सकाळी सकाळी ऑफिसची तयारी करायची नताशाची धावपळ सुरू झाली होती. एकीकडे सकाळची छोटी-मोठी आवराआवर करत होतीच, तेवढय़ात ‘प्रोजेक्टचा फायनल ड्राफ्ट तपासायचा राहूनच गेला’ हे तिला आठवलं आणि ती लॅपटॉपकडे धावली. प्रोजेक्टवर नजर फिरवून उठणार तितक्यात तिचा मोबाइल वाजला. ‘‘काय गं प्रिया, बोल पटकन. आधीच इथे उशीर झालाय. ट्रेन चुकेल माझी.’’ घाईघाईने नताशा बोलली. ‘‘अगं हो, मी त्यासाठीच तुला फोन केला, तू पार्टीसाठी काय घालणार आहेस?’’ आणि नताशाच्या डोक्यात वीज चमकली. आज ऑफिस सुटल्यावर पार्टीला जायचं होतं. तिच्या डोक्यातून साफ निघून गेलं होतं. आता आज ऑफिसमध्ये प्रेझेन्टेशन आहे म्हणजे पार्टीवेअर कपडे घालता येणार नाहीत आणि ऑफिसनंतर कपडे बदलायला वेळ नाही. आता करायचं काय?
असे प्रसंग बऱ्याचदा आपल्याबरोबरही घडत असतात. कधी ऑफिसमधून पार्टीला जायचं असतं तर कधी समारंभाला. ऑफिसच्याच दोन वेगवेगळ्या वेळेस मीटिंग्ज असतात. मग अशा वेळी ऐनवेळी कपडे कसे बदलायचे, हा प्रश्न असतोच. या बिकट प्रसंगांमध्ये नक्की काय करायचं, हा प्रश्न समोर येतो. पार्टीला घालायचे कपडे ऑफिसमध्ये घालून जायचं तर ते गॉडी वाटतात आणि ऑफिसचे कपडे पार्टीला बोरिंग दिसतात. मग अशा वेळी जॅकेट्स, अॅक्सेसरीज, शूज अशा एक्स्ट्राजची टीम आपल्या मदतीला धावून येते. सिनेमात नाही का एखाद्या गाण्यात हीरो-हीरोईनच्या मागे नाचणारे एक्स्ट्राज असतात, त्यांचा पाहायला गेलं तर गाण्यात काही रोल नसतो, पण ते नसले तर गाणं पूर्ण झालेलं वाटतही नाही. हा तसाच काहीसा प्रकार आहे. आज आपण तुमच्या वॉडरोबमधील एक्स्ट्राजबद्दल थोडं बोलू या.
ड्रेसिंगमधील एक्स्ट्राजचा विषय निघाला की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे जॅकेट्स. ही मंडळी कधीही कोणत्याही कठीण प्रसंगी तुमच्या मदतीला धावून येतात. त्यामुळे वॉडरोबमध्ये वेगवेगळ्या स्टाइलच्या जॅकेट्सचा समावेश हवाच. पण याचं प्लॅनिंग नीट करावं लागतं. तुम्हाला मीटिंग्स, कॉर्पोरेट गॅदिरगसाठी जॅकेट्स हवेत की पार्टीसाठी, याचा नीट विचार करावा लागतो. जर तुमचा ड्रेस किंवा शर्ट
जॅकेट्सनंतर कोणाचा नंबर येत असेल तर तो अॅक्सेसरीजचा. नेकपीसेस तुमच्या लुकमध्ये खूप मोठा फरक आणू शकतात. त्यामुळे अडीअडचणीमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला जॅकेट्स कॅरी करायला मिळालं नाही तरी एखादा नेकपीस तुमच्या पर्समध्ये नक्की असू द्या. सध्या बाजारात इअरकफ येऊ लागले आहेत. तुमच्या रोजच्या बोरिंग फॉर्मल लुकला हे इअरकफ क्षणाधार्त क्लासी लुक देऊ शकतात. स्टेटमेंट ब्रेसलेट्स पण अशा वेळी तुमच्या मदतीस धावून येतात.
दरवेळी तयार होताना ‘आपल्या पायाकडे कोण बघतंय?’ असं म्हणून आपण आपल्या शूजकडे दुर्लक्ष करतो. पण शूज तुमच्या लुकमध्ये चेंज आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ऑफिसमध्ये इमर्जन्सीसाठी म्हणून एक हिल्सची जोडी ठेवता येत असेल तर ते केव्हाही चांगलंच. रोजसुद्धा प्रवासात मोठे हिल्स घालणं शक्य नसतं. पण ऑफिसला येऊ न तुम्ही शूज बदलू शकता. गोल्ड, रेड आणि ब्लॅक या तीन रंगांचे हिल्स अडीअडचणीला धावून येतात. त्यामुळे यातील एक तुमच्या ऑफिसच्या कप्प्यात नक्कीच असू द्या. हिल्स आवडत नसतील तर एम्ब्रॉयडर बॅलरिनाजचा पर्याय आहे तुमच्याकडे.
