ट्रॅव्हलॉग : अनुभवावी ऐसी दुबई

दुबई म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं ते फक्त शॉिपग.. पण त्याहीपलीकडे दुबईत बघण्यासारखं, अनुभवण्यासारखं खूप काही आहे.

दुबई म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं ते फक्त शॉिपग.. पण त्याहीपलीकडे दुबईत बघण्यासारखं, अनुभवण्यासारखं खूप काही आहे.

दुबई म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर येतं ते वाळवंटातलं एक शहर, जगातली सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफा, चमचम करणारं सोनं, पांढराशुभ्र पारंपरिक पेहराव केलेले अरबी लोक, लाम्बोर्गिनी, बीएमडब्ल्यू कार वापरणारे पोलीस आणि आताच झालेले आयपीएल सामने. पण दुबई या सगळ्यांपेक्षा खूप वेगळं आहे. ही वेगळी बाजू मी दुबईला गेल्यावर मला बघायला मिळाली.
विमानातून उतरल्याबरोबर तिकडचं विमानतळ बघून मी थक्क झाले. अतिशय मोठा आणि सुंदर विमानतळ. सगळे आपले घाईत. इमिग्रेशन कांऊटरवर भरपूर गर्दी होती. माझ्या दोन लहान मुली माझ्याबरोबर होत्या. तेवढय़ात तिकडच्या अधिकाऱ्याने मला दुसऱ्या रांगेत जायला सांगितलं. ती फक्त महिलांची रांग होती. महिलांची ही वेगळी रांग मला फक्त दुबईमध्ये बघायला मिळाली.
दुबई ही संयुक्त अरब अमिरातीमधील एक अमिरात आणि सर्वात मोठं शहर आहे. संयुक्त अरब अमिरात हे मुस्लीम राष्ट्र आहे. दिराम हे चलन आणि अरेबिक ही भाषा. पण इथे भारतीय, पाकिस्तानी लोक जास्त आहेत म्हणून हिंदीपण चालतं. तेलाचा शोध लागायच्या आधी इथे सगळं वाळवंट होतं. खूप मागासलेले होते हे लोक. पण तेलाच्या विहिरींचा शोध लागला आणि आज हे शहर कुठल्या कुठे पोहचलं. अरबी माणूस हा कमालीचा कुटुंबवत्सल. शुक्रवार, शनिवार इथल्या बगीच्यांमध्ये आणि बीचवर तो आपल्या तीन-चार बायका आणि त्यांची मुलं या सगळ्यांबरोबर बार्बेक्यू एन्जॉय करताना दिसतो. सौदीसारखं इथे मुस्लिमांव्यतिरिक्त इतर स्त्रियांना बुरखा घालावा लागत नाही. इथे मशिदी खूप आहेत. त्यांच्यावरची कलाकुसर अप्रतिम आहे. दिवसातून पाच वेळा अजान ऐकायला येतात. सगळ्या मशिदीतून एकाच वेळी येणाऱ्या आवाजाने सगळं आसमंत भरून जातं. इथे एक मंदिरही आहे. ‘बर दुबई’मध्ये मीना बझारमध्ये एक मंदिर आहे. छोटं. त्यामध्ये सगळे देव आहेत. हनुमान, शंकर, गणपती बाप्पा, हे सगळे पहिल्या मजल्यावर आहेत. आणि वर एक गुरुद्वारा आहे. याच मंदिराजवळ राधाकृष्णांचंही सुंदर मंदिर आहे. सगळे देव एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. ज्याने त्याने आपापल्या देवाला नमस्कार करावा.
संयुक्त अरब अमिरात हा उष्णकटिबंधातला वाळवंटीय प्रदेश. इथला उन्हाळा अतिशय उष्ण, दमट आणि हवा कोरडी. साधारणपणे उन्हाळ्यात तापमान ४०अंशपेक्षा जास्त असतं. मे ते सप्टेंबर इथे उन्हाळा असतो. जुलै आणि ऑगस्ट इथे सगळ्यात जास्त तापमान असतं. इथला हिवाळा हा अतिशय सुखावह असतो. साधारण १५ ते २० अंश तापमान असतं. हिवाळ्यात पाऊसही पडतो.
