पोट या शब्दानंतर मी पद्मजाला नाक या शब्दाबद्दल शिकवायचे ठरविले. नेहमीप्रमाणे सकाळी आम्ही सर्व जण नाश्त्यासाठी जमलो. सौने मला सांगितले की,आज ऑफिसमधून घरी येताना कांदे घेऊन या, संध्याकाळी कांदेपोहे करणार आहे. मी लगेच पद्मजाला म्हटले की तुला माहीत आहे का नाकानेदेखील कांदे सोलतात. तेव्हा पद्मजा म्हणाली, नाक म्हणजे काय काका? मी म्हटले नाक म्हणजे ल्ल२ी. आणि नाकाने कांदे सोलणे म्हणजे उगाचच शिष्टपणा करून लोकांना तत्त्वज्ञान शिकविणे.
हा अर्थ पद्मजाच्या डोक्यावरून जाणार याची मला कल्पना होती. म्हणूनच मी तिला म्हटले की आपण सोप्या अर्थापासून सुरुवात करू या. मी वर्तमानपत्र उघडले व बातम्या चाळू लागलो. त्यात बातमी होती की शेवटच्या सामन्यात पण सचिनने गोलंदाजांच्या नाकावर टिच्चून फलंदाजी करून रणजी सामना जिंकून दिला. मी पद्मजाला म्हटले की एखादी गोष्ट एखादाच्या नाकावर टिच्चून करणे म्हणजे तीव्र विरोध असतानाही ती गोष्ट तडीस नेणे.
पद्मजा म्हणाली, हे मला कळले. अजून काही अर्थ सांगा ना! मी म्हटलं की, दुसऱ्या बातमीमध्ये लिहिले आहे की भुरटय़ा चोरांनी पवई परिसरामध्ये पोलिसांच्या नाकी नऊ आणले आहेत. याचा अर्थ म्हणजे खूप त्रास देणे.
तिसऱ्या बातमीमध्ये लिहिले होते की, पकडलेल्या दहशतवाद्याला बोलतं करण्यासाठी पोलिसांनी नाक दाबून तोंड उघडण्याचे तंत्र वापरण्याचे ठरविले आहे. मी पद्मजाला म्हटले की याचा अर्थ असा की एखादी गोष्ट जर सरळ मार्गाने कळत नसेल तर दुसरा आड मार्ग वापरून ती जाणून घ्यायचा प्रयत्न करणे.
चौथ्या बातमीमध्ये लिहिले होते की, राष्ट्रवादी पक्षाने आपल्या अंतर्गत गोष्टींमध्ये प्रसारमाध्यमांनी उगाच नाक खुपसू नये असा इशारा दिला होता. मी पद्मजाला म्हटले की इथे अर्थ होईल गरज नसताना एखाद्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करणे.
पेपर वाचन संपल्यावर सौ म्हणाली की उठा सगळे आता आणि आंघोळीचे बघा. एवढय़ात पद्मजा म्हणाली की आंघोळीनंतर मी बाहेर जाणार आहे तेव्हा मी कोणता ड्रेस घालू? नूपुर तू सांगशील ना मला. नूपुर म्हणाली ताई ड्रेस तर दाखव आधी. पद्मजाने आधी एक सलवार कमीज दाखवले, नूपुरने त्याला नाक मुरडले. पद्मजाला कळले की दुसरा ड्रेस घातला पाहिजे. तिने मग एक अनारकली ड्रेस काढला. तो नूपुरला पसंत पडला. तेव्हा नूपुर म्हणाली, आता मी जे हावभाव दाखविले त्याला नाक मुरडणे असे म्हणतात, ज्याचा अर्थ आहे नापसंती दर्शविणे.
मी पण पद्मजाला म्हटले की आता मी ऑफिसला पळणार तेव्हा तुझा गृहपाठ घेऊन ठेव. नाकाला मिरच्या झोंबणे, नाकात वेसण घालणे व पाणी नाकातोंडाशी येणे.
नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मी कामाला सुरुवात केली. एवढय़ात माझी एक महिला सहकारी दुसऱ्या एका पुरुष सहकाऱ्याची तक्रार घेऊन आली. तिच्या मते तो सहकारी तिचा लैंगिक छळ करीत होता. मला जरा नवलच वाटले. कारण ज्याचे नाव ती घेत होती तो माणूस म्हणजे नाकावरची माशी पण हलणार नाही, अशा प्रकारातील होता. मी महिला सहकाऱ्याला म्हटले की मी बोलतो त्या माणसाशी. मी यथावकाश त्या पुरुष सहकाऱ्याशी बोललो. अपेक्षेप्रमाणे सर्व मामला गैरसमजातून झाला होता. मी ते प्रकरण मिटविले पण त्याच वेळी डायरीमध्ये मात्र मी पद्मजासाठी अर्थ लिहून घेतला की नाकावरची माशी न हलणारा माणूस म्हणजे सुस्त, ढिला, अस्ताव्यस्त प्रकारचा माणूस.
