आज प्रत्येक क्षेत्र तरुणाईने काबीज केलंय. त्यात मराठी सिनेसृष्टीतलं संगीत क्षेत्रही मागे नाही. गेल्या वर्षभरापासून संगीत क्षेत्रात तरुण गायक-संगीतकारांची संख्या प्रकर्षांने दिसून येतेय. नवीन वर्षांत प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांमध्ये ही तरुण फळीच मोठय़ा प्रमाणावर दिसून येणार आहे. प्रवास, स्पर्धा, प्रयोग याबाबत केलेली बातचीत.
‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’ असो किंवा ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ मालिकेमधलं ‘नाही कळले कधी’ हे गाणं असो; अनेकांच्या मोबाइलमधल्या प्ले लिस्टमधली ही गाणी. थोडय़ा वेगळ्या बाजाचं ‘नारबाची वाडी’मधलं ‘शबय शबय’ हेही त्या यादीत असलेलं गाणं. अलीकडच्या प्रेमकहाणी असलेल्या सिनेमांमधल्या रोमँटिक गाण्यांचीही या यादीत भर पडली आहे. या सगळ्या लोकप्रिय गाण्यांमागे तरुण गायक-संगीतकार आहेत. कोणी रिअॅलिटी शोमधून आलं; तर कोणी आपलं नशीब अजमवायला मुंबईत सेट झालं. सगळ्यांचं ध्येय एकच. संगीत क्षेत्रात करिअर घडवायचं. बाहेरून इंडस्ट्री जितकी सोपी वाटते तितकी ती नक्कीच नाही. अशा वेळी या इंडस्ट्रीच्या वर्तुळात शिरणंसुद्धा आव्हानात्मक वाटू लागतं. हे आव्हान पेललं ते या तरुण मंडळींनी. मिळालेल्या संधीचं सोनं करत आज इंडस्ट्रीत यंगिस्तानचं नाव होताना दिसतंय. त्यांनी केलेले प्रयोग, त्यांचा आवाज, गायकी, स्टाईल हे सगळंच प्रेक्षकांना भावतंय. संगीतातली ही नवी पिढी काही नवं देऊ पाहतेय. सिनेसृष्टीतल्या अनुभवी लोकांकडून त्यांना शाबासकीची थापच मिळतेय. आपल्याला काय येतंय, आपण काय देऊ शकतो, कोणती आव्हानं पेलू शकतो, आपण केलेल्या कामाचं मार्केटिंग कसं करायचं हे ही पिढी जाणून आहे. म्हणूनच प्रेक्षकांची या यंग ब्रिगेडला पोचपावती मिळतेय.
हेच हवं, तेच हवं हा दृष्टिकोन ते बाळगत नाहीत, हे त्यांचं वैशिष्टय़. आवडीनिवडी त्यांच्याही आहेत. पण वेगवेगळे प्रयोग करण्याची त्यांची तयारीही आहे. कोणत्याही संगीताचा पाया शास्त्रीय संगीत असतो. हे या पिढीने मनात पक्कं कोरलं आहे. म्हणूनच ते शास्त्रीय संगीताची साथ सोडत नाहीत. सिनेमांमध्ये सुगम संगीताची गाणी गायला मिळत असली, तरी त्यांची शास्त्रीय संगीताची आवड ते अनेक कार्यक्रमांमधून जोपासत असतात. इव्हेंट्समध्ये या तरुण गायक-संगीतकारांना प्रचंड मागणी आहे. त्यांची लोकप्रियता आणि त्यांनी गायलेली गाणी बघता त्यांना अशा कार्यक्रमांमध्ये गाण्याच्या अनेक ऑफर्स येत असतात. यानिमित्ताने सिनेमातल्या नायक-नायिकांचा ‘आवाज’ कार्यक्रमांमधून बघायला मिळतो. आवाजाप्रमाणे सादरीकरणाला महत्त्व असतं, याचीही ते माहिती ठेवून आहेत. स्वत: काम करताना इतर काय करतायत याकडेही त्यांचं लक्ष असतं. अर्थात यामागे द्वेषाची भावना नक्कीच नाही. त्यातून काय चांगलं घेता येईल ही त्यामागची भावना. स्पर्धेत असलेल्यांचं काम आवडलं म्हणून त्यांचं कौतुक करण्याचीही वृत्ती या पिढीमध्ये दिसून येते. आपण काय काम करतोय, ते कशा प्रकारे केल्यावर प्रेक्षकांना आवडेल याचीही त्यांना जाण आहे. म्हणूनच आता त्यांचं सोशल मीडियावर अपडेट राहण्याचं प्रमाण वाढलंय. थोडक्यात, ट्रेंड, गाण्याचा बाज, आवाज, स्वीकारलेलं काम उत्तमरीत्या पूर्ण करण्याची कला या सगळ्यामुळे नव्या वर्षांतले हे नवे सूर श्रोत्यांना नक्की आवडतील.
