शिल्प-मांडणीशिल्प आणि व्हिडीओ या तिन्हींमध्ये सिमॉन माध्यमांचा वापर खूप जाणीवपूर्वक करताना दिसते. तिला त्यातील आदिम ते अत्याधुनिक असा झालेला प्रवासही दाखवायचा असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समुद्रात सापडणाऱ्या शिंपल्यांसारख्या कवडय़ांचा वापर माणसाने आदिम काळापासून केला आहे. प्रामुख्याने चलन म्हणून आणि जादूटोण्याशी संबंधित अशा दोन गोष्टींसाठी त्याचा जगभर सर्वच संस्कृतींमध्ये वापर  झाला. प्रत्यक्षात याच कवडय़ा आपल्याला कलाकृती म्हणून वापरलेल्या नजरेस पडतात..  तर काही ठिकाणी नेहमीपेक्षा खूप मोठय़ा आकारातील कवडय़ा विविध रचनांमध्ये वापरलेल्या दिसतात. जवळ गेल्यानंतर लक्षात येते की, या सिरॅमिक्सच्या माध्यमातून साकारलेल्या मोठय़ा आकाराच्या कवडय़ा आहेत.. सिमॉन लेय्घचे प्रदर्शन आपण पाहात असतो.

सुरुवातीस काहीच कळत नाही. आपण त्या दृश्यरचनांमधून काही उलगडते आहे का, ते पाहण्याचा प्रयत्न करतो. कुठे अर्धवर्तुळाकार तारेची जाळी असते आणि तिला लटकवलेल्या विविधरंगी बाटल्या. तर कुठे सिरॅमिकमध्ये साकारलेल्या त्या मोठय़ा कवडय़ा विविध प्रकारांमध्ये मांडलेल्या असतात. काही ठिकाणी त्यातून मानवी ओठ दृश्यमान होतात तर काही ठिकाणी इतर विविध शारीर आकार. काही ठिकाणी हा आकार महिलांच्या जननेंद्रियाप्रमाणे दिसतो. तर तीच कवडी उलटी ठेवली की, तो मिटलेला डोळाच असल्याप्रमाणे भासतो. आकार दिसतात, समजतातदेखील. पण सारे काही पूर्णपणे उलगडले आहे, असे वाटत नाही. एके ठिकाणी अगदी नुकतेच तयार केलेले एक सुरईसारखे मातीचे भांडे दिसते. ते अद्याप पूर्णपणे सुकलेले नाही, हेही लक्षात येते. पण शिल्पकार नेमके काय सांगायचा प्रयत्न करते आहे, ते पूर्ण लक्षात येत नाही. मग आपण याच कला दालनातील िभतींवर तीन विविध ठिकाणी दिसणारे तीन व्हिडीओज पाहतो.. हे व्हिडीओज पाहिल्यानंतर लक्षात येते की, या सर्व शिल्पकृती आणि व्हिडीओ हे सारे एकत्र म्हणजे एक कलाकृती होय.. मग सारा उलगडा होतो!

सिमॉनचा जन्म शिकागो येथील असला तरी तिच्या पालकांचे मूळ गाव जमका आहे. आफ्रिकन प्रथा-परंपरांशी तिचे घनिष्ट नाते आहे. तिने कला आणि तत्त्वज्ञान या दोन विषयांमध्ये पदवी संपादन केली असून शिल्पकार-मांडणी शिल्पकार म्हणून ती प्रसिद्ध आहे. आफ्रिकन प्रथा-परंपरा असे म्हटले की, अनेकांना थेट आदिम गोष्टींची आठवण होते व ते साहजिकही आहे. पण तेच मनात ठेवून सिमॉनचे काम पाहण्याचा प्रयत्न केला तर मात्र एखाद्याचा गोंधळ उडू शकतो. कारण तिच्या डिजिटल व्हिडीओमध्ये आपल्याला ‘स्टारट्रेक’सारख्या गाजलेल्या दूरचित्रवाणी मालिकेतील लेफ्टनंट उहुरासारखी पात्रेही दिसतात. काही पात्र आफ्रिकन आदिमतेशी नाळ जुळलेली तर काही अत्याधुनिक असे हे मिश्रण दिसते. थोडा विचार केल्यावर मात्र लक्षात येते की, या सर्वच कलाकृतींमध्ये महिलांशी संबंधित असा एक समान दुवा आहे. या एका महिलेने साकारलेल्या महिलांचे जीवन, व्यथा-वेदना आणि सर्वच पातळीवरील संवेदनांचे असे हे चित्रण आहे. या चित्रणामध्ये शारीर भाग अधिक तीव्रतेने येतो. त्याचे कारण स्पष्ट करताना सिमॉन म्हणते, ‘‘त्या संवेदना, व्यथा-वेदना हे सारे तिच्या शरीरावर कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने प्रतिबििबत होत असते. व्यथा-वेदना मानसिक असल्या तरी त्याचे परिणाम तिच्या शरीरावर कोणत्या ना
कोणत्या प्रकारे भाव-भावना किंवा अभावाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात.’’ सिमॉन भाव-भावनांबद्दल बोलते तेव्हा ती शारीर पातळीवर असते. पण ती अभावाबद्दल बोलते तेव्हा ती तत्त्वज्ञानाच्या पातळीवर असते. हे आपल्याला कलाकृती पाहताना लक्षात घ्यावे लागते. मग त्या तत्त्वज्ञानाच्या नव्या मुद्दय़ाने त्या सर्वच कलाकृतींना एक वेगळा आयाम दिलेला दिसतो.

सिमॉन शिल्प-मांडणीशिल्प आणि व्हिडीओ या तिन्हींमध्ये माध्यमांचा वापर खूप जाणीवपूर्वक करताना दिसते. तिला त्यातील आदिम ते अत्याधुनिक असा झालेला प्रवासही दाखवायचा असतो. कवडय़ांचा वापर तर तिने अतिशय खुबीने केलेला दिसतो. कवडी एकच, आकारही प्रत्येकाचा सारखाच. पण तिच्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या रचनेतून कधी ती मिटलेल्या डोळ्यांप्रमाणे, महिलांच्या जननेंद्रियांप्रमाणे तर कधी ओठांप्रमाणे दिसते. इथे महिलांचे चित्रण कलाकृतीत प्रतीकात्मक पद्धतीने येते.  एका महिलेची दिसणारी उघडी पाठ, तिच्या हालचालीवरून लक्षात येणारा तिचा श्वासोच्छ्वास, त्या श्वासाच्या हालचालीवरून लक्षात येणारा, जाणवणारा तिच्यातील तणाव आणि डोके मात्र खडीच्या ढिगाऱ्यात खुपसलेले हा व्हिडीओ अतिशय परिणामकारक आहे. एखादी गोष्ट फारच किरकोळ आहे, असे सांगण्यासाठी आपण खरे तर ‘कवडीमोल’ असा शब्दप्रयोग करतो. पण बुद्धिकौशल्याने केलेल्या जाणीवपूर्वक वापरातून सिमॉन या कवडय़ांना एक वेगळेच मोल प्राप्त करून देते.

समकालीन कलावंतांमध्ये ‘अमुक एक दाखविण्यासाठी, मी असे करतोय’ असे कुणीच सांगत नाही. ते रसिकालाच बुद्धिकौशल्याने समजावून घ्यावे लागते. म्हणूनच समकालीनत्व समजावून घेताना रसिकाचेही उन्नयनच होत असते.
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com, twitter – @vinayakparab

मराठीतील सर्व समकालीन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art use of shells