डॉ. आसावरी बापट – response.lokprabha@expressindia.com
पहिल्या पावसाची ओढ शेतकऱ्यांपासून ते सामान्यांपर्यंत साऱ्यांनाच लागलेली असते, पण या जलवर्षांवाची ओढ तप्त पृथ्वीला विशेषकरून लागलेली असते. आकाशातून पहिला जलवर्षांव सुरू होतो आणि चराचराला वेड लावण्याऱ्या सुगंधाने पृथ्वी सुगंधित होते. आठ महिन्यांचा विरह संपतो आणि मग सर्जनाचा सोहळा सुरू होतो.
या सोहळ्यामागचं कोडं माणसाला प्राचीन काळापासून पडलं आहे आणि त्याने ते सोडवण्याचा प्रयत्न अनादी काळापासून केला आहे. अश्मयुगात इतर कोणतीही प्रगती झाली नसताना, कोणतेही शोध लागले नसताना स्त्री आणि पुरुष यांच्या मीलनातून प्रजा उत्पन्न होते हे दैनंदिन जीवनातलं सत्य तो अनुभवत होता. पशु-पक्ष्यांमध्ये सुद्धा नर-मादी एकत्र आल्याशिवाय सर्जन नाही हे त्याला जाणवलं होतं. मग या विश्वाच्या निर्मितीसाठी कोणत्या दोन भिन्न िलगी व्यक्ती एकत्र आल्या असतील याचा विचार त्याने सुरू केला.
या वैश्विक युगुलाची मोहिनी भारतीय समाजमनाला इतकी पडली की तो काव्याचा विषय ठरला. जगातलं सर्वात प्राचीन काव्य असलेल्या ऋग्वेदात या विश्वनिर्मितीची प्रेरणा असलेल्या वैश्विक युगुलाची, त्यांच्या मीलनाची आणि त्यातून निर्माण झालेल्या विश्वाची काव्यानुभुती ‘द्यावा-पृथ्वी’च्या रूपात प्रकट झाली. ‘द्यावा’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘आकाश’. पुल्लिंगी द्यावा आणि स्त्रीलिंगी पृथ्वी यांचं मीलन हे वैश्विक मीलन मानलं गेलं. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमी युगुलाप्रमाणे वेदात ते नेहमी एकत्र येतात. त्यांच्या या साहचर्यामुळे आणि प्रसवशक्तीमुळे त्यांचा उल्लेख द्यावापृथ्वीव्यौ, रोदसौ, द्यावाभूमी, अशा द्वंद्वात्मक नामांतूनच केला जातो. ऋग्वेदातील श्रीसूक्तात जलवर्षांवाने समृद्ध होणाऱ्या पृथ्वीची स्तुती आहे. तिचं वर्णन करताना वैदिक कवी म्हणतात, ‘सुजन्मनी धिषणे अन्तरीयते’ या दोघांनी उत्तम सृष्टी निर्माण केली. पण केवळ जन्म देऊन मात्यापित्याचं कर्तव्य संपत नाही. आपल्या अपत्याचं भरण-पोषणंही करायला हवं. द्यावा-पृथ्वी विश्वाचे प्रेमळ माता-पिता असल्याने, ‘पिता माता च भुवनानि रक्षत। पिता यत्सीमभि रूपरवासयत्।’ ते आपल्या अपत्यांचं रक्षण करतात. तो प्रेमळ पिता आपल्या अपत्यांवर उत्तम वस्त्र घालतो. आपल्या आई-वडिलांच्या आपल्यावरच्या प्रेमाची निश्चिती असल्यानेच वैदिक कवी त्यांना अन्न, संपत्ती, सामथ्र्य आणि सुकीर्तीचा वर्षांव करण्याची विनंती करतात.
