कोलकाता विमानतळावरून आमच्या जेट एअरवेज विमानाने आकाशात झेप घेतली व हिरवा भूमिप्रदेश तसेच पांढरे ढग प्रदेश झरझर मागे पडू लागले. ८ ते १३ मार्च २०१४ अशी सहल.
हे पहिलेच परदेश गमन. थायलंड कोलकाताहून जवळ व भारताला सर्वात जवळ, जायचा खर्च कमीत कमी म्हणून हा देश निवडला. मनात भीती, चिंता, हुरहुर होती! विमान सुखरूप जाईल का? भाषेचा प्रश्न येईल का? ठरल्याप्रमाणे टॅक्सी व चालक येऊन रिसीव्ह करेल का? हॉटेल खोली कशी असेल इ.इ.! अनेक शंका!! परंतु सात दिवसांची पटाया- बँकॉक सहल अगदी मजेत पार पडली.
सुहास्य वदन हवाई-सुंदरींने चहा, कॉफी, बिअर, नाश्ता, जेवण देणे सुरू केले व त्याचा आस्वाद घेताना प्रवाशांना सुवर्णभूमी एअरपोर्ट बँकॉक केव्हा आले कळले सुद्धा नाही. चार तास सहज निघून गेले.
केवढा भव्य हवाई अड्डा!! ठरल्याप्रमाणे चालक व टॅक्सी तयारच होते. सहा पदरी (२्र७ ’ंल्ली) गुळगुळीत सिमेंट रोडने प्रति तास १२० कि.मी.च्या वेगाने बँकॉक ते पट्टाया अशी टॅक्सी धावू लागली. सुंदर स्वच्छ परिसर, गुळगुळीत रस्ते, कोठेही हॉर्न नाही. त्यांना हे जमले तर मग आम्हाला का जमू नये? आम्ही भारतीय मागे का? हॉर्न वाजवायचा एवढा शौक भारतीयांना का?
अडीच तासांत पटाया गाठले. आम्ही ठरवलेल्या हॉटेलात पोहोचलो. सुंदर जलतरण तलावात मी, माझी पत्नी सुजाता व मित्र अनिल वर्मा यांनी जलक्रीडा केली व ताजेतवाने झालो. फ्रंट डेस्कवर सगळय़ाच तरुणी. सगळा कारभार स्त्रियाच बघतात. रिसेप्शनिस्टने आमचे स्वागत करून खोलीच्या किल्ल्या दिल्या व आम्ही लगबगीने अल्काझार शो पाहायला निघालो. टॅक्सी तयार होतीच. अल्काझार हा भव्य, नेत्रदीपक डान्स शो तृतीयपंथी सादर करतात हे खरेच वाटत नाही. नर्तक-नर्तकींचे आकर्षक पोशाख, विविध नृत्य व नाटिका प्रेक्षक डोळे विस्फारून बघतात. भव्य स्टेज, सुंदर पोशाख, यात एक भारतीय नृत्यसुद्धा आहे.
पट्टायाचा दुसरा दिवस बिच रोडवर फिरणे, कोरल आयलँड दर्शन, विविध धाडसी, समुद्री खेळ, पॅरासेलिंग, मास्क घालून समुद्र तळाशी चालणे असा घालवला व भरपूर आनंद घेतला.
पट्टायाचे खास आकर्षण म्हणजे तेथील नाइट लाइफ. यासाठी जे पर्यटक जातात त्यांना पट्टाया निराश करत नाही. रोमान्स व डान्सने भरपूर असे क्लब्स, डान्सफ्लोअर्स, डान्सर्स, बीअर बार, रात्री आठनंतर झगमगतात. अनेक देशांच्या नर्तकी आहेत, नृत्य करा, अनेक मसाज सेंटर आहेत, विविध मसाज प्रकारचा आनंद घ्या.
