आज केवळ ५ ते १० टक्के कामासाठी कुशल कारागीर आणि उर्वरित कामासाठी मशीन असे चित्र सोनसाखळी व्यवसायात दिसत आहे.
सोन्याचे दागिने उत्पादनाच्या वाटचालीतील हे आपल्याकडील महत्त्वाचे बदल. आपला देश हा पूर्वीपासूनच सोन्याच्या वापराबद्दल प्रसिद्ध आहे. सोन्याच्या दागिन्यांकडे केवळ हौस, चन म्हणून न पाहता त्याकडे एक गुंतवणूक म्हणूनदेखील पाहिले जाते. त्यामुळेच दागिने उत्पादनाचा प्रचंड असा मोठा उद्योग आपल्याकडे आहे. मात्र त्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्याची मात्र आपली वृत्ती अजिबात नाही. दागिने बनविणारी सर्वच यंत्रसामुग्री ही परदेशातून (इटली, जर्मन, इस्रायल) आयात केली गेली जाते. यामागील कारणमीमांसा करताना केजीके कॉर्पोरेशनचे प्रॉडक्शन जनरल मॅनेजर विल्सन रॉड्रिग्ज सांगतात, ‘आपल्याकडे मनुष्यबळ खूप मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होते. त्यातच हाताने बनविलेल्या दागिन्याला प्राथमिकता होती. त्यामुळे असे मनुष्यबळ हे कुशलदेखील होते. असे असल्यावर तंत्रज्ञान विकसित करावे आणि कमी वेळात कमी मनुष्यबळात उत्पादन करावे ही आपली मानसिकताच नव्हती. त्यामुळे आजदेखील तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी अजूनही हा व्यवसाय मनुष्यबळावरच आधारित राहिला आहे. मात्र भविष्याचा विचार केला तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागेल हे मात्र निश्चित.’ वसंतराज बिरावत सांगतात, ‘सोनसाखळीचे मशीन जेव्हा आम्ही इटलीहून आयात केले ते काही त्यांनी संपूर्णपणे त्यांच्या डोक्याने तयार केले नव्हते. त्यांनी भारतीय मार्केटचा अभ्यास केला, स्थानिक सोनारांच्या कामाचे निरीक्षण करूनच हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. अर्थात त्या तंत्रज्ञानावर आम्हीदेखील वेगवेगळे प्रयोग केले. अगदी मूळ मशीनमधील साचे पूर्णपणे बदलून टाकण्याचेदेखील प्रयोग केले. त्यातूनच भारतीय बाजारपेठेला पूरक असे उत्पादन करणे शक्य झाले आहे.’’ बांगडी उत्पादक रविश पाहुजा याबद्दल सांगतात की, ‘‘आम्ही स्विस घडय़ाळे बनविणारी यंत्रणा आमच्या उत्पादनात वापरत आहोत.’’ याचाच अर्थ, दागिने उद्योगात आजही नवनवीन तंत्राला प्रचंड वाव आहे. गरज आहे पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्याची.
पारंपरिक कारागीर आणि नवशिक्षित वर्ग
अर्थात हे सारे बदल होताना कारागिरांच्या क्षेत्रात एक महत्त्वाची गोष्ट घडली. देशातील कारागीर हे बहुतांशपणे कुटुंबातील परंपरेतून आलेले आहेत. मात्र तंत्रज्ञानाच्या रेटय़ामुळे काही प्रमाणात तरी कारागिरांची गरज कमी होत गेली. त्याचबरोबर कारागिरांच्या नव्या पिढय़ा पारंपरिक शिक्षण न घेता इतर व्यवसायांकडे वळू लागल्या. असे चित्र जरी असले तरी आज आपला देश सोने आणि हिऱ्याचे दागिने उत्पादन-व्यापारात जगात दोन नंबरवर आहे. यामागे गेल्या दहा-पंधरा वर्षांतील उत्पादकांची बदलती मानसिकता आणि तंत्रज्ञान कारणीभूत आहे. अर्थात आज जे आघाडीचे उत्पादक आहेत तेदेखील पारंपरिक व्यावसायिकच आहेत. त्यांच्यात आणि इतरांच्यात फरक आहे तो त्यांनी योग्य वेळी स्वीकारलेल्या तंत्रज्ञानाच्या आणि मार्केटिंगच्या तंत्राचा.