पृथ्वी, लक्ष्मी, कमळ यांच्यात अद्वैत आहे. श्रीसूक्त ही लक्ष्मीची अर्थात पृथ्वीची स्तुती आहे. ऋग्वेदातील श्रीसूक्तात हिरण्यवर्णा लक्ष्मी म्हणजेच सुजलाम् सुफलाम् पृथ्वीची स्तुती आहे. कवी तिचं परस्परविरोधी वर्णन करताना दिसतात. ही पृथ्वी वैभवशाली आहे. सुवर्णालंकारांनी सजलेली आहे. अलंकारांनी युक्त वर्णन व्यक्तिरूपात पाहिलेल्या लक्ष्मीचं आहे पण त्याच वेळी तिचं वर्णन करताना ऋषी म्हणतात, ‘गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम्। ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोप व्हये श्रियम्॥’ जिचे प्रवेशद्वार सुगंधित असले तरी प्रवेश करण्यास कठीण आहे, अशा त्या लक्ष्मीदेवीचं मी आवाहन करतो. हे वर्णन अर्थातच उन्हाळ्यात तापून कठीण झालेल्या पृथ्वीचं आहे. वर्षां ऋतूपूर्वी तप्त झालेल्या कोरडय़ा पृथ्वीत प्रवेश करणं नक्कीच कठीण असतं. पण तीच भूमी जलवर्षांवाने सुगंधित आणि गोमययुक्त झाली की पिकलेल्या पिकांनी भरलेली पृथ्वी आता अलंकृत लक्ष्मीच्या रूपात प्रकट होते. सुगंधित होते. पुढल्या कडव्यांमध्ये कवी या वैभवशाली लक्ष्मीच्या ‘चिक्लित’ आणि ‘कर्दम’ या दोन्ही पुत्रांनाही आपल्या घरात येण्याचं आवाहन करतो आहे. पाऊस पडला आहे, भूमीचं काठिण्य संपलं आहे, गोमयानी युक्त अशा त्या भूमीवर चिक्लित आणि कर्दम थोडक्यात चिखल माजलाय आणि इथंच प्रसवाला आरंभ झालाय.
पर्जन्याच्या रूपाने आकाशातून प्राप्त झालेल्या रेतसाने अंगोअंगी सुखावलेली ही भूमी आता गर्भ भारली झाली आहे. या गर्भभारलेपणासाठी चिक्लित आणि कर्दम ह्य पुत्रांचं असणं खूप महत्त्वाचं आहे. कृषिप्रधान देशात त्यांना मानाचं स्थान मिळाल्याशिवाय कसं राहील? द्यावा-पृथ्वीतील हा द्यौ कधी कधी शक्तिशाली वृषभाचं रूप घेतो तर पृथ्वी समर्थ अशा गाईच्या रूपात प्रकट होते. वृषभ शब्दात संस्कृतमधील ‘वृष’ धातू म्हणजे क्रियापद आहे. ज्याचा अर्थ सिंचन करणे असा आहे. या वृषभाचं कौतुक सांगताना सायणाचार्य म्हणतात, ‘कामानां वर्षतिार।’ सर्व कामनांची वृष्टी करणारा. शेतीप्रधान देशात पाऊस भरपूर पडला की सगळ्या कामनांची पूर्ती होणारच! लज्जागौरी या पुस्तकात रा. चिं. ढेरे यांनी या कामनांची पूर्ती करणाऱ्या वृषभाचा आधुनिक संदर्भ अत्यंत सुंदर पद्धतीने दाखवला आहे. विवाह सोहळ्यातलं बािशग हे वेदकालीन वृषभाचं प्रतीक आहे. त्यांच्या मते शक्तिशाली, वीर्याचं सिंचन करणाऱ्या वृषभाची डौलदार िशगं लग्नात बािशग होऊन आली.