सावनी रवींद्र
बीए संस्कृतमध्ये आणि एमए मराठी आणि संगीतात केलेल्या सावनीला महाराष्ट्र शासनाची पं.भीमसेन जोशी ही शिष्यवृत्तीही मिळाली आहे. ‘सारेगमप’नंतर ‘अजिंठा’ या सिनेमात गाण्याची तिला संधी मिळाली. त्यानंतर त्याच वर्षी ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ या मालिकेतल्या ‘नाही कळले कधी’ या सुपरहिट गाण्याने ती लोकप्रिय झाली. ई टीव्ही मराठीवर सुरू असलेल्या ‘कमला’ या मालिकेचं शीर्षकगीतही तिने गायलंय. पाश्र्वगायनासह सावनी देशा-परदेशात कार्यक्रमांचे अनेक दौरे करते. उत्तम गायनासह नावीन्यपूर्ण गोष्टींचा विचार करत वेगवेगळे प्रयोग करण्याच्या संकल्पनाही ती आजमावत असते. ‘लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन दिग्गज गायिकांच्या गाण्यांचं सादरीकरण ‘लताशा’ या कार्यक्रमातून करते. या कार्यक्रमाचे सुरुवातीचे काही प्रयोग मी एकटीने केले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी या कार्यक्रमाला चांगली दाद दिली. तसंच कार्यक्रमाचा एक भाग होण्याची इच्छाही व्यक्त केली.’ मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या तरुण संगीतकार आणि गायक-गायिकांची लाट दिसतेय. यामध्ये स्पर्धाही दिसून येते. पण, या स्पर्धेकडेही सकारात्मकदृष्टय़ा बघितलं पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. ती सांगते, ‘प्रत्येक क्षेत्रातच स्पर्धा असते. तशी ती आमच्या क्षेत्रातही आहे. पण, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा. ती स्पर्धा निकोप असली पाहिजे. एका सिनेमात तीन-चार संगीतकार असण्याचा ट्रेंड सध्या दिसतोय. पण, त्यामुळे संगीतातलं वैविध्यही प्रेक्षकांसमोर येतंय. एकमेकांच्या कामाचं आम्ही कौतुकही करतो. प्रत्येकाची एक खासियत आहे. त्यानुसार प्रत्येकाची तशी ओळखही आहे.’ ‘अजिंठा’, ‘गुरुपौर्णिमा’, ‘ती रात्र’ या सिनेमांतून सावनी गायली आहे. तर आगामी ‘नीळकंठ मास्तर’, ‘इपीतर’ अशा काही सिनेमांमध्ये ती गाणार आहे.
प्रियांका बर्वे
आजच्या वाढत्या रिअॅलिटी शोजबद्दल ती सांगते, ‘‘रिअॅलिटी शोच्या पलीकडेही स्पर्धा आहे. तिथे फक्त फेसव्हॅल्यू मिळते. ते क्षणिक असतं. तिथून बाहेर पडल्यावरही संघर्ष हा करावाच लागतो. ठरावीक काळानंतर नवनवीन गायक-संगीतकार इंडस्ट्रीत येतात. त्यामुळे स्पर्धा निश्चित वाढली आहे. कामाचा वेगही वाढलाय. पण, मला वाटतं, स्वत:चं काम करत राहावं. आपण आपले शंभर टक्के द्यावेत. इंडस्ट्रीमधून नवनवीन प्रयोगांना चांगल्या प्रतिक्रिया मिळतात. तसंच अनुभवी लोक मार्गदर्शनही करतात.’’ चॅनल्सच्या प्रमोशनल गाण्यांमध्येही ती गायली आहे. झी मराठीचं नुकतंच एक प्रमोशनल गाणं प्रदर्शित झालं. त्यात प्रियांकानेही गायलं आहे. तसंच नाईन एक्स झक्कास या चॅनलच्याही प्रमोशनल गाण्यात तिचा आवाज आहे. आत्तापर्यंत तिने गायलेल्या गाण्यांमध्ये वैविध्य आहे.
