शॉपिंग स्पेशल

दिवाळीच्या निमित्ताने चांगला सेलफोन घ्यायचाय, पण नेमकं काय घ्यायचं याबाबत गोंधळात आहात? अजिबात काळजी करू नका. बाजारात काय उपलब्ध आहे आणि आपल्याला काय हवंय हे नीट समजून घेतलंत की मोबाइलचं जग तुमच्या मुठीत येईल..
भारतात असो वा विदेशात सण, उत्सव म्हटले की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते ती म्हणजे खरेदी, विविध रंगाढंगांच्या वस्तूंनी नटलेला बाजार, आणि भारतासारख्या बहुरंगी देशात तर खरेदीचा उत्सव हा विशेष ठरतो. आत्ताच्या स्मार्ट जगात, स्मार्ट फोनची खरेदी हा स्वतंत्र असा विषय आहे. सध्या येणाऱ्या दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्यापैकी अनेक जणांनी आपल्या जुन्या फोन्सना श्रद्धायुक्त अंत:करणाने श्रद्धांजली अर्पण करून नवीन फोन घेण्याचे मनसुबे आखले असतील. बऱ्याचदा दुकानात फोन खरेदी करायला गेल्यावर पुढील काही गोष्टी निश्चितच घडतात. आपल्या चार सहा महिन्यांची अगर गेल्या वर्षभराची कमाई एकवटून आपण थोडंसं  मार्केट रिसर्च करून, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला आपण नवीन फोन घेणार असल्याची माहिती देऊन त्याचे मोबाइलसंदर्भातले अनुभव आणि सूचना ऐकून, इंटरनेटवर बघून, नातेवाईकांना विचारून एखादे मॉडेल किंवा कंपनी मनाशी पक्के ठरवून दुकानात खरेदीसाठी जातो.. कितीही पक्के ठरवले असले तरी दुकानात गेल्यावर काही वेळेस आपण ठरवलेला मोबाइल नुकताच बंद झालेला असतो, नाहीतर आउटडेटेड झालेला असतो. ‘‘ये एकदम लेटेस्ट पीस है. मेरे पास आया एक हफ्ते में मैने १५-२० पीस बेचे है,’’  असं म्हणून दुकानदार आपल्याला वेगळेच नवनवीन मोबाइल दाखवू लागतो, तेव्हा अनेकांचा गेल्या महिनाभर केलेला मार्केट रिसर्च कोलमडतो आणि ‘दुकानदारस्य वाक्यं प्रमाणम्’ मानत आपण वेगळाच मोबाइल घरी घेऊन येतो. ही परिस्थिती येत्या दिवाळी- दसऱ्याच्या मुहूर्तावर मोबाइल खरेदी करणाऱ्यांना टाळता यावी, आपल्या पैशाचा योग्य मोबदला आपणास मिळावा, आणि स्मार्ट फोन घेताना आपला स्मार्टनेस न कोलमडावा यासाठी स्मार्ट फोन कसा व कोणत्या निकषांवर घ्यावा आणि सध्या बाजारात असणाऱ्या काही चांगल्या स्मार्ट फोन्सबद्दल..
कसा निवडावा उत्तम स्मार्ट फोन..?