तुम्ही कोणती हॅण्डबॅग कॅरी करताय हेसुद्धा अशा वेळी खूप महत्त्वाचं असतं. आपल्यापैकी कित्येकांना ऑफिसला रोज लॅपटॉप घेऊ न जावा लागतो. पर्यायाने खांद्यावर मोठी सॅक येतेच. मग पार्टीत पण त्या सॅकचं ओझं घेऊन फिरावं लागतं. त्यापेक्षा सध्या बाजारात छान प्रिंटेड लॅपटॉप बॅग्ज उपलब्ध आहेत. या बॅग्ज दिसायला मस्त असतात आणि कॅरी करायला पण छान असतात. तसंच काही बॅग्जमध्ये इनसाईड आऊटचा ऑप्शन पण असतो. म्हणजे एकाच बॅगमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंट्स असतात. त्यामुळे ऑफिससाठी थोडे सोबर प्रिंट आणि पार्टीसाठी लाऊड प्रिंट वापरता येतं. हॅण्डबॅग्जमध्येसुद्धा आता खूप ऑप्शन्स आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या बेल्ट्ससोबत तुम्ही खेळू शकता. ऑफिसला जाताना आपण मोठी हॅण्डबॅग वापरतो, पण पार्टीसाठी शक्यतो क्लचेसचा ऑप्शन सोयीचा असतो. त्यानुसार तुम्हाला पसंतीनुसार हॅण्डबॅगचा आकार निवडून त्याचा बेल्ट कमी-जास्त करून वापरू शकता. हॅण्डबॅग्जमध्येसुद्धा फ्लीपिंगचा पर्याय सध्या उपलब्ध आहे. तसाच डिटॅचेबल हॅण्डबॅग्ज बाजारात उपलब्ध आहेत. या हॅण्डबॅग्ज केवळ एका झीपच्या साहाय्याने वेगळ्या करून वापरता येतात.
लास्ट बट नॉट द लीस्ट म्हणजे मेकअप. मेकअप तुमच्या लुकमध्ये खूप मोठा फरक आणतो. सकाळी आणि रात्री आपण आपला मेकअप लुक कसा असावा, हे आपण मागच्या सदरात पाहिले आहेच. पण पार्टीला जाताना फक्त टचअप करण्याऐवजी मेकअपमध्ये थोडं एक्सपिरीमेंट केल्यास आपल्याला वेगळा लुक मिळतो. मग रोजच्या डेनिम आणि शर्टमध्ये जरी पार्टीत गेलात तरी तुमचा लुक चारचौघांत उठून दिसतो. शिमर आयश्ॉडोज, कलर्ड लायनर्स किंवा बोल्ड शेड लीपकलर तुमच्या पर्समध्ये ठेवायला काहीच हरकत नाही. कित्येकदा फक्त फाऊंडेशनची शेड बदलल्याने लुकमध्ये झालेला बदल तपासून पाहा. शिमर कॉम्पॅक्टचा पर्याय ट्राय करायला हरकत नाही. हेअरपीन्समध्ये चेंजेस करून हेअर स्टाइल्समध्ये पण चेंजेस तुम्ही आणू शकता. त्यामुळे घाईच्या वेळेस तुमच्याकडे वेगवेगळ्या हेअर स्टाइल्स करायला वेळ नसला तरी फक्त पिन्स बदलून तुमचा लुक चेंज करता येतो. कलर हेअर स्ट्राप्स, हेअर बँण्ड्स, फंकी बोज बाजारात उपलब्ध आहेत. त्याच्यावर एक नजर टाकायला काहीच हरकत नाही.
या सगळ्यात सर्वात महत्त्वाचं काही असेल तर तुमचा कॉन्फिडन्स. तुमचे कपडे, मेकअप काहीही असू देत. जर त्याबद्दल तुम्हाला विश्वास असेल तर मग अजून काय हवंय.. तुम्ही जे घातलंय त्यावर ठाम राहा. मग बाकीचं जग जिंकल्यागतच आहे. त्यामुळे डरने का नहीं.. मस्त कॉन्फिडन्स में रहने का..
संग्रहित लेख, दिनांक 6th Jun 2014 रोजी प्रकाशित
लुक में ट्विस्ट..
एखाद्या दिवशी ऑफिस संपवून एखाद्या पार्टीला जायचं असतं. आपल्यासमोर यक्षप्रश्न उभा राहतो की, ऑफिसमधूनच तयार होऊन पार्टीला कसं जायचं? त्यासाठीच्या छोटय़ा छोटय़ा टिप्स...
First published on: 06-06-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व रॅम्पवर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twist in look