डॉ. शशिकांत माशाळे
बऱ्याच वेळेला आपल्याला विशिष्ट आजार कशामुळे झाला हे कळत नाही. मग संशोधनाअंती कळते की, तो आजार आपल्याला निद्रानाशामुळे झाला. रात्रीची झोप अपुरी राहिल्यामुळे दिवस मरगळलेल्या अवस्थेत जाणे हा त्रास अनेकांना होत असतो. रात्रीची झोप पूर्ण होत नाही हे जरी लक्षात येत असले तरी ती पूर्ण का होत नाही, वारंवार झोपेदरम्यान अडथळा येण्याचे कारण काय हे कळत नाही. ते शोधण्यासाठी ‘स्लीप अॅप्निया’ तपासणी उपयुक्त ठरू शकते. ‘स्लीप अॅप्निया’ हा केवळ एक आजार नाही तर अनेक आजारांचे मूळ या आजारात दडले आहे.
सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तींना सात ते आठ तास आणि लहान मुलांना नऊ ते दहा तास झोपेची गरज असते. शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे अत्यावश्यक आहे; परंतु अनेक रुग्णांना झोपेदरम्यान श्वासोच्छ्वास करण्यास विविध कारणांनी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. या अडथळ्याला ‘स्लीप अॅप्निया’ किंवा निद्राविकार म्हणतात. ‘अॅप्निया’ म्हणजेच काही वेळेस श्वास थांबणे. निद्रानाश हा आजार मानसिक आजाराशी संबंधित असून याचा आणि ‘स्लीप अॅप्निया’चा संबंध येत नाही. ‘स्लीप अॅप्निया’ झोपेदरम्यानच्या श्वसनक्रियेतील अडथळ्यासंदर्भातील आजार आहे. श्वसनास अडथळा होण्यासोबतच झोपेत श्वसनाचा वेग मंदावणे, हेदेखील या आजाराचे एक लक्षण आहे.
‘स्लीप अॅप्निया’चे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणामुळे शरीरांतर्गत चरबीचा एक थर जमा होतो. त्यामुळे अवयवांना काम करताना अतिरिक्त ताण सोसावा लागतो. अनेकदा घसा किंवा मानेभावेती चरबीचा थर जमा होतो. त्यामुळे श्वसनक्रियेत अडथळा होत असतो. अशा वेळी शरीराला आवश्यक तितका ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्या वेळी मेंदू सतर्क होतो आणि झोपेच्या अधीन झालेली व्यक्ती जागी होते. याव्यतिरिक्त पडजीभ किवा जीभ जाड असणे, नाकाचे हाड वाढणे, सातत्याने थंड पदार्थ खाल्ल्यामुळे टॉन्सिल्स वाढणे यामुळे घोरण्याचे प्रमाण वाढून श्वसनक्रियेत अडथळा निर्माण होतो. मद्यपान आणि धूम्रपान यामुळेही श्वसनगती मंदावते.
या आजारात रुग्णाला दिवसभर झोप येत राहते आणि ही झोप आवरणेही अवघड होते. त्यामुळे जिथे शक्य होईल तेथे रुग्ण झोपतो. तसे पाहता सर्वसाधारण व्यक्तीलाही अनेकदा झोपेदरम्यान जाग येत असते. मात्र रात्रभरात १५ ते २० पेक्षा अधिक वेळा जाग येत असेल तर वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच एकाग्रता नसणे, कामात मन न लागणे ही लक्षणे ‘स्लीप अॅप्निया’मध्ये पाहावयास मिळतात.
२२ मार्चपासून मुंबईच्या कूपर रुग्णालयात ‘स्लीप टेस्ट’ विभाग सुरू झाला आहे. सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस ही तपासणी करता येते. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस बा रुग्ण विभागासाठी असतात. या विभागात रुग्णाची साधारण तपासणी केल्यानंतर त्याला झोपेच्या तपासणीची आवश्यकता वाटल्यास सायंकाळी सातच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यानंतर रुग्णाचे वजन, शरीर द्रव्यमान निर्देशांक (बी.एम.आय.), उंची मोजली जाते. नंतर रुग्णाच्या नाकाला नलिका जोडल्या जातात. छातीला आणि हाताच्या बोटांना पल्सोमीटर जोडले जाते. ही यंत्रे संगणकाला जोडून त्यावरील ‘पॉलिसोनिनोग्राफी’ या सॉफ्टवेअरच्या साह्यने संबंधित रुग्णाच्या झोपेचा अभ्यास केला जातो. साधारण रात्री नऊ वाजता ही यंत्रे लावली जातात. रात्रभर झोपेदरम्यान रुग्णाला किती वेळा जाग आली, याची पाहणी केली जाते. २० पेक्षा अधिक वेळा झोपमोड झाली असल्यास त्याची ‘एन्डोस्कोपी केली जाते. त्यानंतर नाकातून दुर्बीण घालून अंतर्गत भागाची तपासणी केली जाते. त्यातून झोपेला अडथळा ठरणारा भाग शोधला जातो आणि त्याआधारे रुग्णाला वैद्यकीय सल्ला दिला जातो.
दुर्बिणीतून एन्डोस्कोपी केल्यानंतर नेमका अडथळा लक्षात येतो. अनेकदा हा आजार जीभ, पडजीभ, टॉन्सिल, लठ्ठपणा यांच्या एकत्रित समस्येमुळेही होतो. मात्र एका वेळी दोन किंवा तीन भागांवर शस्त्रक्रिया करणे चांगले.
काही वेळा अशा रुग्णांना ‘सी-पॅप’ हे यंत्र दिले जाते. सध्या पालिका रुग्णालयात ते नसले तरी खासगी रुग्णालयात ते उपलब्ध आहे. रात्री झोपताना हे यंत्र नाकाला लावून झोपायचे असते. या यंत्रातून ऑक्सिजन पुरविला जातो. त्यामुळे नैसर्गिक श्वसनक्रियेत ऑक्सिजनपुरवठा कमी झाला तरी या यंत्राच्या मदतीने ऑक्सिजन पुरवला जातो.
बऱ्याच वेळा रुग्णांना शंका असते की शस्त्रक्रियेनंतर हा आजार पुन्हा उद्भवू शकतो का? त्याचे उत्तर असे की, शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाने वजन नियंत्रणात ठेवले नाही तर हा त्रास पुन्हा उद्भवू शकतो. यासाठी ‘स्लीप अॅप्निया’ झाल्यानंतर रुग्णाने सजगतेने आहार आणि व्यायामाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
कूपर रुग्णालयात अगदी १० रुपयांच्या केस पेपरवरही रुग्णाची तपासणी आणि शस्त्रक्रिया केली जाते. मात्र खासगी रुग्णालयात यासाठी जास्त पैसे आकारले जातात.
response.lokprabha@expressindia.com