एकदा का तुमचे निश्चित झाले की आपल्याला स्मार्ट फोनची गरज आहे, मग आपल्याला ठरवायचे आहे की मी माझ्या फोनचाच सर्वाधिक वापर कशासाठी करणार आहे? म्हणजेच मला त्यावर कोणती कामे करावयाची आहेत? बऱ्याच लोकांना फोनचाच उपयोग हा ऑफिस कामांसाठी म्हणजेच, ऑफिससंदर्भातील कागदपत्रे वाचण्यासाठी, त्या संदर्भात आपले ई-मेल अकाउंट्स सतत पाहण्यासाठीच मोबाइलची आवश्यकता असते, अशा लोकांना ब्लॅकबेरी ओएस असणारे फोन्स सुविधेचे ठरू शकतात तर काहींना फक्त मनोरंजनासाठी म्हणजेच गाणी ऐकणे, चांगले गेम्स खेळणे, व्हिडीओ बघणे अशा कामांसाठीच स्मार्ट फोन खरेदी करावयाचा असतो. अशा वेळी, स्मार्ट फोनचा प्रोसेसर, त्याची रिझोल्यूशन, त्याच्या डिस्प्लेचा प्रकार या बाबी जास्त महत्त्वाच्या ठरू शकतात. एकदा का आपल्याला कोणत्या बाबींसाठी फोन आवश्यक आहे हे ठरले की योग्य स्मार्ट फोन निवडण्यासठी योग्य दिशा मिळू शकते, बाजारात या अशा विविध गोष्टींची पूर्तता एकाच वेळी करू शकणारे स्मार्ट फोन्सही उपलब्ध आहेत.

साधारणत: ५ ते १० हजार रुपये…
सॅमसंग-  १. गॅलेक्सी ट्रेंड- १ गिगा हर्ट्झ प्रोसेसर, ४.० जेली बिन अ‍ॅन्ड्रॉइड व्हर्जन, ४ इंच व्ही. डब्लू. जी ए. डिस्प्ले, ३ मेगा पिक्सेल कॅमेरा डय़ुअल सिमकार्ड ही काही या फोनची वैशिष्टय़े आहेत.
२. गॅलेक्सी स्टार प्रो- १ गिगा हर्ट्झ प्रोसेसर, ४.१ जेली बिन अ‍ॅन्ड्रॉइड व्हर्जन, ४ इंच टी एफ टी डिस्प्ले, २ मेगा पिक्सेल कॅमेरा ही काही या फोनची वैशिष्टय़े आहेत.
एच टी सी.- डिझायर सी- ६००मेगा हर्ट्झ प्रोसेसर, ४.० जेलीबिन अ‍ॅन्ड्रॉइड व्हर्जन, ३.५ इंच व्ही.डब्लू. जी ए. डिस्प्ले, ५ मेगा पिक्सेल कॅमेरा  ही काही या फोनची वैशिष्टय़े आहेत.
सोनी- एक्सपीरिया इ – १. १ गिगा हर्ट्झ प्रोसेसर, ४.१ जेली बिन अ‍ॅन्ड्रॉइड व्हर्जन, ३.५ इंच टी एफ टी डिस्प्ले, ३.२ मेगा पिक्सेल कॅमेरा, उत्तम व्हॉइस क्वालिटी ही काही या फोनची वैशिष्टय़े आहेत.
नोकिया-  ल्यूमिया ५१० – ८०० मेगा हर्ट्झ प्रोसेसर, ७.८ विंडोज व्हर्जन, ४ इंच टी एफ टी डिस्प्ले, ५ मेगा पिक्सेल कॅमेरा ही काही या फोनची वैशिष्टय़े आहेत.
मायक्रोमॅक्स-  ए १११ कॅनव्हास डूडल- क्वालकॉम प्रोसेसर, ५.३ इंच डिस्प्ले, डय़ुअल कॅमेरा बॅक कॅमेरा-८ मेगा पिक्सेल, फ्रंट कॅमेरा २ मेगा पिक्सेल, ५१२ एम बी रॅम, ४.१.२ अ‍ॅन्ड्रॉइड जेली बिन व्हर्जन.
इतर- एल जी एल-३, एल जी ई  ही काही मॉडेल्स या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. या साऱ्यांपैकी मायक्रोमॅक्स डूडलचे कॉन्फिगरेशन सर्वोत्तम वाटते. असे असले तरी मायक्रोमॅक्स कंपनीचे फोन्स हे बऱ्याचदा नाजूक असतात. चुकीच्या पद्धतीने हाताळले गेल्यास त्यात बिघाड होऊ शकतो. तेच एलजीच्या फोन्ससाठीही लागू होते. ही काही मॉडेल्स असली तरी या रेंजमध्ये अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत. वर दिलेल्या निकषांनुसार आपणांसाठी योग्य स्मार्ट फोन निवडता येऊ शकतो. शिवाय जर नोकिया कंपनीने ल्यूमिया-५०२ हा फोन बाजारात आणला तर तो विंडोज फोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी या रेंजमधील उत्तम पर्याय ठरू शकतो.

