इजिप्तचे पिरॅमिड हे जगातल्या प्रत्येक पर्यटकाच्या हमखास अजेंडय़ावर असणारे ठिकाण. पिरॅमिडमधील ममी, तेथील संपत्ती आणि बांधकाम वगैरे आकर्षणाच्या गोष्टी. भारतात असं उदाहरण नसले तरी आपल्याकडेही एक ममी आहे. स्पिती व्हॅलीमध्ये. तब्बल ५५० वर्ष जुनी. नैसर्गिकरीत्या संरक्षित अशी ही ममी स्पिती व्हॅलीतल्या गेवू गावात इंडो-तिबेटियन पोलिसांच्या खणनकामादरम्यान १९७५ मध्ये सापडली. सिमल्यापासून सुमारे २७० किलोमीटरवर असणाऱ्या या गावाला तेंव्हापासून वेगळी ओळख मिळाली. स्थानिकांच्या दाव्यानुसार ही ममी पंधराव्या शतकातील टेनझिन नामक माँकची आहे. अर्थात त्याला सध्या तरी कोणताही ठोस पुरावा नसला तरी ही ममी ५५० वर्षे जुनी असल्याचे मात्र सिद्ध झाले आहे.
तेव्हापासून पर्यटनाच्या नकाशावर गेवूचे नाव दिसू लागले. मध्यंतरी ही ममी चोरून नेली जात असताना, पुन्हा गेवूमध्ये आणण्यात यश आले. सध्या ही ममी एका खोलीत काचेच्या पेटीत बंदिस्त आहे. त्या खोलीत कोणासही प्रवेश नाही. मात्र बाहेरून छायाचित्र घेता येते. ममीच्या जतनासाठी वापरलेल्या तंत्राचा उलगडा झाला नसला तरी आजही ममीच्या चेहऱ्यावर अनोखे तेज जाणवते.
स्पिती व्हॅलीच्या पर्यटनाला चालना देणारी ही घटना म्हणून याची नोंद घ्यावी लागेल. ममीच्या निमित्ताने किन्नोर आणि स्पिती व्हॅलीची भटकंती आपण करू शकतो. हिरवागार निसर्ग, देवदार वृक्षांच्या सावलीतला प्रवास किन्नोरमध्ये घडतो तर स्पितीमध्ये लडाखचा फिल येतो. लडाख लिटिल तिबेट म्हणून ओळखले जाते, तर स्पिती लिटिल लडाख म्हणून. सिमला सोडलं की सरहान येथील अतिउंचावरचे डोंगरावरील भीमकाली पुरातन मंदिर, सांगला आणि चितकुल व्हॅलीचा मोहक निसर्ग, तर त्यापुढे कल्पा येथे वर्ल्ड फेमस किन्नोरी अॅपलचा आस्वाद असा प्रवास आहे.
नाको येथे स्पिती व्हॅलीत प्रवेश करायचा आणि ताबो मोनास्ट्री, धनकर मोनास्ट्री पाहत गेवूमध्ये पोहचायचे. माँकची ममी पाहून जिल्ह्य़ाचे हिवाळी मुख्यालय असणाऱ्या काझा येथे मुक्काम करायचा. काझा येथे पर्यटकांसाठी अनेक सोयी सुविधा आहेत. येथून जवळच असणारे किब्बर व्हिलेज हे आवर्जून भेट द्यायचे ठिकाण. जगात सर्वात उंचावर म्हणजेच १३६०० फुटावर वसलेले किब्बर व्हिलेज हे केवळ ३६६ लोकवस्तीचं छोटं टुमदार गाव. येथे शाळा. पोस्ट ऑफिसदेखील आहे.
पूर्वी स्पिती व्हॅलीत ट्रेकर्सचा राबता असायचा. पण ‘ममी ऑफ माँक’मुळे गेल्या सात-आठ वर्षांत पर्यटकांची गर्दीदेखील दिसते. काझावरून चंद्रताल लेकचा सोप्पा ट्रेक करता येतो किंवा परत मागेही फिरता येते. तर येथूनच पुढे कूंझम पास, रोहतांगमार्गे मनालीलाही जाता येते. त्यासाठी जून ते ऑक्टोबर हा योग्य कालावधी आहे.
केव्हा जाल : स्पिती व्हॅलीत वर्षभरात केव्हाही जाऊ शकता. पण जून ते ऑक्टोबर हा सर्वाधिक योग्य कालावधी आहे.
कसे जाल : चंदिगड – सिमला – काझा – रोहतांग – मनाली अशी साधारण दहा दिवसांची टूर करता येते.
आत्माराम परब – response.lokprabha@expressindia.com