केवळ भौतिक पातळीवरच नव्हे तर तत्त्वज्ञानालासुद्धा या वैश्विक युगुलापासून दूर राहता आलेलं नाही. तिथे या मिथुनाने सरळ पुरुष आणि प्रकृतीचं रूप घेतलं. आकाशात काळे मेघ दाटले की विरहार्त, विरह तप्त पृथ्वी शहारते. आकाशाने जलरूप रेतसाचं सिंचन केल्यावर मग ही तृप्त धरा आपला प्रसवगुण व्यक्त करते, अंकुरीत होऊन उठते. काही दिवसांपूर्वी राखुंडलेली पृथ्वी हिरवीकंच होते. नववधूच हिरवं वस्त्र हे त्या सर्जनाचं प्रतीक आहे. संस्कृत साहित्यात कधी कधी मेघ आणि पृथ्वी किंवा मेघ आणि नदीचं मिथुन वर्णन केलं जातं. गजांतलक्ष्मीच्या प्रतीकात कमळात बसलेल्या लक्ष्मीवर आपल्या सोंडेने जलवर्षांव करणारे हत्ती दाखवले जातात. कृष्ण मेघ आणि कृष्णवर्ण हत्ती हे पुन्हा प्रतीकात्मकच आहेत. कालिदासाच्या मेघदूतातला संदेशवाहक मेघ त्या यक्षाला गजरूपातच दिसला होता.
या द्यावापृथ्वीचं आकर्षण केवळ संस्कृत साहित्यातच दिसतं असं नाही तर इतर भारतीय भाषांमध्येसुद्धा या युगुलाचं वर्णन येतं. कन्नड साहित्यकार वि. के. गोकाक यांच्या केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवितासंग्रहाचं नावच मुळी ‘द्यावापृथ्वी’ आहे. या वैश्विक युगुलाच्या मिलनाचं आकर्षण िहदी चित्रपटसृष्टीलाही आहे. मधुमती चित्रपटातील ‘सुहाना सफर और ये मौसम हसीं’ या गाण्यात कवी शैलेंद्र म्हणतात, ‘ये आसमाँ झुक रहा है जमीं पर, ये मिलन हमने देखा यहीं पर.’ महाराष्ट्रातील आधुनिक वाल्मीकी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग. दि. माडगूळकरांच्या रामायणात राम-सीता विवाहाचं वर्णन करताना ते त्यांना वैश्विक युगुलाचीच उपमा देतात, ‘आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे!’ कुसुमाग्रजांनाही या वैश्विक युगुलाची पडलेली मोहिनी त्यांच्या पृथ्वीच्या प्रेमगीतातून दिसते. मात्र तिथे दयौची जागा द्यौस्थ सूर्याने घेतली आहे. ही पृथ्वी त्या आकाशस्थ तेजस्वी सूर्याची युगानुयुगं प्रेमयाचना करताना दिसते.
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतीची याचना
कुसुमाग्रजांचं हे वैश्विक प्रेम केवळ ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या एकाच कवितेपुरतं मर्यादित राहिलेलं दिसत नाही. त्यांच्या ‘मातीचे गायन’ या कवितेत ही विरहार्त पृथ्वी त्या आकाशाला विनवणी करताना म्हणते,
माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुितनी
जरा कानोसा देऊन, कधी ऐकशील का रे
माझी धुळीतील चित्रे, तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खोलून, कधी पाहशील का रे
माझ्या जहाजाचे पंख, मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा, कधी लावशील का रे
माझा रांगडा अंधार, मेघा मेघांत साचला
तुझ्या उषेच्या ओठांनी, कधी टिपशील का रे
ना. धों. महानोरांसारखा निसर्गकवी सहज म्हणून जातो, ‘या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतूनी चतन्य गावे’. अशा या वैश्विक युगुलाच्या मीलनाचा सोहळा मला कसा वाटतो तो सांगूनच माझ्या लेखनाला विराम देणार आहे,
हे नभाचे ओथंबणे
ही धरेची आसुसता
विश्व प्रेमी मिलनाचा
आज होतसे सोहळा
सजल रेत िशपतो
अनंत नभ भारला
सक्षम तो गर्भ माझा
दान ऐसे पेलण्याला
नभ धरेला भेटता
चराचर तो भारला
मृद्गंध तो सांगताहे
मिलनाचा सोहळा।