बजेट – एकदा का हे सारं ठरवलं गेलं की सर्वात मुख्य मुद्दय़ावर विचार करणं गरजेचं आहे, तो म्हणजे आपलं बजेट. जसजसं आपलं बजेट कमी कमी होत जातं तसतसं आपल्याला हव्या असलेल्या फीचर्ससह उपलब्ध असणाऱ्या फोन्सचे पर्याय कमी कमी होऊ लागतात. त्यामुळे आपले बजेट अगदीच कमी असेल, स्मार्ट फोन घेणं शक्य नसेल तर सॅमसंग कंपनीने स्मार्ट फीचर फोन्स बाजारात आणले आहेत, तसेच नोकियाने आणलेल्या आशा सीरिजचे फोन्सही उत्तम पर्याय ठरू शकतात तसे सध्या बाजारात अगदी ५ हजारापासून ते, ५०-६० हजारापर्यंत स्मार्ट फोन्स उपलब्ध आहेत, त्यामुळे आपल्या बजेटनुसार आपल्याला खरेदी करता येते.

साधारणत: १० ते १५ हजार रुपये…
सॅमसंग- गॅलेक्सी क्वाट्रो- १.२ गिगा हर्ट्झ प्रोसेसर, ४.१ जेली बीन अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जन,४.७ इंच व्ही. डब्लू.जी ए. टी. एफ. टी. डिस्प्ले, ५ मेगा पिक्सेल कॅमेरा, ०.३ मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा डय़ूअल सीमकार्ड ही काही या फोनची वैशिष्टय़े आहेत. हा फोन एक उत्तम डील ठरू शकतो. या रेंजमध्ये हा सॅमसंगचा उत्तम फोन आहे. याच्या व्हिडीओ क्वालिटीबाबत थोडय़ा तक्रारी आहेत पण आपल्याला एच. डी. व्हिडीओ पाहावयाची फारशी आवश्यकता भासत नसेल तर हा फोन उत्तम आहे. १५ हजारांपलीकडे असलेला या फोनची किंमत १४ हजारांपर्यंत करण्यात आली आहे.
एच टी सी.- डीझायर एक्स- १.० गिगा हर्ट्झ प्रोसेसर, ४ इंच सुपर एल सी डी डिस्प्ले, ५ मेगा पिक्सेल कॅमेरा अ‍ॅन्ड्रॉईड आईस्क्रीम सॅन्डविच व्हर्जन परंतु जेली बीन ४.१ चे अपडेट उपलब्ध. याचा प्रोसेसर आणि रॅम पाहता हा मोबाइल गॅलेक्सी क्वाट्रोसमोर कच खातो. परंतु याच्यातील व्हिडीओ क्वालिटी उत्तम आहे. यामध्ये फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आलेला आहे.
सोनी-  एक्सपीरिया एम- गॅलेक्सी क्वाट्रोला तोडीस तोड असा या रेंजमधील सोनीचा हा स्मार्टफोन. ५ मेगा पिक्सेल् कॅमेरा, ४.२ अ‍ॅन्ड्रॉइड जेली बीन व्हर्जन, ४ इंच टीएफटी स्क्रीन, उत्तम बॅटरी लाइफ, फ्रंट व्हीजीए कॅमेरा, एच डी रेकॉर्डिग, डय़ूअल सीम ही या फोनची काही वैशिष्टय़े. हा फोन गॅलेक्सी क्वाट्रोपेक्षा बऱ्याच बाबींमध्ये उत्तम ठरत असला तरी स्क्रीन साइझ आणि फ्रंट व्हीजीए कॅमेरामुळे थोडासा मागे पडतो परंतु गॅलेक्सी क्वाट्रोसाठी कमी पैशातला हा उत्तम ऑप्शन ठरू शकतो, यात शंका नाही.  