‘रमा माधव’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’, ‘मुक्काम पोस्ट धान्होरी’, ‘गोंदण’ या सिनेमांमध्ये ती गायली आहे. ‘डबलसीट’, ‘बाइकर्स अड्डा’ या सिनेमांसह तिचे काही अल्बमही लवकरच येणार आहेत. गझल, नाटय़गीत, पाश्र्वगायन, लावणी असे सगळेच संगीताचे प्रकार तिच्या आवडीचे आहेत.
आनंदी जोशी
स्वत: चांगली कामं करत असताना इतरांच्याही चांगल्या कामाचं कौतुक करायला आनंदी विसरत नाही. स्पर्धेबाबत ती सांगते, ‘‘दुसऱ्या कोणाला चांगलं काम मिळाल्याचा मला खरंच आनंद होतो. कोणी कोणाच्या नशिबात असलेल्या गोष्टी खेचून घेऊ शकत नाही. ज्याच्या नशिबात जे आहे त्याला ते मिळणारच. त्यामुळे मला स्पर्धेचं अजिबात टेन्शन येत नाही. तसंच आताच्या गायकांचा आवाज एकमेकांपेक्षा वेगळा आहे.’’ मनोरंजन क्षेत्र हे क्रिएटिव्ह क्षेत्र आहे. त्यामुळे इथे प्रयोग करण्याला पर्याय नाही. पण, नवीन पिढीकडून केल्या जाणाऱ्या प्रयोगांचं अनुभवी लोकांकडून नेहमी कौतुक होतंच असं नाही. याबाबतही आनंदी सांगते, ‘‘कलाकाराने सतत प्रयोगशील राहायला हवं. तो ‘प्रयोग’ असतो. कधी यशस्वी होतो तर कधी नाही. एखादा प्रयोग आवडला तर अनुभवी गायक, संगीतकार कौतुक करतात. पण, नाही आवडला तरी बारीक चिमटा काढतात. पण, हा चिमटा दुखावणारा नसतो. त्यात प्रोत्साहनाची भावना असते.’’ ‘वन टू थ्री फोर’, ‘डबलसीट’, ‘व्हॉट अबाऊट सावरकर’, ‘पीजी’, ‘वाँटेड बायको नंबर वन’, ‘फुंकर’ अशा आगामी सिनेमांमध्ये आनंदीची गाणी ऐकायला मिळणार आहेत. तसंच नवीन वर्ष तिच्यासाठी खास असल्याचं महत्त्वाचं कारण ती आवर्जून सांगते, ‘‘सोनू निगम आणि कुणाल गांजावाला या दोन लोकप्रिय गायकांसोबत माझी दोन डय़ुएट गाणी असतील. तसंच आयुशमान खुराना असलेला ‘हवाईजादा’ या आगामी सिनेमातल्या एका गाण्यात मी छोटासा भाग गायले आहे. त्यामुळे येणारं वर्ष माझ्यासाठी खूप मस्त असणार आहे.’’ सुगम संगीताची आवड असली तरी पाश्चिमात्य संगीत, शास्त्रीय संगीत, गझल्स असे संगीताचे अनेक प्रकार ती ऐकत असते. गायक-संगीतकार जेवढं ऐकतो तेवढा तो समृद्ध होतो असं तिचं म्हणणं आहे.