यामध्ये पारंपरिक कारागीर आपले अस्तित्व हरवून बसतोय का? तर सध्या तरी त्याची याच दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. तो पुरता नामशेष होणार नाही. कारण भारतीय ग्राहकांची पारंपरिक दागिने वापरण्याची मानसिकता जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत त्याची गरज भासत राहणार. पण तो नव्या वाढत्या कॉर्पोरेट पद्धतीत टिकवायचा असेल तर कारागिराला तंत्रज्ञान जवळ करावे लागेल. आज जे मोठय़ा प्रमाणात ज्वेलरी डिझाईनचे प्रशिक्षण घेत आहेत त्यामध्ये पारंपरिक कारागीर कमी आहेत. त्यामुळेच जेम्स अॅण्ड ज्वेलरी फेडरेशनने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत कारागिरांसाठी विशेष प्रशिक्षण उपक्रम सुरू केले आहेत. अर्थात अशा उपक्रमाची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे.
कारागिरांच्या अनुषंगाने दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजही आपली मानसिकता ही दागिना घेण्याची नसून त्या माध्यमातून सोने खरेदी करण्याची आहे. रविश पाहुजा या संदर्भात एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडतात, तो म्हणजे आपण दागिन्याकडे पीस ऑफ आर्ट म्हणून पाहत नाही. त्यामुळे कोणत्याही दागिन्याची सोने, खडे, हिरे, मजुरी अशी विभागणी केली जाते. मग मजुरी चार पसे जास्त झाली तर लगेच ग्राहक तक्रार करतो. परदेशात हा प्रकार होत नाही. नेमका हाच मुद्दा अनेक रिटेलर्सदेखील मांडतात. मग हा कारागीर टिकवायचा असेल तर दागिन्याकडे पीस ऑफ आर्ट म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित करावी लागेल. तरच त्याला चार पसे जास्त मिळतील आणि यंत्रावर आधारित अशा युगातदेखील त्याचे महत्त्व टिकून राहील.
कॉर्पोरेट भविष्यकाळ
भारतीय दागिन्यांना जगात जी मोठी मागणी आहे, त्यामध्ये प्रामुख्याने हिऱ्याच्या दागिन्यांचा समावेश होतो. हे क्षेत्र आज पूर्णपणे कॉपोरेट झाले आहे. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांत या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. पण भारतीय धाटणीच्या सोन्याच्या दागिन्यांना ठरावीक देशातच उठाव आहे. त्याचबरोबर परदेशी धाटणीचे दागिनेदेखील भारतीय बाजारपेठेत येत आहेत. त्यांची घडणावळ ही पूर्णत: यंत्राच्या साहाय्याने होत असून त्यांत भारतीय कलेला वाव नाही. त्यामध्ये कॉर्पोरेट लूक आहे. भारतातील नवउच्च मध्यम वर्ग, कॉर्पोरेट वर्ग यांचा कल अशा दागिन्यांकडे झुकताना दिसतो. कॉर्पोरेट व्यावसायिकता अंगी बाणवल्यावर ग्राहकाभिमुख बाजारपेठेचे तत्त्व दागिने उद्योगालादेखील लागू होते. त्यासाठी आपले पारंपरिक उत्पादन या गटाला उपयोगी पडण्याच्या दृष्टीने अनेक उत्पादक सध्या प्रयत्न करताना दिसत आहेत. म्हणजेच फॉर्मल अथवा जीन्स टी-शर्टवरदेखील एका हातात घडय़ाळ आणि एका हातात बांगडी दिसू लागली तर दागिन्याच्या उद्योगाने बाजी मारली असे म्हणावे लागेल.
देशातील दागिने उत्पादन क्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीवर भविष्याचे चित्र मांडायचे तर एका महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे लागेल. एकीकडे कॉर्पोरेट व्यावसायिकता अंगी बाणवून अनेक मोठे बदल घडून येत आहेत, मात्र त्याच जोडीला आपले पारंपरिक तंत्रदेखील वापरण्याची आसदेखील सुटलेली नाही. त्यामुळेच दिखावा कॉर्पोरेटचा आणि कारखाना जुन्याच पद्धतीचा असा प्रकार दिसून येतो. अशा परिस्थितीत कारागीरदेखील जेथे योग्य मेहनताना आणि सुविधा मिळतील तेथेच जातील. अर्थात तंत्रज्ञानाचा वापर आणि कॉर्पोरेट सुविधा या महागडय़ा आहेत हे लक्षात ठेवावे लागेल.