मायक्रोमॅक्स-  कॅनव्हास-ए ११६ एच डी – या फोनने गेल्या काही महिन्यांत प्रचंड ग्राहकांना आकर्षित केले आहे. १ गिगा हर्ट्झ प्रोसेसर, १ जीबी रॅम, ५ इंच संपूर्ण एच डी डिस्प्ले, ८ मेगापिक्सेल कॅमेरा ऑटोफोकस, २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा ४.१ जेली बीन अ‍ॅन्ड्रॉइड व्हर्जन, डय़ूअल सीम, एच डी व्हिडीओ रेकॉर्डिग या साऱ्या बाबी या किमतीतील इतर फोन्सपेक्षा या फोनला निश्चितच खूप वर घेऊन जातात परंतु याची किंमत १६ हजारांपर्यंत असून बॅटरीलाइफबद्दल जरा प्रश्न ऐकिवात आहेत. अन्यथा या किमतीत मायक्रोमॅक्सचा हा फोन सर्वापेक्षा स्मार्ट ठरतो.   
नोकिया-  विंडोज ओएसमध्ये नोकियाचा ल्यूमीया ६२० हा ऑप्शन उपलब्ध आहे. विंडोज ८ प्लॅटफॉर्मवर आधारित, ३.८ इंच मल्टीपॉइन्ट टच स्क्रीन असणारा हा फोन कॅमेरा क्वालिटीसाठी उत्तम ठरू शकतो. ५ मेगापिक्सेल्स एल ई डी कॅमेरा विथ एच डी व्हिडीओ रेकॉर्डिग. नोकियाची स्वत:ची  नेव्हिगेशन सिस्टीम ही या फोनची विशेष वैशिष्टय़े आहेत.
या रेंजमध्ये इतर कंपन्यांचेही अनेक फोन्स बाजारात उपलब्ध आहेत. उदा कार्बन, झोलोचा क्यू ७०० आय, एल जीचे एल-९ आणि एल-७, यापैकी एल ९ची किंमत जास्त असली तरी येत्या काही दिवसांत ती कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आणि ब्लॅकबेरी ओएस मध्ये ब्लॅकबेरी कव्‍‌र्ह ९३२० आणि ९३३० हे फोन ब्लॅकबेरीच्या उत्तम फोन्सपैकी आहेत.

ब्रॅण्ड- अनेकदा लोक आधीपासूनच मोबाइलचा बॅ्रण्ड निश्चित करतात. अशांसाठी फारच कमी पर्याय उपलब्ध असतात. परंतु अन्यथा आपल्या बजेटनुसार अ‍ॅपल, सॅमसंग, सोनी, मायक्रोमॅक्स, ब्लॅकबेरी, यांसारख्या प्रथितयश कंपन्यांना सर्वप्रथम प्राधान्य द्यावे, कारण त्यामुळे आपल्याला चांगल्यात चांगल्या गॅजेटची खात्री मिळते, तसेच आपल्याला काही अडचण आल्यास अशा कंपन्यांचे सव्‍‌र्हिस सेंटरही जवळच उपलब्ध असतात. सव्‍‌र्हिस सेंटरची उपलब्धता, त्यांच्या मोबाइलच्या किमतींची साधारण रेंज, फोन्सवर मिळणारी वॉरंटी या साऱ्या निकषांवर मोबाइलसाठीच्या बॅ्रण्ड्सची निवड करता येऊ शकते.