कीर्ती किल्लेदार
‘का रे दुरावा’ या मालिकेचं शीर्षकगीतही तिने गायलंय. याआधी काही मालिकांमध्ये विशिष्ट ट्रॅकसाठी तयार केलेल्या गाण्यांमध्ये कीर्तीने गायलं आहे. ‘तुजवीण सख्या रे’, ‘तुझं माझं जमेना’ या मालिकांमधली गाणी तिने गायली होती. या इंडस्ट्रीत सतत कामं मिळणं म्हणजे एखाद्याचं नशीबच. कोणतीही गोष्ट इथे वेगाने घडत असते. याच वेगवान इंडस्ट्रीबद्दल कीर्ती सांगते, ‘मराठी संगीत क्षेत्रातलं तरुण गायक-संगीतकारांचं प्रमाण वाढत असलं तरी स्पर्धाही त्याचप्रमाणात वाढत आहे. प्रत्येक आर्टिस्टला इथे कमी स्पॅन मिळतो. आधीचे गायक खूप वर्षं गात होते. आज हे चित्र दिसत नाही. त्यामुळे प्रत्येकाला हिट गाणं हवं असतं. प्रसिद्ध व्हायचं असतं. ओळख निर्माण करायची असते. प्रचंड वेग वाढलाय. वेगाने काम करण्याचं आव्हान हे गीतकार, संगीतकार, गायक असं सगळ्यांनाच पेलायचं असतं. आज तंत्रज्ञानाला खूप महत्त्व प्राप्त झालंय. क्रिएटिव्हिटीलाही तितकंच महत्त्व आहे. तरुणांच्या मनाला भावतील असं संगीत निर्माण केलं जातंय, ही चांगली गोष्ट आहे.’
कीर्ती मराठी सिनेमांप्रमाणे इतरही काही भाषांमध्ये रुळली आहे. तमिळ उडिया भाषांमध्ये काही अल्बम तिने गायले आहेत. नसिरुद्दीन शहा यांच्या ‘द ब्लू बेरी हंट’ या सिनेमातही ती गायली आहे. या वर्षांत माँटी शर्मा या नावाजलेल्या संगीतकारासोबत ती काही हिंदी सिनेमांमध्ये गाणार आहे. गेल्या वर्षी एका रेडिओ चॅनलच्या ‘बेस्ट साँग ऑफ इ इअर’ या पुरस्कारासाठी तिच्या ‘दुनियादारी’ आणि ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ यामधली गाणी सवरेत्कृष्ट ठरली.
अमितराज
लोकप्रिय सिनेमांचं सुपरहिट संगीत दिलेल्या अमितला एका गोष्टीची मात्र खंत आहे. तो त्याबाबत स्पष्ट बोलतो, ‘‘सिनेमाच्या उभारणीच्या वेळी कथा-पटकथा, कलाकारांची निवड, लोकेशन्स या सगळ्यांबाबत चर्चा केली जाते. त्याच वेळी संगीतकारांबाबतही निर्णय घेतले जावेत. असं केलं तर अधिक चांगल्या प्रकारे काम करता येईल. तसंच एका सिनेमात एकापेक्षा जास्त संगीतकार असण्याचा ट्रेंड दिसतो. यामुळे संगीतात वैविध्य येऊन ते आकर्षक होतं हे मान्य केलं तरी त्यात काम करणाऱ्या संगीतकारांना समान न्याय मिळत नाही.’’ अमितचा हिंदीतला अनुभव चांगला आहे. त्याचं एक निरीक्षण तो सांगतो, ‘‘हिंदीमध्ये कोणत्याही कलाकाराला प्रोत्साहन दिलं जातं. आपल्याकडेही ते होत नाही असं नाही; पण एखाद्याच्या पहिल्या प्रयत्नावरच काही वेळा टीका केली जाते. तसं न करता त्याला प्रोत्साहन द्यावं, कारण त्याने विशिष्ट गोष्टीसाठी प्रचंड मेहनत घेतलेली असते. एखाद्या कलाकाराला दाद हवी असते. त्याला पैशांनी मोजता कामा नये. त्याला प्रोत्साहन दिलं तर तो आणखी चांगल्या प्रकारे काम करू शकतो.’’ त्याचे ‘क्लासमेट्स’, ‘मितवा’, ‘बंध नायलॉनचे’, ‘दगडी चाळ’ असे सिनेमे वर्षांच्या सुरुवातीच्या काळात येणार आहेत.