मला दुबई आवडलं ते शॉपिंगसाठी किंवा सोन्याच्या खरेदीसाठी नव्हे, तर इथल्या कायद्याच्या व्यवस्थेसाठी. आपण नेहमी ऐकतो की आखाती देशांमध्ये कायदे खूप कडक असतात. खरं आहे ते. याचा प्रत्यय मला अगदी विमानतळावर उतरल्यापासून आला. इथे सगळं पद्धतशीर आहे. तुम्ही रस्ता फक्त झेब्रा क्रॉसिंगलाच क्रॉस करू शकता. गाडय़ांना वेगमर्यादा आहे. ती ओलांडली तर रस्त्यावरचे कॅमेरे लावलेले रडार तुमच्या गाडीचा नंबर लगेच नोंदवून घेतात. नंतर तुम्हाला वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल दंड भरावा लागतो. त्याच बरोबर पार्किंग नीट केलं नसेल तरी दंड भरावा लागतो.
मला दुबईतल्या एका पाकिस्तानी टॅक्सी ड्रायव्हरने जे काही सांगितलं त्याने तर आश्चर्याचा धक्काच बसला. तो मला म्हणाला की इथला राजा कधी कधी रात्री टॅक्सीने फिरतो. आमच्याशी बोलतो. आमचे सगळे प्रॉब्लेम त्याला कळतात. कोणत्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते अशासारख्या गोष्टीपण त्याला कळतात. लहानपणी गोष्टींमध्ये वेश बदलून राज्याचे निरीक्षण करणाऱ्या राजाबद्दल वाचलं होतं. पण आताच्या काळातपण असा राजा असतो हे आश्चर्यच होतं. ‘शेख मोहमद बिन रशीद अल मकतुम’ हा इथला राजा आणि संयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान. दुबई मेट्रो सुरू झाली होती तेव्हा या राजाने मेट्रोने प्रवास केला होता. अगदी सगळ्यांबरोबर जनरल डब्यामध्ये. बाजूला बरेच कामगार, त्यांना ‘लेबर क्लास’ म्हणतात आणि सर्वसामान्य माणसे होती. राजा प्रवास करणार म्हणून मेट्रो स्टेशन रिकामं करण्यात आलं नव्हतं. याचा फोटो मी इथल्या पेपरमध्ये बघितला होता. हेच दुबईच वेगळेपण. तसं दुबई मुंबईपासून विमानाने फक्त अडीच-तीन तासांच्या अंतरावर.. पण तरीही किती वेगळं. दुसरं मला इथे आवडलं ते म्हणजे मंत्रालयातील अधिकारी कधीही शाळा, हॉटेल्स, ऑफिसेसमध्ये जाऊन सगळी तपासणी करतात. म्हणजे स्वच्छता तपासणं हा मुख्य हेतू आणि या तपासणीला सगळे घाबरून असतात, म्हणून सगळं व्यवस्थित असतं. कारण मग दंड किंवा शिक्षा काय मिळेल सांगता येत नाही.
कायदे कडक असल्याने गैरव्यवहार होत नाहीत. सगळं अगदी नियमांप्रमाणे. इथे महिलांना खूप आदर मिळतो. महिलांसाठी सगळीकडे वेगळी रांग असते. बससाठी, बिलं भरण्यासाठी, इतकंच काय तर सिनेमाचं तिकीट काढायलापण महिलांसाठी वेगळी रांग असते.
मला हे शहर खूप आवडलं. इथे सुंदर बीच आहे, क्रिक पार्क, सफा पार्कसारखे मोठमोठे बगीचे आहेत, वाळवंट तर आहेच, पण मॉल ऑफ एमिरेट्समध्ये तर त्यांनी चक्क बर्फाळ प्रदेशच निर्माण केला आहे. ‘स्की दुबई’ जिथे सगळ्यांना बर्फात मनसोक्त खेळता येतं. बर्फावर स्कीइंगपण करता येतं.
खरंच हे अरबी लोक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात. ‘बुर्ज खलिफा’ ही ८२८ मीटर आणि १६० मजली जगातली सगळ्यात उंच इमारत हे याचंच उदाहरण. इथल्या १२४ व्या मजल्यापर्यंत आपण जाऊ शकतो. बापरे १२४वा मजला!!! या आधी मी जास्तीत जास्त म्हणजे तेरा किंवा चौदाव्या मजल्यावर गेले होते. इथे तर मी १२४व्या मजल्यावर गेले ते पण एक मिनिटात. मी तिथे गेले तेव्हा संध्याकाळ होती. अस्ताला जाणारा सूर्य आणि त्याचा संधीप्रकाश. समोर उंचच उंच इमारती आणि सरळ रस्ते. आपण इतक्या उंचावर आहोत यावर क्षणभर विश्वासच बसत नव्हता. थोडय़ाच वेळात रात्र झाली. आणि समोरचं चित्र पालटलं. आता मला वरून दिसत होती ती म्हणजे सोन्याची दुबई. खरंच सगळीकडे जसे सोनेरी दिवे लावलेत असं वाटलं.