आकार- बऱ्याचदा या बाबीकडे लोक दुर्लक्ष करतात परंतु माझ्या मते ही सर्वात महत्त्वाची बाब आहे, कारण आपला स्मार्ट फोन हा सहज हाताळण्याजोगा आणि वापरायला सहजसोपा असणं सर्वाधिक गरजेच आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेले टॅब्लेट्स हे ३ इंच स्क्रीनपासून ते ७ इंच टच स्क्रीन असलेले आहेत, साधारणत: आपल्या हातात सहज मावू शकेल व आपण प्रवासात असताना हाताळणे सोयीस्कर होईल अशाच स्मार्ट फोनची निवड करावी, परंतु वर सांगितल्याप्रमाणे काहींना फक्त व्हिडीओ पाहण्यासाठी स्मार्ट फोन आवश्यक वाटत असेल तर त्यानुसार निवड बदलता येते. परंतु जेवढा जास्त मोठय़ा स्क्रीनचा स्मार्ट फोन तेवढा तो कमी पोर्टेबल, जेवढा मोठा डिस्प्ले तेवढीच जास्त बॅटरी तो फोन खाणार. बऱ्याचदा ४ बाय ६ इंचाचे फोन योग्य ठरू शकतात. स्क्रीन किती मोठी व त्यावरील अ‍ॅस्पेक्ट रेशो किती असावा याला काही ठरावीक माप नाही. प्रत्येकाने आपली गरज ओळखून त्यानुसार योग्य निवड करावी.
ऑपरेटिंग सिस्टिम- त्यानंतरचा मुख्य मुद्दा म्हणजे टॅब्लेट चालविण्यासाठी लागणारी ऑपरेटिंग सिस्टिम (ओ. एस.) म्हणजेच प्लॅटफॉर्म. यासाठी मात्र बाजारात काही मोजके पर्याय उपलब्ध आहेत, उदा. अ‍ॅन्ड्रॉइड, ब्लॅकबेरी, मायक्रोसॉफ्ट विंडोज, अ‍ॅपल आयओएस, इ. सध्या स्मार्ट फोन्स निवडताना हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. कारण बऱ्याच कंपन्या या ठरावीक ऑपरेटिंग सिस्टिीममधील स्मार्ट फोन्सच बाजारात आणतात, उदा. नोकिया कंपनीचे बहुतांशी अगर सगळेच स्मार्ट फोन्स हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर आहेत. सोनी, एचटीसी, सॅमसंग यांचे बहुतांशी मोबाइल हे अ‍ॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम बेस आहेत. ब्लॅकबेरी व अ‍ॅपल स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टिम वापरतात. आपली गरज बजेट व त्यानुसार उपलब्ध पर्यायांमध्ये ऑपरेटिंग सिस्टिमचे व्हर्जन यांवरून कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमचा फोन घ्यावा हे ठरविता येऊ शकते. अ‍ॅन्ड्रॉइडमध्ये ४.१, ४.२ जेली बिन या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिम आहेत. विंडोज फोन्समध्ये विंडोज ८ प्लॅटफॉर्मला सध्या नवीन मानले जाऊ शकते. ब्लॅकबेरी-९-१० नवीन आहे.  

१५ ते २० हजार रुपये-
सॅमसंग-  गॅलेक्सी ग्रँड- सॅमसंगचे या रेंजमधील उत्तम मॉडेल, ५ इंच स्क्रीन, १ जीबी रॅम, ४.१.२ अ‍ॅन्ड्रॉईड जेली बीन, ४८०*८०० पिक्सेलचे रिझोल्यूसन, ८ मेगा पिक्सेलचा एच डी रेअर फेसिंग कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल एच डी फ्रंट फेसिंग कॅमेरा असणारा हा मोबाइल साधारणत: १७ हजारांपर्यंत दिवाळीच्या आसपास बाजारात उपलब्ध होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे, इतर बाबतीत उत्तम असणारा हा मोबइल स्क्रीन रेझोल्युशनच्या बाबतीत त्याच्या स्पर्धक मोबाइल्सशी मार खातो. सध्या बाजारात या रेंजमध्ये अधिक मागणी याच फोनसाठी केली जात आहे.