गेल्या काही वर्षांंत मोठय़ा पेढय़ांची साखळी दुकाने खूप मोठय़ा प्रमाणात देशभरात उघडली जात आहेत. त्यांची स्वत:ची उत्पादन केंद्रे आहेत. मात्र त्याद्वारे सध्या तरी ठरावीक दागिनेच घडवले जातात. पारंपरिक दागिन्यासाठी आज ही साखळी दुकाने पूर्वापार उत्पादकांवर अवलंबून आहेत. यांच्याकडून मिळणारी ऑर्डर ही एकाच वेळेस ५०-१०० दागिन्यांची असते. या मागणीला पुरे पडायचे असेल तर दागिने उद्योग व्यवसायाला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यावसायिकता अंगी बाणवत काळाची पावले ओळखत विस्तार करण्याची गरज आहे. अनेकांनी याआधीच स्वत:ला बदलून घेतले आहे. केवळ पेढय़ाच नाही तर उत्पादकांचेदेखील ब्रँडमध्ये रूपांतर झाले आहे. ओरो बँगल्सच्या उदाहरणावरून हे दिसून येते. राष्ट्रीयच नाही तर जागतिक पातळीवरदेखील अनेकांनी स्वत:चे नाव निर्माण केले आहे. देशातील सोन्याच्या दागिन्याला कॉर्पोरेटचे कोंदण तर लाभले आहेच; पण गरज आहे ती पारंपरिक कला टिकवत वाढविण्याची!
जो दागिना बनवायचा असेल त्याचे सर्वप्रथम संगणकावर डिझाइन केले जाते. त्यानंतर कॅडकॅम तंत्राच्या साहाय्याने या डिझाइनचा थेट रबर मोल्ड काढला जातो. साधारण दीड इंच बाय एक इंच अशा विशिष्ट प्रकारच्या रबरी पट्टीवर हा मोल्ड बनविला जातो. (संगणक येण्यापूर्वी हेच काम कारागीर आधी चांदीवर करायचे. मग ते डिझाइन रबरी पट्टय़ावर उच्च दाब देऊन मोल्ड काढला जायचा, त्यामुळे त्याला डिझाइनला पर्यायाच्या मर्यादा होत्या.) त्यानंतर हा या मोल्डमध्ये व्ॉक्सिंग मशीनच्या माध्यमातून व्ॉक्स मोल्ड तयार केला जातो. म्हणजे अंगठी बनवायची असेल तर व्ॉक्सची अंगठी तयार केली जाते. नंतर अशा व्ॉक्स मोल्ड्सचा साधारण सहा इंचाचा व्ॉक्स ट्री बनवला जातो. नंतर हा ट्री धातूच्या विशिष्ट साच्यात एका विशिष्ट पावडरच्या मिश्रणाबरोबर ठेवला जातो. नंतर हा साचा मशीनमध्ये उच्च तापमानाला ठेवला जातो. या प्रक्रियेत आतील मेण वितळून जाते आणि व्ॉक्स ट्रीचा साचा पावडरमध्ये शिल्लक राहतो. हा साचा कास्टिंग मशीनमध्ये ठेवून त्यावर वितळलेले सोने ओतले जाते. (सध्या आपल्याकडे एका वेळेस एक किलो सोन्याचे कास्टिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे) त्यानंतर बाजूचा अनावश्यक घटक काढून टाकल्यावर आपल्याला व्ॉक्स ट्रीच्या जागी सोन्याचा ट्री मिळतो. त्यानंतर त्यावर इतर फिनििशगचे काम जसे फाइिलग, खडे बसवणे इ. केले जाते. कास्टिंगच्या तंत्रामुळे सर्वात महत्त्वाचा बदल झाला तो एकाच नमुन्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करणे शक्य झाले. रबर मोल्ड अनेक वष्रे टिकत असल्यामुळे आजदेखील अनेक कारखान्यात असंख्य रबर मोल्ड्स जपून ठेवल्याचे दिसतात. तर कॅडकॅमच्या तंत्रामुळे डिझाइनमध्ये अनेक प्रयोग करणेदेखील सोपे झाले. अर्थात ही सर्वच यंत्रसामुग्री अत्यंत महागडी आहे. सध्या तरी सर्व दागिने बनविण्याबाबत हीच पद्धत सध्या आपल्याकडे वापरली जाते. अर्थात अंगठीसारखा एखादाच दागिना अखंडपणे यातून बनू शकतो. इतर दागिन्यांबाबत मात्र छोटे पार्ट बनवून कारागिरांमार्फत त्याची जोडणी करणे अशीच व्यवस्था उपलब्ध आहे.