दुसऱ्या दिवशी बँकॉक (राजधानी)साठी टॅक्सीने रवाना झालो. बँकॉकचे आकर्षण म्हणजे साडेपाच टन वजनाची शुद्ध सोन्याची बुद्धाची मूर्ती. पिवळय़ा धमक मूर्तीकडे बघत राहा. डोळे दिपून जातात. वामकुक्षी घेणारा बुद्धा, भव्य मूर्ती व प्रचंड मंदिर बघून तुम्ही थक्क होता. यानंतर डायमंड म्युझियम बघितले तेसुद्धा अप्रतिम. एक करोड, वीस लाखांचा रत्नजडित मयूर, कितीही बघा, मन भरत नाही. विक्रीस उपलब्ध आहे. घेता का?
पुढील दिवस सफारी वर्ल्ड या विस्मय नगरीत कसा संपला, कळलेच नाही. ओरँग-उहांग (माकड) शो, सी लायन शो, डॉल्फिन शो, स्टंट शो, विविध प्राणी सगळेच भव्य व शानदार. आपण बंद गाडीतून फिरतो व वाघ, सिंह, बिबटे, पँथर सगळेच मोकळे. ते मोकळे व आपण बंदिस्त. त्यांच्या विविध क्रीडा व भावमुद्रा बघा व कॅमेरात टिपून घ्या.
तर असे हे सर्वागसुंदर थायलंड. येथील नुंग नुच व्हिलेजमध्ये एलिफंट शो बघा व थक्क होऊन जा. सोंडेत ब्रश धरून हत्ती चित्र काढतो! बसतो का विश्वास??
येथील भाषा अगदी मृदू, कठोर उच्चार नाहीतच. धन्यवाद साठी म्हणा ‘खापून खाप’ अगदी कोमल स्वरात. यांचे चलन बाथ. आपले दोन रुपये द्या तर त्यांचा एक बाथ मिळतो. भारतीय भोजनालये बरीच आहेत परंतु फळे वा थाई फूड स्वस्त पडते. मांसाहार स्वस्त आहे. आपण त्यांच्या दोन तास मागे आहोत. त्यांच्याकडे सकाळचे सात म्हणजे आपल्याकडे सकाळचे नऊ.
थायलंडला केवळ भारतातून रोज एक लाख पर्यटक इथे भेट देतात व व्हिसा चार्ज चे रु. दोन कोटी प्रति दिवस त्यांच्या तिजोरीत टाकतात. इतर दीडशे देशांचे पर्यटक वेगळेच. असा हा पर्यटकांचा प्रिय देश. मग माझा भारत मागे का? जगातल्या पर्यटकांना आपण का आकर्षित करू शकत नाही? त्यांचे रस्ते आमच्याहून सुंदर व गुळगुळीत कसे? स्वच्छता, कायदा व अनुशासन, प्रामाणिकपणा यात ते आमच्याहून पुढे कसे काय? त्यांची अर्थव्यवस्था आमच्याहून सक्षम कशी काय? हॉर्न न वाजवता त्यांचा ट्रॅफिक कसा काय चालतो. आम्हालाच ही वाईट सवय का? असे अनेक प्रश्न मनात ठेवून आमची ही सहल पुन्हा कोलकाता विमानतळावर समाप्त झाली. कोणत्याही पर्यटन कंपनीतर्फे न जाता, स्वत:च ही सहल आखली. ट्रॅव्हल हबची त्यासाठी मदत झाली.
मग काय म्हणता? जाता ना स्वप्ननगरी थायलंडला?
संग्रहित लेख, दिनांक 13th Jun 2014 रोजी प्रकाशित
ट्रॅव्हलॉग : मनमोहक थायलंड
आपल्या देशातून दररोज लाखभर पर्यटक थायलंडला जातात. केवळ व्हिसापोटी आपण थायलंडला दररोज दोन कोटी रुपये देतो.
First published on: 13-06-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impressive thailand