कॉलेजची तयारी झाली? नाही.. नाही.. पुस्तकं-वह्य़ा वगैरेंची चौकशी नाहीय ही! ड्रेस, अ‍ॅक्सेसरीज, चप्पल-बूट, बॅग्ज या सगळ्याचं काय? सध्या का इन आहे, काय आऊटडेटेड झालंय हे माहितेय ना? चला तर मग कॉलेजसाठी तुमच्या मनासारखं शॉपिंग करून टाकूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘यार, सॉलिड बोर होतंय.. हे कॉलेज कधी सुरू होणार?’ मे संपत आला की सगळ्यांचे फोन खणाणू लागतात. वर्षभर ज्या मंडळींना कॉलेजची भिंत काळी की गोरी हेही माहीत नसतं, ती मंडळी कॉलेज सुरू होण्याच्या वाटेवर लक्ष ठेवून असतात. फेसबुक, ट्विटरवर ‘दोस्तों से बिछडने के बाद’ पद्धतीचे मॅसेजेस फिरू लागतात. हे हवामान दिसलं की समजावं- ‘बाबांनो पोरं सुट्टीला कंटाळली आहेत.’ मग चला आज थोडय़ाच दिवसांमध्ये सुरू होणाऱ्या कॉलेजच्या तयारीला लागू या. अर्थात आता आपण इथे पुस्तकं, अभ्यासक्रम याबद्दल बोलणार नसून फॅशनबद्दल बोलणार आहोत. शेवटी तब्बल दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर तुम्ही कॉलेजला जाणार आहात. सो, अपना तशन दिखाना तो बनता है ना!
कॉलेजला तुमचा मान-रुबाब टिकवून ठेवायचा असेल, तर पॉकेटमनीची सोय करा आणि शॉपिंगला निघा. कॉलेजचे पहिले चार महिने पावसाळ्याचे असतात. त्यामुळे नवीन जीन्स घ्यायचा विचार करणार असाल तर खबरदार.. सध्या तो विचार बाजूला ठेवा. कारण पावसात भिजल्यावर या डेनिम्सचं वजन वाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्याऐवजी पलॅझोची विजार नक्कीच करू शकता. थ्री-फोर्थ डेनिमचा पर्याय सर्वात सेफ पर्याय असतो. पण सध्यातरी या सीझनसाठी या पर्यायाकडे नाही पाहिलेत तर उत्तम. कारण या डेनिम्सची रवंथ करणाऱ्या गायीसारखी परिस्थिती झाली आहे. यातली सगळी मजा निघून गेली आहे. फक्त सोपस्कार म्हणून त्या अजूनही घातल्या जातात. त्यांना पर्याय आहे स्कर्ट्सचा. छान गुडघ्यापर्यंतच्या लेन्थचे स्कर्ट्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. प्रिंटेड किंवा प्लेन, कोणत्याही स्टाइलमध्ये तुम्ही स्कर्ट्स निवडू शकता. त्यावर छान टी-शर्ट्स, गंजी किंवा क्रॉप टॉप घाला आणि तुम्ही रेनी सीझनसाठी तयार असाल. मुलांना पण या काळात जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. जीन्सऐवजी बर्मुडाजचा पर्याय कधीही उत्तम. काही कॉलेजेसमध्ये बर्मुडाज घालायला परवानगी नाही. अशा वेळी तुम्ही कन्व्हर्टेबल कार्गोज किंवा ट्राऊझर्स वापरू शकता. कॉलेजच्या बाहेर जाण्यापूर्वी फक्त एका झीपच्या साहाय्याने या कागरेज छोटय़ा करता येतात. त्यासोबत टी-शर्ट्स आहेत, तुमच्या जीवाभावाचे साथीदार.
पावसाळ्यानंतरही पलॅझोचा पर्याय कायम राहतो. गंजीस आणि पलॅझोची जोडी मस्त जमते. तसेच जंपसूट्सकडे पण नक्कीच लक्ष द्या. या सीझनमध्ये जंपसूट्समध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील काही तुमच्या वॉडरोबमध्ये असायला हरकत नाही. टाइट लेगिंग्स कॉलेजसाठी मस्ट आहेत. वन पीस ड्रेस ते मिनी स्कर्ट्स, अगदी प्रत्येकावर त्या तुम्ही घालू शकता. स्लिव्हल्स जॅकेट्सचा पर्यायही तुमच्याकडे आहेच. बोरिंग टी-शर्टना जॅकेट्समुळे जान येते.