एच टी सी- डिझायर ५००-  उगीच जास्तीची किंमत या मोबइलचा तोटा आहे ४.३ इंच स्क्रीन, १ जीबी रॅम, १.२ गिगा हर्ट्झ प्रोसेसर ८ मेगापिक्सेल कॅमेरा, १.६ मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा ही साधारणत: गॅलेक्सी ग्रँडसारखी वैशिष्टय़े असणारा हा मोबाइल बाजारात २० हजार रुपये किमतीने विकला जात आहे. यामध्ये वेगळा असा ४.२.१ जेलीबीन, एच टी सी प्लॅटफॉर्म वापरण्यात आला आहे आणि हेच त्याचे स्वत:चे वेगळेपण आहे.
सोनी- एक्सपीरिया सी- ५ इंच एच डी डिस्प्ले या फोनला वरील सर्व फोनपेक्षा सरस ठरवितो शिवाय यात इतर फोन्सप्रमाणे ४.२.१ जेली बीन अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जन, १ जीबी रॅम, आणि १.२ गिगा हर्ट्झ क्षमतेचा प्रोसेसर या मोबाइलची वैशिष्टय़े दुणावतो. ८ मेगापिक्सेल क्षमता असणारा कॅमेरा उत्तम फोटो आणि व्हिडीओ क्वालिटी मिळवून देण्यास समर्थ ठरतो तरी यातील एक मुख्य उणीव म्हणजे याचा फ्रंट फेसिंग कॅमेरा हा व्हीजीए कॅमेरा देण्यात आलेला आहे. या फोनची साधारण किंमत सुमारे २० हजापर्यंत असेल.
मायक्रोमॅक्स- कॅनव्हास-४ ए२१०- १२.७ सेमी इतकी मोठी संपूर्ण एच डी स्क्रीन, ४.२.१ जेली बीन अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जन, १ जीबी रॅम, १.२ गिगा हर्ट्झ क्षमतेचा प्रोसेसर, १३ मेगापिक्सेल क्षमतेचा कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल क्षमतेचा फ्रंटफेसिंग कॅमेराशिवाय पूर्णत: एच डी रिझोल्यूशन आणि बरेच इनबिल्ट अ‍ॅप्लिकेशन्स पुन्हा एकदा मायक्रोमॅक्सला वरचढ सिद्ध करतात मायक्रोमॅक्स कंपनीच्या फोन्सचा नाजूकपणामुळे हा मोबाइल इतरांपेक्षा थोडा मागे पडतो परंतु १८-१९ हजारांत कॅनव्हास-४ उत्तम डील ठरू शकते.
या रेंजमध्येही या मोबाइल्सखेरीजही काही मोबाइल्स अपलब्ध आहेत परंतु साऱ्यांचीच माहिती येथे प्रसिद्ध करणे शक्य नसल्याने काही ठरावीक कंपन्यांच्या विशेष मॉडेल्सबद्दल माहिती दिली आहे. वरील निकषांवरून आपल्याला इतर मोबाइलचीही चाचणी करता येऊ शकते. या रेंजमध्ये सॅमसंगने प्रिव्हील-२ बाजारात आणला तर तो या साऱ्यांपेक्षा सर्वच बाबतीत वरचढ ठरू शकेल. ब्लॅक बेरीतर्फे ब्लॅक बेरी बोल्ड, ब्लॅकबेरी ९७९० हे उत्तम फोन ठरू शकतात. शिवाय नोकियाचा ल्यूमिया ७२० आणि ६२५ हे विंडोज -८ वर चालणारे विंडोज फोन या रेंजमध्ये येतात परंतु हे फोनही रेझोल्युशनच्या बाबतीत अ‍ॅन्ड्रॉईड फोन्ससमोर कमी पडताना दिसतात.

फीचर्स- तुम्हाला तुमच्या मोबाइलमध्ये कोणकोणते फीचर्स हवे आहेत ही गोष्ट तर फक्त तुमच्यावर व तुमच्या बजेटवर अवलंबून असते. त्यातही मुख्यत: लागणाऱ्या फीचर्सची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे-
प्रोसेसर- कोणत्याही डिव्हाइसला चांगले अथवा वाईट ठरविणारा महत्त्वाचा फीचर म्हणजे त्याच्या प्रोसेसरची क्षमता तुमच्या डिव्हाइसच्या प्रोसेसरच्या क्षमतेच्या जितकी अधिक तेवढा तुमचा डिव्हाइस जलद काम करू शकतो. त्यामुळे कधीही चांगल्यात चांगल्या क्वालिटीचा प्रोसेसर घेणे लाभदायक ठरते. १ गिगा हर्ट्झ प्रोसेसरपासून पुढील स्मार्ट फोन्स असल्यास उत्तम. त्यापेक्षा कमी क्षमतेचा प्रोसेसर बऱ्याचदा आपला फोन स्लो करू शकतो.
कॅमेरा- स्मार्ट फोन्सचा उपयोग हा व्हिडीओ कॉलिंगसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो, त्यामुळे त्यात फ्रंट व रेअर कॅमेरा असणं गरजेचं ठरतं. दहा हजार किमतीच्या आत असणाऱ्या फोन्सना फ्रंट कॅमेऱ्याची सुविधा नसते. तसेच एचटीसीच्याही बऱ्याच फोन्सना फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला नाही. बऱ्याचदा हा फ्रंटल कॅमेरा व्हीजीए असतो परंतु फक्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी तो पुरेसा ठरतो. रेअर कॅमेरा ३-८ मेगापिक्सेलपर्यंत उपलब्ध असतो. तो आपापल्या गरजेनुसार पुरू शकतो. त्यातही ऑटोफोकस, नाइट मोड असे स्पेसिफिकेशन्स असू शकतात.
कनेक्टिव्हिटी- अर्थातच तुमचा स्मार्ट फोन हा थ्रीजी सपोर्ट करणारा असावा. तसेच हॉटस्पॉटवरून नेट अ‍ॅक्सेस करण्यासाठी यात वायफाय सुविधा असावी. तसेच उत्तम कनेक्शन साठी ब्लुटूथचे नवीन व्हर्जन असणेही तुमच्या स्मार्ट फोनला सरस ठरवू शकते.
एखादा स्मार्ट फोन विकत घेण्यापूर्वी त्याचे रिव्ह्य़ू वाचून बघितल्यास आपल्याला सवरेतम निवड करता येऊ शकते. पण केवळ  रिव्ह्य़ू वाचून खरेदी करण्याएवजी इंटरनेटवरून फोन्ससाठीच्या तक्रारींचा शोध घ्यावा. यावरून एखाद्या मॉडेलमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो हे लक्षात येऊ शकते. अनेकदा पैसे वाचविण्यासाठी लोक ऑनलाइन खरेदी करतात, परंतु असे करण्यापूर्वी मोबाइल शोरूमला भेट देऊन आपण खरेदी करू इच्छितो तो मोबाइल हाताळून पाहावा. अशा शोरूम्समध्ये मोबाइल हाताळण्याची, त्याचे फीचर्स तपासण्याची सुविधा असते, त्यावेळी बऱ्याचदा आपल्याला नवीन मॉडेलही पाहावयास आणि हाताळण्यास मिळू शकते. त्यानंतर आपण तो मोबाइल तेथून अथवा कमी पैशात ऑनलाइन खरेदी करताना निश्चिंतपणे खरेदी करू शकता.
दिवाळीतील स्मार्ट फोन्स खरेदी..
दिवाळी आली की बऱ्याचदा सणांचे औचित्य साधून भारतीय बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. हे खरेदीचे गणित लक्षात घेऊनच अनेक मोबाइल कंपन्या आपापले नवनवीन मॉडेल्स हे दिवाळीच्या सुमारास बाजारात आणत असतात. त्यामुळे दिवाळीच्या काळात घेतलेला मोबाइल हा त्या काळासाठी लेटेस्ट मोबाइल ठरू शकतो (अर्थात कोणतीच टेक्नोलॉजी कधीच लेटेस्ट नसते).  तसेच बऱ्याचदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या किंवा दुकानदार विविध ऑफर्स जाहीर करतात त्यानुसार ग्राहकांना नक्कीच फायदा होऊ शकतो. यंदाच्या दिवाळीत स्मार्ट फोन्सच्या किमती कमी होण्याविषयी निश्चित नसले तरी नोकिया कंपनीने आपल्या ल्यूमिया सीरिजसाठी एक्स्चेंज ऑफर जाहीर केली आहे, ज्या अंतर्गत जुने मोबाइल्स देऊन नवीन ल्यूमिया सीरिज आपल्या मूळ किमतीपेक्षा कितीतरी कमी किमतीत खरेदी करता येऊ शकते. सॅमसंग कंपनीनेही नुकतेच नोट-२ आणि नोट-३ च्या किमती कमी केल्याचे समजते. तसेच या दिवाळीत ज्या दोन फोन्सवर सॅमसंगची मदार असेल ते सॅमसंग गॅलेक्सी-ग्रॅण्ड आणि सॅमसंग गॅलेक्सी क्वाट्रो या फोन्सच्याही किमती कमी करण्यात आल्या आहेत. सॅमसंगतर्फे जर प्रिव्हिल-२ हा फोन बाजारात लॉन्च झाला तर १५-२० हजार रुपये या रेंजमध्ये हा फोन सर्वाधिक भाव मारून जाताना दिसू शकतो. शिवाय अ‍ॅपलप्रेमींसाठी ५ एस आणि ५ सी देखील भारतात दिवाळीदरम्यान लॉन्च होण्याविषयी बोलले जात आहे, परंतु याबद्दल ठोस असे मत आत्ता काहीही सांगता येऊ शकत नाही. एकूणच यंदाच्या दिवाळीत स्मार्ट फोन्सची ही स्पर्धा रंगतदार ठरणार आहे. त्यात कोण बाजी मारेल हे ग्राहकच ठरवतील परंतु सध्या तरी सॅमसंग, नोकिया, सोनी, मायक्रोमॅक्स, एचटीसी या कंपन्या आपापले खिसे भरण्यासाठी सरसावलेल्या दिसत आहेत. दिवाळीपूर्वीच ठरावीक रेंजमधील फोन्सची बाजारातील उपलब्ध संख्या वाढलेली दिसत आहे.

२० हजारांपुढील स्मार्ट फोन्स –
हे हाय एन्ड स्मार्ट फोन प्रकारात मोडतात. यामध्ये साधारणत: सॅमसंगतर्फे एस-२, ३, ४ ही एस सीरिज येते तसेच सॅमसंग गॅलेक्सी नोट-२, ३ हे सर्वाधिक लोकप्रिय फोन आहेत ज्यांना सध्या बाजारात जोरदार मागणी आहे या फोन्समध्ये साधारणत: लेटेस्ट अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्जन्स वापरण्यात येतात, शिवाय या फोन्सचे स्क्रीन रेझोल्युशन, कॅमेरा क्वालिटीही इतर फोन्सपेक्षा कित्येक पटीने उत्तम असते. नुकताच आलेले सॅमसंग गॅलेक्सी मेगा हे फोन सॅमसंगप्रेमींना खुणावतील.
एच टी सीचे एचटीसी वन, एचटीसी वन मिनी, एचटीसी बटरफ्लाय, एचटीसी वन व्ही बटरफ्लाय हे विशेष फोन्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. नोकियाची प्रसिद्ध अशी नोकिया ९२० ही सीरिजदेखील हाय एन्ड स्मार्ट फोन्समध्ये मोडते. अ‍ॅपलप्रेमींचे अ‍ॅपल स्मार्ट फोन्सही हाय एन्ड प्रकारात मोडतात. साधारणत: २८ हजार ते ६० हजापर्यंत या फोन्सची किंमत आहे. अजून अ‍ॅपल  ५ एस आणि ५ सी भारतात लॉन्च झालेले नाहीत परंतु अ‍ॅपलप्रेमींमध्ये हे फोन्स बहुप्रतीक्षित फोन्स आहेत.

(लेखात फोनच्या साधारण किमती देण्यात आलेल्या आहेत, शहर व दुकानांनुसार या किमतीत बदल होऊ शकतात..)