कॅप्सूल एन्डोस्कोपी : १९८१ मध्ये आयरीश फिजिशियन डॉ. इदान याने शोध लावला. एखाद्या गोळीत (कॅप्सूल) एवढा व्हिडीओ कॅमेरा बनवला. ११ मि.मी. x २६ मि.मी. व ४ ग्रॅम वजनाचा हा कॅमेरा होता. यात कलर व्हिडीओ काढायची क्षमता होती व वायरलेस ट्रान्समीटर होता. चार एलइडी लाइट होते व ५०,००० व्हिडीओ फोटो, आठ तासांत जोवर ही कॅप्सूल अन्नमार्गात आहे तोपर्यंत काढण्याची सोय होती.
ही कॅप्सूल व्हिटॅमिनच्या गोळी एवढी असत व बाहेरून पोटाच्या अॅसिडचा व डायजेटिव्ह परिणाम होऊ नये म्हणून बायोकॉम्पॅटिबल पदार्थाचा थर दिलेला असतो. याचे दुसरे नाव वायरलेस कॅप्सूल एन्डोस्कोपी आहे. यातून आठ तास सतत बाहेर फोटो पाठवले जातात. शरीरावर स्पेशल खास अँटीना पॅडमार्फत हे घेऊन पेशंटच्या पोटास बांधलेल्या छोटय़ाशा वॉकमनएवढय़ा रेकॉर्डिग डिव्हाइसमध्ये रेकॉर्ड केले जातात.
नंतर हा रेकॉर्डिग डिव्हाइस काढून घेऊन डॉक्टर त्याची पाहणी करू शकतात. नंतर ही कॅप्सूल शौचावाटे बाहेर टाकली जाते. लहान आतडय़ातील रोग, रक्तस्राव याचे याने निदान करता येते. परंतु ही अत्यंत महागडी तपासणी आहे.
एन्डोस्कोपिक अल्ट्रासाऊंड : ही अंत्यत नवी पद्धत आहे. एन्डोस्कोपच्या टोकास अल्ट्रासाऊंड प्रोब बसवलेला असतो. स्वादुपिंड, पित्तनलिका, पित्ताशय, जठर, लहान आतडे (पहिला भाग) याचे सर्व आजार याने निदान करता येतात. यास पंधरा ते तीस मिनिटे लागतात. या तपासणीत तुकडासुद्धा तपासणीसाठी काढता येतो. पोटाच्या सोनोग्राफीच्या तपासापेक्षा ही जास्त अचूक असते.
ई.आर.सी.पी. (एन्डोस्कोपी र्रिटोग्रेड कोलँजिओ पँक्रिऑटोग्राफी) :
या तपासणीने निदान करता येते, पण त्याहीपेक्षा पित्तनलिकेमधील खडे काढणे, स्वादुपिंडाच्या नळीमधील अडथळा दूर करणे, जर कोठे अडथळा असेल, तर ती नळी घालून रुंद करणे अशा गोष्टी जास्त प्रमाणात करण्यासाठी याचा उपयोग आहे.
पेशंटला क्ष-किरण खोलीत डाव्या कुशीवर झोपवले जाते. घशाच्या मागचा भाग औषधाने संवेदनारहित, स्पर्शरहित केला जातो. मध्यम झोपेचे औषध दिले जाते. मग तोंडावाटे हा एन्डोस्कोप पेशंटला हळूहळू गिळण्यास सांगितला जातो. तो अन्ननलिकेतून, जठरात व तेथून डय़ुओडेनममध्ये घातला जातो. नंतर पेशंटला पोटावर झोपवले जाते व या स्कोपमधून प्लास्टिकची नळी आत घातली जाते. त्या नळीतून डाय घातला जातो. तो डाय क्ष किरण तपासणीने पाहिला जातो व या दोन्ही डक्ट कशा आहेत ते तपासले जाते. जर अडथळा असेल तर तो हळूच हत्याराने काढून टाकला जातो. तसेच बायोप्सीसाठी तुकडा काढता येतो. पेशंटला पोटात दुखते, पण हे लवकरच थांबते.
दुर्बिणीद्वारे चिकित्सा (Therapeutic Endoscopy) :
१) अन्ननलिकेत अडकलेला माशाचा काटा, नाणे वगैरे यांसारख्या गोष्टी दुर्बिणीद्वारे सहज काढता येतात.
२) शरीराच्या आतील वाढलेला मांसाचा गोळा (polyp) या दुर्बिणीने काढता येतो.
३) शरीराच्या आतील वाढलेला भाग वा अन्ननलिका, जठर, मोठे आतडे कुठेही खूप रक्तस्राव होत असेल तर तो थांबवण्यासाठी दुर्बिणीचे साहाय्य घेतात.