सध्या बोल्ड प्रिंट्सची लाट आली आहे आणि या लाटेवर तुम्ही डोळे बंद करून स्वार होऊ शकता. त्यामुळे संधी आहे तर या प्रिंटेड कपडय़ांचे छान कलेक्शन करून घ्या. टी-शर्ट्सपासून ते कॉप टॉप्सपर्यंत, स्कर्ट्स, ट्राउझर्स, पेलॅझो, वन-पीस ड्रेसेस, जॅकेट्स सगळ्यामध्ये प्रिंट्स सध्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मुलांनाही हा ऑप्शन उपलब्ध आहे. फ्लोरल प्रिंट्सचा ऑप्शन तुमच्यासाठी आता खुला झाला आहे. त्यामुळे हे फक्त मुलींसाठीच असतं असा गैरसमज करून घेऊ नका. कपडय़ांमधून मन भरलं नसेल तर जरा अ‍ॅक्सेसरीजकडेही लक्ष द्या. तिथेही या प्रिंट्सनी कब्जा केलेला आहे. नेकलेसेसपासून बँगल्सपर्यंत, चप्पलपासून बॅग्सपर्यंत सगळीकडे प्रिंट्सचं राज्य आहे. त्या राज्याचे सभासद होण्याची वेळ आता आली आहे.
प्रिंट्सचं पुढचं पाऊल आहे टॅग लाइन्स. यांच्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल आणि नजरही पारखी असायला हवी. तरच तुम्हाला युनिक आणि कॅची टॅगलाइन्स शोधण्यात यश मिळू शकतं. ‘बाबाजी का थुल्लू’सारख्या कित्येक टॅगलाइन्स आता जुन्या झाल्या आहेत. आता जमाना नवीन टॅगलाइन्सचा आहे. त्यात गब्बर आहे, मोगँबो आहे आणि बॉलीवूडचे अनेक नवीन चेहरेमोहरे आहेत. तुमच्या पर्सनॅलिटीला सूट होणाऱ्या अनेक टॅगलाइन्स तुम्हाला बाजारात सापडतील.
कलर्समध्ये सध्या पेस्टल कलर्स गाजताहेत. बेबी पिंक, लेमन यलो, पोपटी, आकाशी अशा अनेक शेड्स तुम्हाला पाहायला मिळतील. सफेदपेक्षा क्रीम कलर ट्रेंडमध्ये आहे. जांभळा रंग तर या वर्षीचा सगळ्यात हिट कलर आहे. ऑरेंज शेडसुद्धा ट्राय करायला हरकत नाही. मुलांसाठीसुद्धा तरुणींच्या मक्तेदारीतील लाल आणि गुलाबी रंगांच्या शेड्स आता खुल्या झाल्या आहेत. बेबी पिंक रंगाची डेनिम घातलेला कोणी कॉलेजला भेटला तर थक्क होऊ नका. आता त्याचाच जमाना आहे.
आता थोडं अ‍ॅक्सेसरीजकडे वळू या. स्टेटमेंट नेकपीसना बाजूला सारून परत एकदा पेंडंट्सना जवळ करा. पेंडंट्सचा वापर लेअरिंग करायला पण होऊ शकतो. मोठे कडे घालण्याऐवजी लहान ब्रेसलेट्स किंवा बँगल्स घालू शकता. मुलांमध्येही पेंडंट्स चलतीत आहेत.
कॅप्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. वेगवेगळ्या स्टाइल्स ट्राय करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या कॅप्सचे कलेक्शन आता तुमच्याकडे असलेच पाहिजे. पण याचा अर्थ व्हिक्टोरियन स्टाइलच्या फुलाफुलांच्या हॅट्स जमवू नका. छान क्लासी, शॉर्ट कॅप्सच निवडा.
बॅलरिनाज विल नेव्हर डाय. त्यामुळे ही निवड कधीच चुकू शकत नाही. तसेच चप्पल्सचा ऑप्शन नक्कीच ट्राय करा. पण सिंगल कलरच्या चपाक चपाक आवाज करणाऱ्या चप्पल्सबद्दल मी नाही बोलत आहे. छान फंकी प्रिंट्स असलेल्या चप्पल्स सध्या उपलब्ध आहेत, त्या वापरायला हरकत नाही.
सनग्लासेसची सध्या भयंकर क्रेझ आहे, तितकीच ती स्पेक्सचीही आहे आणि आता तर स्पेक्स घालण्यासाठी तुम्हाला नंबर असण्यासाठी गरज नाही. स्ट्रीट शॉपिंगमध्ये तुम्हाला अनेक नॉनफंक्शनल स्पेक्स मिळू शकतात. त्याने छान गीक लूक मिळतो. गीक लूक आता बोरिंग नाही बरं का. बॉलीवूडच्या कित्येक सेलेब्रिटीज सध्या या लूकच्या प्रेमात आहेत. त्यामुळे इसके बारे में कुछ नहीं बोलने का..
कॉलेजची तयारी करताय आणि बॅगपॅकर्सना विसरून कसं चालेल? त्या जुन्या झोले किंवा सॅक्सना अलविदा म्हणण्याची वेळ आली आहे. त्याऐवजी छान बॅगपॅक निवडा. सध्या बॅगपॅकर्सना कव्हर्स पण जोडलेली असतात, त्यामुळे पावसाळ्यात किंवा ट्रिपला जाताना बॅगपॅकची चिंता करायची गरज नसते.
चला मग बॅग पॅक करा आणि निघा कॉलेजच्या वारीला.

मराठीतील सर्व रॅम्पवर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion in college campus