भारतातील दागिने उद्योगावर आजही पारंपरिक कलेचा पगडा आहे. गेल्या काही वर्षांत दागिने बनविण्याच्या प्रक्रिया शिकवणारे अनेक प्रशिक्षण वर्ग सुरू झाले आहेत. करिअरचा एक पर्याय म्हणून याकडे पाहिले जात आहे. अर्थात हातात कला असेल तरच डिझाइनच्या क्षेत्रात नाव कमावता येऊ शकेल. पण दागिना हा विषय मध्यवर्ती ठेवून धातुशास्त्र, रसायनशास्त्र, रिफायनरीशास्त्र असा र्सवकष अभ्यासक्रम असणारा अभियांत्रिकी वर्ग आपल्याकडे नसल्याचे रविश पाहुजा नमूद करतात. परदेशात विशेषत: इटलीमध्ये या क्षेत्रात असणारे बहुतांश तंत्रज्ञ हे ज्वेलरी इंजिनीअर आहेत. भविष्यात जर आपल्याला पारंपरिक कला तंत्रज्ञानाच्या जोडीने टिकवायची असेल तर अशा ज्वेलरी इंजिनीअिरगची गरज आहे. सध्या तरी याबाबत उद्योग क्षेत्र उदासीन आहे.
वापरात नसलेले सोने बाजारात आणण्यासाठी..
भारतीयांकडून भरमसाट सोने खरेदी केले जात असते. मग ते शुद्ध सोने असो की दागिन्यांच्या स्वरूपात असो. खरेदी कसेही केले असले तरी ते सोने गुंतवणूक म्हणूनच घेतले जाते. त्यामुळे एका अंदाजानुसार भारतात सुमारे २५ हजार टन सोने पडून आहे. त्यामुळे दरवर्षी आपणाला सुमारे ८०० ते ९०० टन सोने आयात करावे लागते. त्यातून मोठय़ा प्रमाणात परकीय चलन बाहेर जाते. त्यावर नियंत्रण राहावे म्हणून सरकारने सोनं आयात करताना किमान २०% दागिने स्वरूपात निर्यात करण्याची अट घातली आहे. परिणामी सध्या आयात कमी झाली आहे. किंबहुना बंदच झाली आहे असे म्हणावे लागेल. तर लोकांनी घेतलेले सोने पडून राहीले आहे. त्यामुळे दागिने उद्योगाला सोनं उपलब्ध होत नाही. लोकांकडे असणाऱ्या सोन्याचा दागिन्यांच्या मार्केटला काहीच फायदा नाही. म्हणूनच जेम्स अॅड ज्वेलरी फेडरेशन हे रिझव्र्ह बँकेच्या सहकार्याने वापरात नसलेलं सोनं बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे फेडरेशनच्या नियामक मंडळाचे संचालक दिलीप लागू यांनी सांगितले. त्यानुसार लोकांनी डिमॅट अकाऊंटच्या माध्यमातून बँकांकडे सोने डिपॉझिट करायचे, त्यावर बँक ठरावीक दराने व्याज देईल आणि हे सोने दागिने उत्पादकांना कर्ज म्हणून येईल. जेणेकरुन बाजारात दागिने उत्पादनासाठी सोने उपलब्ध होईल. यामुळे पडून राहिलेलं सोने वापरात तर येईलच पण त्यामुळे गुंतवणूकदारांचा थेट फायदादेखील होईल. सध्या या योजनेवर चर्चा सुरू असून त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
आज जरी आपण सोन्याच्या वापराबाबत आघाडीवर असलो तरी दागिन्यांच्या उत्पादनात चीन आपल्या पुढे आहे. मुबलक मनुष्यबळ, पूरक सरकारी धोरण आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. आपल्याकडे मनुष्यबळ भरपूर असले तरी चीनमधील मनुष्यबळाकडून मिळणारे आउटपुट आणि आपल्याकडील आउटपुट यात प्रचंड फरक आहे. दुसरे असे की प्रचंड आयात कर भरून सोने आणायचे आणि त्यावर प्रक्रिया करून दागिने निर्यात करायचे यामध्ये दागिन्याची किंमत बरीच वाढते. ते प्रमाण चीनमध्ये कमी आहे. त्यामुळे भारतातीलच अनेक उत्पादकांनी चीनमध्ये स्वत:चे कारखाने सुरू केले आहेत. सरकारी धोरणे जर पूरक ठरली नाहीत तर चीन आणखीनच बाजी मारेल हे निश्चित.