४) अन्नमार्गातील वा लघवीच्या मार्गातील अरुंद झालेला भाग रुंद करण्यासाठी व त्यात नळी (stent) टाकण्यासाठी दुर्बिणीचाच वापर करतात. त्यामुळे व्यक्तीला अन्न खाता येते किंवा लघवी करणं सुलभ होते. याच प्रकारे स्टेन्ट टाकून- अवरोधक कावीळही बरी करता येते. (अवरोधक कावीळ ही पित्ताशयाची पित्तनलिका ब्लॉक झाल्याने होत असते)
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (एन्डोस्कोपी) : ज्या शस्त्रक्रिया पूर्वी पोट उघडूनच केल्या जात असत त्यापैकी बऱ्याचशा शस्त्रक्रिया हल्ली दुर्बिणीतून केल्या जातात. त्यामुळे मोठी शस्त्रक्रिया टाळता येते. दुर्बिणीमुळे आतील सर्व अवयव सुस्पष्ट दिसतात व बाहेर स्क्रीनवर पण पाहता येतात. येथे दुर्बीणमधून विविध उपकरणे आत टाकली जातात व शस्त्रक्रियेला सुरुवात होते. त्यामुळे शस्त्रक्रिया सुलभ होते. त्यामुळे रुग्ण लवकर फिरू लागतो. आतल्या जखमा लवकर भरतात व फारच कमी दुखते, हॉस्पिटलमध्ये फार तर दोन-तीन दिवस राहायला लागते. यामुळे दिवसेंदिवस अशा शस्त्रक्रियांचं प्रमाण वाढत राहणार आहे.
दुर्बिणीद्वारे खालील शस्त्रक्रिया करता येतात.
ा अन्ननलिकेचा मार्ग रुंद करणे
ा पित्तनलिकेतले खडे काढणे.
ा अनेकदा अन्ननलिकेत रक्तवाहिन्या मोठय़ा होऊन
फुटतात व रक्ताच्या खूप उलटय़ा होत राहतात- अशा वेळेला दुर्बिणीद्वारे अन्ननलिकेत जाऊन
या रक्तवाहिन्यांमध्ये इंजेक्शनद्वारे हा रक्तस्राव बंद करणं.
ा जठराचा किंवा आतडय़ाचा रस्ता अरुंद झाला असेल तर तो स्टेन्ट टाकून मोठा करता येतो.
ा पित्तनलिका अरुंद किंवा बंद होऊन कावीळ झाली असेल तर दुर्बिणीद्वारे ही नलिका उघडून त्यात स्टेन्ट टाकणे व कावीळ कमी करणे.
ा मोठय़ा आतडय़ात गाठी असतील तर त्या दुर्बिणीतून काढता येतात.
ा पोटाच्या आत अवयवाचा गुंता होऊन ते अडकले असतील तर ते दुर्बिणीद्वारे सोडवता येतात.
ा अन्नमार्गातील सुरुवातीचा कर्करोगदेखील दुर्बिणीतून शल्यक्रियेने काढता येतो.
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचे फायदे :
ा पोटात जखम नसल्याने रुग्ण लवकर बरा होऊन काम करू शकतो.
ा पोटाची चिरफाड नसल्याने रक्तस्राव व्हायचं प्रमाण कमी असतं.
ा रुग्णाला recovery साठी हॉस्पिटलमध्ये २ ते ३ दिवसच राहावं लागतं, म्हणजे लवकर घरी जाता येतं.
ा जखम लहान असल्याने कमी दुखते.
ा पोटावर शस्त्रक्रियेची मोठी खूण राहात नाही.
ा रुग्णाच्या जिवाला धोका कमी संभवतो.
हे तंत्रज्ञान वापरणाऱ्या व्यक्तीला अनेक वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. त्यासाठी त्याचे नीट प्रशिक्षणदेखील झालेले असावे. आपल्या देशात असे अनेक स्वयंभू आहेत की अनुभव नसतानादेखील ही मंडळी हे तंत्रज्ञान रुग्णांवर वापरतात. त्यामुळे निदान अनेक घोटाळे तर होतातच, पण रुग्णांसाठी हे धोकादायक ठरू शकतं.
डॉ. अविनाश सुपे
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2015 रोजी प्रकाशित
एन्डोस्कोपीतील नवीन उपचार पद्धती
जठराच्या एन्डोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी व्यतिरिक्त एन्डोस्कोपीमध्ये अनेक नवीन सुधार/उपचार पद्धती आल्या आहेत.

First published on: 15-05-2015 at 01:21 IST
मराठीतील सर्व कशासाठी? पोटासाठी! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Endoscopy