नेहमीच्या वेळी मी घरी परतलो. चहाबरोबर पद्मजाचे अर्थ पण ऐकावे लागणार या अपेक्षेनेच मी सोफ्यावर अंग टेकले. पद्मजा हसतमुखाने चहा व बिस्किटे घेऊन आली. चहा हातात देत असताना ती म्हणाली, काका अर्थ पण तयार आहेत पण आधी तुम्ही चहा प्या व फ्रेश व्हा.
थोडय़ा वेळाने पद्मजा म्हणाली, काका किती वेगवेगळे अर्थ होतात ना एकाच शब्दापासून. बघा ना नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा राग येणे, नाकात वेसण घालणे म्हणजे एखाद्या द्वाड माणसाला काबूत आणणे व पाणी नाकातोंडाशी येणे म्हणजे आणीबाणीची परिस्थिती निर्माण होणे व एखाद्या तातडीच्या कृतीची गरज भासणे.
मी म्हटले बरोबर आहेत तुझे सर्व अर्थ, पण याबरोबर अजूनही काही अर्थ आहेत, ते आता बघूया. पहिला वाक्प्रचार आहे, नाक ठेचणे म्हणजेच गर्वहरण करणे, दुसरा आहे नाकासमोर चालणारा म्हणजे सरळ साध्या स्वभावाचा माणूस जो कोणाच्या अध्यात- मध्यात नसतो.
एवढय़ात नूपुर म्हणाली, पद्मजाताई माझा धाकटा भाऊ आहे ना सौमित्र, त्याच्या नाकाच्या शेंडय़ावर नेहमी राग असतो. शेंडेफळ आहे ना! पद्मजा म्हणाली, हा अर्थ मला कळला. सौमित्र शीघ्रकोपी आहे ना? त्याला छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर राग येतो ना? नूपुर सौमित्राकडे बघत म्हणाली, बघ, या दीदीने पण तुला लवकर ओळखले. हे ऐकल्यावर मात्र सौमित्रचा नाकाचा शेंडा खरोखरच लाल झाला.
पद्मजाला प्राजक्ता म्हणाली, आता पद्मजा, तुला सौमित्रच्या नाकदुऱ्या काढाव्या लागणार, नाही तर तो तुझ्याशी बोलणार नाही पुढचे दोन-तीन दिवस. पद्मजा म्हणाली, मला थोडे थोडे कळते आहे काकू. तुला म्हणायचे आहे की मला त्याची लाडीगोडीने समजूत काढावी लागणार, मिनतवारी करावी लागणार बरोबर ना!
एवढय़ात रात्रीच्या दहाच्या बातम्या लागल्या. त्यात ब्रेकिंग न्यूज होती की काश्मीरमध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांना भारतीय सैनिकांनी नाक मुठीत धरून शरण यायला भाग पाडले व पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाक कापले.
पद्मजाला मी म्हटले की नाक मुठीत धरून शरण येणे म्हणजे सपशेल पराभव मान्य करून पायाशी दयेची याचना करणे. नाक कापणे म्हणजे अपशकुन करणे, नाचक्की करणे.
दुसऱ्या बातमीमध्ये नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था झालेल्या एका पुढाऱ्याला त्याच्याच पक्षाने निलंबित केले, असा मजकूर होता. मी म्हटले पद्मजा याचा अर्थ म्हणजे डोईजड झालेल्या माणसाला दूर सारणे. बातम्या संपल्या व मीही पद्मजाला म्हटले की याबरोबरच आपले नाकपुराणही आवरते घेऊया.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2014 रोजी प्रकाशित
नाकपुराण
नाक हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव. मराठी भाषेने त्याला बरेच कामाला लावले आहे. त्यामुळेच आपण नाकाने कांदे सोलतो. नाक खुपसतो. एखाद्याच्या नाकात वेसण घालतो...
First published on: 30-05-2014 at 01:21 IST
मराठीतील सर्व मराठी तितुकी फिरवावी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi language