अयोध्येइतकंच भारतीय मनाला आकर्षण असतं ते मथुरा-वृंदावनचं! तिथल्या मंदिरांचा फेरफटका…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीला यापूर्वीही दोन वेळा गेलो होतो, पण का कोण जाणे दोन्ही वेळा आग्रा-मथुरा-वृंदावन पाहायचे, राहायचे राहूनच गेले. या वर्षी फेब्रुवारीच्या सात-आठ-नऊ या तारखांना जयपूर येथील रोटरी क्लबच्या अधिवेशनाला हजर राहण्याचे निमित्त झाले अन् आम्ही आग्रा-मथुरा-वृंदावन व दिल्ली असा कार्यक्रम आखाला. जयपूरला विमानतळावर उतरल्यापासून जी बारा सीटर ए.सी. गाडी आमच्यासोबत आम्हाला विविध ठिकाणे दाखविण्यासाठी होती ते दिल्ली येथे विमानतळावर परतीच्या प्रवासाला लागेपर्यंत होतीच! आग्रा येथे एक दिवस ताजमहालच्या सान्निध्यात घालविला. तो एक वेगळाच आनंद होता. जगातील सात आश्चर्यापैकी एक इतके दिवस आपण पाहू शकलो नाही याची खंत वाटू नये इतके त्याचे सौंदर्य मनात टिपून घेत होतो. आग्रा येथील मुक्काम हलविल्यानंतर आम्ही दिल्लीकडे निघालो. मथुरा आणि वृंदावन येथे अख्खा दिवस आम्ही राहाणार होतो.
मथुरेच्या वाटेला लागल्यावर सर्वाना भगवान श्रीकृष्णाच्या विविध गोष्टी आठवायला लागल्या. भगवान श्रीकृष्णाची वेगळीच नटखट प्रतिमा सर्वाच्या मनाला भावते. म्हणून तर भगवान श्रीकृष्ण सगळय़ांना हवेहवेसे वाटतात. पण मंदिराबाबत एक अडचण होती, त्यांच्या दर्शनासाठी उघडण्याच्या वेळा वेगवेगळय़ा होत्या. मथुरा व वृंदावन या दोन्ही ठिकाणांची चांगली माहिती तेथील स्थानिक लोकांनी पुरविली. श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी मथुरा अन् वृंदावन ही दोन्ही अत्यंत महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत कारागृहात झाला होता तर त्यांचे रम्य बालपण वृंदावन गोकुळात नंदराजांच्या घरी गेले होते. मथुरा हे उत्तर प्रदेशातील एक शहर! दिल्लीपासून अवघ्या १४० कि.मी. अंतरावर! मथुरा म्हणजे ब्रजभूमीचे केंद्रस्थान म्हणावे लागेल. ब्रजभूमीमध्ये दोन प्रमुख भागांचा समावेश होतो म्हणे, पूर्वेकडील यमुनेचा भाग ज्यात गोकुळ, महाबन, बलदेव, माट अन् बजना तर पश्चिमेकडील वृंदावन, गोवर्धन, कुसुम सरोवर, बरसाना आणि नंदगांव येतात. सुप्रसिद्ध कवी सूरदास यांचे रुणाकुटादेखील येथून जवळच येते. दरवर्षी कार्तिक मासामध्ये ‘इस्कॉन’च्या वतीने ‘ब्रज मंडल परिक्रमा’ आयोजित केली जाते, या काळात भक्तगण वृंदावनातील बारा जंगलांतून जातात, अगदी अनवाणी पायाने!
हिवाळा हा मथुरेला जाण्यासाठी चांगला काळ म्हणावा लागेल. जुलै ते सप्टेंबर या काळात येथे जोरदार पाऊस पडतो. आम्ही मथुरेला पोहोचलो अन् आम्हाला मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच सिक्युरिटी गार्ड्सनी अडविले. आमच्या पिशव्या, पर्सेस, मोबाइल, कॅमेरे वगैरे सगळे काढून व्यवस्थित ठेवले. आमची आत जाऊन फोटो काढण्याची इच्छा राहून गेली.
मंदिर खूपच भव्यदिव्य होते. चांगल्याच पायऱ्या चढाव्या लागणार होत्या. मथुरेच्या मध्यभागी हे द्वारकाधीश केशवदेव मंदिर आहे. भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान म्हणजे अंधार कोठडी पाहायला मिळते. कंस- (श्रीकृष्णाचा मामा) राजाने वसुदेव-देवकीला तुरुंगात डांबून ठेवले होते. आधीच्या सात बाळांचा वध त्याने केला होताच. ते सगळं डोळय़ांसमोरून जाते. अन् नंतर वसुदेवाने महाप्रयासाने पुराने ओसंडून वाहत असलेल्या नर्मदा नदीतून नंदराजांच्या स्वाधीन भगवान श्रीकृष्णांना केले होते ते आठवते! आपण आता त्या वातावरणात गेलेलो असतो. मग मुख्य मंदिरात मूर्तीचे साग्रसंगीत दर्शन होते. आपल्याला त्याचे समाधान मिळते. पण त्याच वेळी मंदिराच्या बाजूला लागून असलेल्या जामी मशिदीकडे आपले लक्ष जाते. मथुरेच्या मंदिरात बराच वेळ घालवून तेथील सुप्रसिद्ध पेढे घेऊन आम्ही वृंदावनाकडे रवाना झालो.
वृंदावन मथुरेपासून १०-१२ कि. मी. अंतरावर आहे. तेही यमुनेच्या तीरावर! दरवर्षी जवळपास पाच लाखांहून अधिक भाविक मथुरा वृंदावनात येतात. आम्ही भारावलेलेच होतो. येथील रस्ते अतिशय अरुंद होते. आमची गाडी गावाच्या बाहेरच उभी करावी लागली. आत जाण्यासाठी दोन सीटर सायकल रिक्षा किंवा ऑटोरिक्षा उपलब्ध होत्या. आम्ही रिक्षावाल्याला वृंदावनातील सर्व प्रमुख ठिकाणांना-मंदिरांना जाण्यासाठी ठरविले. वृंदावन-परिसरात कितीतरी लहान-मोठी मंदिरे आहेत. आम्ही यमुनेच्या तीरावर गेलो. श्रीकृष्णकथांमधून ज्या कदंब वृक्षावर लपूनछपून गोपींची वस्त्रे पळवायचे, लपवायचे असं वर्णन आहे, ते कदंब वृक्ष पाहण्यात आले. तिथेच ‘कालिया मर्दना’ची आठवण राहावी म्हणून कालियाची मूर्ती असलेले एक छोटेखानी मंदिर पाहण्यात आले. आत शहरात घुसताच माकडांची संख्या पाहून आम्ही चक्रावून गेलो. आम्हाला आमचे चष्मे, टोप्या, पर्सेस, पिशव्या वगैरे त्यांच्यापासून वाचवावे लागत होते. तरीसुद्धा एका क्षणी एका माकडाने माझा चष्मा पळविलाच, चष्मा परत मिळावा म्हणून एका स्थानिकाने काही पैसे घेतले, त्या माकडाला काहीतरी खायला दिले अन् चष्मा परत मिळवून दिला, पण तो चष्मा परत औरंगाबादला आल्यावर मला बदलावाच लागला! असो. दुसरे म्हणजे तेथील प्रत्येक घराला जाळय़ाच होत्या. माकडांचा अगदी स्वैर वावर होता. पायांत घोळत होते म्हणा ना! माकडांच्या सहवासात राहणाऱ्या तेथील लोकांबद्दल खरंच नवल वाटले. अशातच गावातील महत्त्वाच्या निधीवन या मंदिरात आम्ही पोहोचलो. तसे अगदी लहान-बाहेरून लक्षात न येण्यासारखे हे मंदिर होते. पण आत शिरल्यावर त्याची भव्यता दिसत होती. त्याला होते तसेच ठेवले होते हे विशेष! गर्दीदेखील जास्ती नव्हती! निधीवन येथे अगदी दाट झाडं आहेत. या ठिकाणी म्हणे भगवान श्रीकृष्णाच्या रासक्रीडा चालायच्या. मध्ये एक सुवासिक फुलांनी शृंगारलेला बेडसुद्धा ठेवलेला आहे. रंगमहालही आहे, काही लोकांची अशी धारणा आहे की, मध्यरात्रीनंतर आजही तिथे राधा-श्रीकृष्ण अवतरतात, लोक म्हणे तेथे संगीताचे स्वर ऐकतात वगैरे! निधीवनातदेखील माणसांपेक्षा माकडांचा वावर सहजसुलभ होता. नंतर तेथील मुख्य बांकेबिहारी मंदिराला गेलो, साडेचार वाजता ते उघडणार होते. तेथे विविध मंदिरांच्या वेगवेगळय़ा वेळा आहेत, त्याच काळात त्यांना भेटी द्याव्या लागतात. तेथे भक्तांची गर्दी खूप होती. मंदिराला जाण्याचा मार्ग लहान-अरुंद रस्त्यांतूनच होता. इ.स. १८६४ मध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. येथील श्रीकृष्णाच्या मूर्तीचा शोध साधू स्वामी हरिदास यांना लागला असे सांगितले जाते. स्वामी हरिदास त्यांच्या भजनासाठी चांगले प्रसिद्ध आहेत.
याशिवाय वृंदावनात अनेक लहान-मोठी मंदिरं आहेत, त्यांत राधा-रमणा मंदिर हे एक! राधा दामोदर मंदिर हे असेच आणखी एक मंदिर आहे, तेथील मुख्य मूर्ती रूपा गोस्वामी यांनी आपल्या हाताने करून जीवा गोस्वामी यांना भेट म्हणून दिली होती म्हणतात. येथील राधावल्लभ मंदिर या अन्य एका मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत राधाचे अस्तित्व दर्शविण्यासाठी एक मुकुट सोबत ठेवलेला आहे. राधा-श्मामसुंदर मंदिर सकाळी साडेआठ ते अकरा व सायंकाळी पाच ते आठपर्यंत उघडते. वृंदावनात श्रीगोपेश्वर महादेव मंदिर आहे. नव्याने झालेल्या काही मंदिरांमध्ये प्रामुख्याने कृष्ण-बलराम मंदिर येते. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस (इस्कॉन) यांच्या वतीने १९७५ मध्ये सर्वासाठी खुले करण्यात आले. तेथे श्रीकृष्ण व बलरामाच्या मूर्ती आहेत. शिवाय येथे भक्तांसाठी गेस्टहाऊस, रेस्टॉरंट, गुरुकुल, गोशाला आहेत. हरेकृष्ण भक्त येथे सतत येत असतात. मथुरा-वृंदावन परिसरात येऊन तेथील लस्सी न पिता येणे कसे शक्य होते? लस्सी तीही मातीच्या लहान बोळक्यातून पिण्याचं सुख आम्ही अनुभवलं. श्रीकृष्णांच्या विविध गोष्टी स्थानिक काही लोकांच्या तोंडून ऐकून आम्ही थक्क होत होतो. तेथील ब्रजवासीयांच्या होळीबद्दलच्या गमती ऐकल्या. होळी म्हणजे आठ एक दिवस आधी आणि नंतर साजरी केली जाते. फाल्गुन महिन्यात होळी साजरी केले जाते. ओला आणि कोरडा रंग एकमेकांच्या अंगावर टाकला जातो. त्या काळात मिरवणुका निघतात. नाचगाणे चालते. वृंदावनात वावरत असताना आम्ही सर्वजण भारावून गेलो होतो, एका वेगळय़ाच वातावरणात होतो, त्याच नादात वृंदावनातील शक्य तेवढय़ा मंदिरांत दर्शन घेऊन आम्ही दिल्लीच्या रस्त्याला लागलो. नंतर आम्हाला कुणीतरी सांगितले की तुम्ही तेथील गोकुळला भेट दिली असती तर तुम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला अनुभवायला मिळाल्या असत्या! म्हणजे रांगायला लावले असते, वगैरे. खरेखोटे देव जाणे! पण आयुष्यात एकदा भगवान श्रीकृष्णांच्या जन्मस्थान-जन्मभूमी व त्यांचे बालपण गेले तो भाग आपल्या पाहण्यात आला हे फार मोठे समाधान आम्ही अनुभवले होते, अगदी भरून पावलो होतो. पुन्हा असा योग आयुष्यात कधी येईल की नाही कुणास ठाऊक?

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trip to mathura and vrindavan
First published on: 30-05-2014 at 01:05 IST