‘दुबई मॉल’ हा जगातला सगळ्यात मोठा शॉपिंग मॉल. बुर्ज खलिफा जवळच आहे. सगळ्या मोठमोठय़ा ब्रॅन्डस्ची दुकानं तर आहेतच, पण इथे अ‍ॅक्व्ॉरिअम आहे. याचं वैशिष्टय़ म्हणजे हे सलग एकाच काचेचं बनलं आहे आणि सगळ्या प्रकारच्या रंगीबेरंगी माशांबरोबर इथे शार्क मासेही बघायला मिळतात. दुबई मॉलचं अजून एक आकर्षण म्हणजे आइस स्केटिंग िरग. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळे इथे आइस स्केटिंगचा आनंद घेताना दिसतात. तसंच इथलं फूड कोर्ट. देश-विदेशातले सगळे खाण्याचे प्रकार इकडे मिळतात. जगातली सगळ्यात उंच इमारत. सगळ्यात मोठा मॉल. त्यानंतर दुबई मॉलजवळ आहे ते म्हणजे ‘द दुबई फाऊंटन’. जगातलं सगळ्यात मोठं संगीतमय कारंजं. इथे भेट देणाऱ्या प्रत्येकाने बघावाच असा हा शो आहे. इंग्रजी, अरेबिक गाण्यांच्या संगीतावर थिरकणारं उंच रंगीबेरंगी कारंजं अगदी थक्क करून सोडतात. जगातलं सगळ्यात मोठं कृत्रिम बेट म्हणजे ‘पाम आयलंड’ हे दुबईतच आहे. पाम आयलंड म्हणजे समुद्रात ताडाच्या झाडाच्या आकाराचं बेट बनवलं आहे. आकार अगदी तसाच. तिकडे राहायला व्हिला म्हणजे बंगले बांधले आहेत. शॉपिंग मॉल आहेत. असे हे पाम आयलंड तीन ठिकाणी आहेत. अजून एक कृत्रिम बेटाचं काम चालू होतं तेव्हा. ‘द वर्ल्ड’ म्हणजे या जगाच्या आकाराचं बेट. खरंच यांच्या कल्पनाशक्तीला सलाम.
अजून एक मोठं आश्चर्य म्हणजे ‘मिरॅकल गार्डन.’ मिरॅकल म्हणजे चमत्कार. खरंच अगदी तंतोतंत तसंच आहे. दुबईच्या वाळवंटात जवळपास ४५ लाखांपेक्षा जास्त फुलांचं हे गार्डन आहे. हे गार्डन फक्त हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते एप्रिल किंवा मेपर्यंत असतं. लाल, पिवळे, निळे, केसरी, अजून विविध रंगांची फुलं आणि त्यापासून बनवलेले वेगवेगळे आकार. मोर, घोडा, पिरॅमिड आणि वेगवेगळे आकार तसेच लाल-पिवळ्या फुलांचे गालिचे बघून या बागेच्या बाहेर रखरखीत वाळवंट आहे हेच विसरायला होतं.
दुबई शहर खूप मोठं आहे. आणि इथे बघण्यासारख्या पण भरपूर गोष्टी आहेत. मॉल, पार्क, मेट्रो ट्रेन, हॉटेल, मिरॅकल गार्डन तर आहेतच, पण इथलं म्युझिअम पण मला खूप आवडलं. आधी हे लोक कसे होते, काय व्यवसाय करायचे आणि आता काय आहेत हे त्यांनी अगदी सुंदर पद्धतीने मांडलं आहे.
‘डेझर्ट सफारी’ ..दुबईला भेट देणाऱ्या प्रत्येकाने अगदी करावीच अशी आहे. तिथे अनुभवलेला प्रत्येक क्षण शब्दात मांडणं खूप अवघड आहे. साधारण संध्याकाळी पाच वाजता आमच्या सगळ्यांच्या लँड क्रुझर जीप्स शहराबाहेरच्या कॅम्पवरून निघाल्या. सीट बेल्ट लावून आम्ही सज्ज झालो. समोर जे दृश्य दिसत होतं ते तर विलक्षण होतं. वाळवंट, समोर नारंगी रंगाचे वाळूचे छोटे छोटे डोंगर. त्याच्यावरून आमची जीप खाली-वर जात होती. अगदी रोलर कोस्टरसारखं. थोडय़ा वेळात सगळ्या जीप्स एका ठिकाणी जमा झाल्या. आणि समोर होतं ते अथांग पसरलेलं वाळवंट आणि अस्ताला जाणारा सूर्य. त्याच्या किरणांनी जणू त्या वाळूचा रंग बदलत होता. नंतर आम्ही सगळे तिथे असलेल्या त्यांच्या कॅम्पवर गेलो. तिकडे सगळं काही होतं.. म्हणजे अगदी उंटावर बसणं, अरेबिक मेहंदी, जेवण, इजिप्शिअन नृत्य, आणि नंतर होतो तो इथला प्रसिद्ध ‘बेली डान्स’. अरबी संगीतावर इथल्या बायकांचं नृत्य आणि त्यांची थिरकरणारी कंबर.. बघणारा खरंच चकित होतो.
दुबईला भेट द्यायची असेल तर हिवाळ्यात जायचं. हवा खूप छान असते. ‘ग्लोबल व्हिलेज’ पण हिवाळ्यातच सुरू होतं नोव्हेंबरमध्ये. ग्लोबल व्हिलेजमध्ये जगातल्या सगळ्या देशांचे पॅव्हेलियन आहेत. इजिप्त, इराण, सौदी, कुवेत, चीन, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, भारत, पाकिस्तान, फ्रान्स, इंग्लंड.. असे बरेच देश असतात. इथे प्रत्येक देशाच्या भागात तिथल्या विशिष्ट गोष्टी मिळतात. म्हणजे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. जो देश हवा त्या पॅव्हेलियनमध्ये जाऊन शॉपिंग करा. सगळं जग माझ्यासमोर आलं की काय असं वाटलं.
शॉपिंग! कमाल आहे दुबईमध्ये यायचं आणि शॉपिंग करायचं नाही? अशक्यच. सोनं.. ज्याच्यासाठी लोकं इथे येतात. इथे तर ‘गोल्ड सुक’ आहे. सुक म्हणजे बाजार.. या भागात तर सगळी सोन्याची दुकानं आहेत. पाहावं तिकडे सोनं. दमास, जॉय अलुकास, गीतांजलीसारखे ब्रॅण्ड्स. काही काहीतर बिल्डिंगमध्ये सगळी सोन्याची दुकानं. सगळीकडे सोन्याचा नुसता लखलखाट आणि वेड लागेल इतके सोन्याचे आणि हिऱ्याचे सुंदर दागिने. कोणतीही फसवेगिरी नाही की तुम्ही पर्यटक आहात म्हणून तुम्हाला जास्त भाव सांगत नाहीत. अजून खरेदी करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही, मोबाइल हे सगळं भारतापेक्षा थोडं स्वस्त मिळतं. अजून बरंच काही. दुबई शॉपिंग फेस्टिवलमध्ये तर खरेदीची पर्वणीच असते. सगळीकडे सवलती. सगळ्या मॉलमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या सवलती. म्हणजे काय घेऊ आणि काय नको असं होतं. जशी खरेदीची तशी खाण्यापिण्याचीही चंगळ आहे. सायबा, पेशवासारखी मराठमोळी हॉटेल्स, हाजी अली ज्यूस सेंटर, पुरनमल, बॉम्बे चौपाटी आहे. संजीव कपूर आणि आशा भोसले यांची हॉटेल्स आहेत. पाकिस्तानी, अरबी, इटालियन अशी भरपूर हॉटेल्स आहेत.
या शहराबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे. इथे यावं आणि निवांत फिरावं. बसने, मेट्रोने फिरावं. देईरा ते बर दुबई छोटय़ा बोटी आहेत, त्यांना ‘अब्रा’ म्हणतात, त्याने मस्त भटकावं. खूप मस्त वाटतं. हाती पैसा आणि कमालीची इच्छाशक्ती असली की माणूस कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो ते दुबईत येऊन समजतं. खरंच दुबई हे एक प्रकारचं मानवनिर्मित आश्चर्य आहे.

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dubai

Next Story
चर्चा : आंबा उत्पादनाची बापट पद्धती!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी